वनकर्मचारी मारहाण प्रकरण : आम्हांला इथून पदमुक्त व्हायचंय! पीडित दाम्पत्याचा उद्वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 12:14 PM2022-01-21T12:14:30+5:302022-01-21T12:23:02+5:30

कोणाशीही संघर्ष न करता आम्हांला इथून पदमुक्त व्हायचं आहे, असे सांगत पीडित वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे या दाम्पत्याने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.

Forest worker assault case We want to get rid of this post, Anxiety of the victim couple | वनकर्मचारी मारहाण प्रकरण : आम्हांला इथून पदमुक्त व्हायचंय! पीडित दाम्पत्याचा उद्वेग

वनकर्मचारी मारहाण प्रकरण : आम्हांला इथून पदमुक्त व्हायचंय! पीडित दाम्पत्याचा उद्वेग

Next

प्रगती जाधव-पाटील

सातारा : आम्ही ऊसतोड कामगारांची मुलं. पोटाला चिमटा काढून पालकांनी शिक्षण दिलं. नोकरी मिळवून त्यांच्या कष्टाचं पांग फेडू म्हणून इथं पाचशे किलोमीटर दूर आलो. सातारा जिल्ह्याचा नावलौकिक बालपणापासून ऐकत होतो. आम्हांला गावाकडं ठेवून आमचे पालक इथं ऊसतोड करत होते.

त्याच भागानं मनावर ओढलेले ओरखडे चिरकाल टिकतील. कोणाशीही संघर्ष न करता आम्हांला इथून पदमुक्त व्हायचं आहे, असे सांगत पीडित वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे या दाम्पत्याने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.

सातारा तालुक्यातील पळसवडे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्ष रामचंद्र जानकरने वनरक्षक सिंधू सानप यांना मारहाण केली. या मारहाणीचे चित्रीकरण तिचा पती सूर्याजी ठोंबरे यांनी केले. त्यामुळे हे सर्व प्रकरण समोर आले. सिंधू आणि सूर्याजी ही दोघेही बीडची ऊसतोड कामगारांची लेकरे. पालकांनी आपल्या आयुष्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिक्षण दिले. पोरांनीही शिक्षण घेऊन थेट शासकीय नोकरी पटकावली.

२०१७ मध्ये कोयनेतून सिंधूने आपल्या कामाला सुरुवात केली. उजाड माळरान असलेले बीड आणि डोंगर- कपाऱ्या, वृक्षांनी आच्छादलेले कोयनेचे खोरे पाहिल्यानंतर काम करण्याचा तिचा हुरूप वाढला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू असतानाच सप्टेंबर २०२१ मध्ये तिची पळसवडे वनरक्षक म्हणून नियुक्ती झाली.

‘या गावात आल्यानंतर कामाची वेगळीच पद्धत पाहायला मिळाली. वनक्षेत्रात काम केल्यानंतरही ते काम तपासायचे नाही, असाच इथला शिरस्ता होता. काम न बघता बिल काढणं म्हणजे स्वतःला अडचणीत आणणं, हे माहीत होतं; पण ते इतकं रुद्ररूप धारण करेल असं खरंच वाटलं नव्हत.

शांत, सुसंस्कृत आणि पुरोगामी विचारांच्या जिल्ह्यात काम करताना असा अनुभव क्लेशदायक आहे. भविष्यात इथं काम केलं, तर जिवाचं बरं-वाईट होण्याची अधिक भीती आहे. त्यामुळं वरिष्ठांकडं बदलीचीही मागणी केली आहे’, असे सिंधूने ‘लोकमत’ला सांगितले.

...म्हणून पतीला करावे लागले शूटिंग

रामचंद्र जानकर याची पत्नी आक्रमकपणे वनरक्षक सूर्याजी ठोंबरे यांच्याकडे चाल करून आली. बचावाची भूमिका म्हणून सूर्याजीने खिशातील मोबाइल काढून चित्रीकरण सुरू केले. आपले चित्रीकरण होत असल्याचे पाहिल्यानंतर चवताळलेल्या जानकर आणि त्याच्या पत्नीने दोघांवरही हल्ला चढविला.

सिंधूला मारहाण होत असताना आपण तिला सोडवायला गेलो, तर आपल्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल या धास्तीने चार महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या बचावाला त्यांना जाता आले नाही. तोंडी कोणाला सांगितले तर खरं वाटणार नाही म्हणूनच या सर्व प्रकाराचे चित्रीकरण केले; पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी सिंधूला घेऊन मी तिथून निघालो’, असे सूर्याजी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Forest worker assault case We want to get rid of this post, Anxiety of the victim couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.