विनामोटार वाढतंय बिल, वीज विभागाचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 02:40 PM2020-02-06T14:40:04+5:302020-02-06T14:47:36+5:30

पुरामध्ये वाहून गेलेल्या मोटारीचे बिल शेतकऱ्यांच्या बोकांडी मारण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने केला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या पाणी मोटारी वाहून गेल्या, त्यांना हजारो रुपयांचे बिल पाठविण्यात आलेले आहे. चार हजारांचे बिल हातात पडलेल्या शेतकऱ्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे.

Freelance Rising Bills, Strange Steps in the Electricity Department | विनामोटार वाढतंय बिल, वीज विभागाचा अजब कारभार

विनामोटार वाढतंय बिल, वीज विभागाचा अजब कारभार

googlenewsNext
ठळक मुद्देविनामोटार वाढतंय बिल, वीज विभागाचा अजब कारभारबिल माफ करण्यास टाळाटाळ

सागर गुजर

सातारा : पुरामध्ये वाहून गेलेल्या मोटारीचे बिल शेतकऱ्यांच्या बोकांडी मारण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने केला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या पाणी मोटारी वाहून गेल्या, त्यांना हजारो रुपयांचे बिल पाठविण्यात आलेले आहे. चार हजारांचे बिल हातात पडलेल्या शेतकऱ्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे.

गेल्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्या, ओढ्यांना पूर आला. कोर्टी येथील चंद्रकांत यादव या शेतकऱ्यांची आॅगस्ट २०१९ मध्ये विद्युत मोटार पुरात वाहून गेली. इलेक्ट्रिक मोटार, पाईपलाईन, केबल असे साहित्य वाहून गेल्याने यादव यांचे २४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले. तिथून पुढे पाऊस सतत सुरू होता. तसेच मोटार वाहून गेल्याने ती चालू ठेवण्याचा प्रश्नच आला नव्हता.

तरीही यादव यांना वीज कंपनीने ४ हजार ४१० रुपयांचे बिल धाडले. हे बिल माफ करावे, या मागणीसाठी यादव वीज कंपनीत हेलपाटे मारत असून, त्यांची कोणीच दखल घेत नाही, ही स्थिती आहे.

दरम्यान, जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांचा कालावधी हा पावसाळ्याचा असतो. याच पावसाळ्याच्या कालावधीमधील मोटार वापरल्याचे तब्बल ८ हजार २४० रुपयांचे बिल चंद्रकांत यादव यांना पाठविण्यात आले होते. ते बिल यादव यांनी भरले.

त्यानंतर पुरात मोटार वाहून जाऊनही वीज विभागाने त्यांना विजेचे बिल पाठवले. वास्तविक, मोटार अस्तित्वातच नसेल तर कसे काय बिल पाठविले गेले, वीज विभाग हे काम अंदाजपंचे करत आहे का? अशी शंका जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यामुळे योग्य ते बील आकारावे, अशी मागणी होत आहे.

कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाण्याच्या मोटारी सर्रासपणे वाहून गेल्या. या भागातील १३ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तरीदेखील वीज कंपनीने शेतकऱ्यांना वीज बिले धाडली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातून कसेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू असताना हे बील जास्त आहे.


यंदा मोठा पाऊस झाला. खरीप हंगामात शेती पिके भिजविण्याची गरज पडली नव्हती, तरीही आॅगस्ट महिन्यात आलेले ८ हजार २४० रुपयांचे बिल मी भरले. मात्र, मोटार वाहून गेली तरीही मला बिलाचा भुर्दंड बसला आहे. वीज कंपनीने हे बिल माफ केलेले नाही.
- चंद्रकांत यादव, शेतकरी



अतिवृष्टीच्या काळात शेतीपंपासाठी वीज वापर झालेला नाही. तरीही वीज बिले दिली गेलेली आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. वीज कंपनी अंदाजे बिले देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शासनाने अतिवृष्टीच्या काळातील कृषी पंपाची बिले सर्रास माफ करावीत.
- राजू शेळके,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Freelance Rising Bills, Strange Steps in the Electricity Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.