एका वर्षाचा ‘गेमप्लॅन’ अन् यशाला गवसणी, ‘लोकमत’मधून प्रेरणा मिळाल्याची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 04:36 AM2020-06-22T04:36:52+5:302020-06-22T06:45:58+5:30

‘विद्या तोच भाग्यवंत’ या उक्तीला मूर्तरुप देणारा प्रसाद चौगुले हा महावितरण कंपनीमधील आॅपरेटरचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी झाला.

The feeling of being inspired by 'Lokmat', a one-year 'game plan' for others | एका वर्षाचा ‘गेमप्लॅन’ अन् यशाला गवसणी, ‘लोकमत’मधून प्रेरणा मिळाल्याची भावना

एका वर्षाचा ‘गेमप्लॅन’ अन् यशाला गवसणी, ‘लोकमत’मधून प्रेरणा मिळाल्याची भावना

Next

सागर गुजर 
सातारा : क-हाडातील विद्यानगरीत वास्तव्य करून ‘विद्या तोच भाग्यवंत’ या उक्तीला मूर्तरुप देणारा प्रसाद चौगुले हा महावितरण कंपनीमधील आॅपरेटरचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी झाला. संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक मिळविण्याची किमयाही केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रसादचे यश प्रेरणा देणारे आहे.

अधिकारी होण्याचे ध्येय पूर्वीपासूनच होते काय?
शालेय शिक्षण घेत असतानाच नवोदय विद्यालयात सामान्य ज्ञानाचा पाया पक्का झाला. प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा तेव्हापासूनच होती. सनदी अधिकारी लोकांसाठी वजावत असलेल्या सेवेच्या ‘लोकमत’मध्ये आलेल्या बातम्या वाचून त्यातून अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली.
घरातील आर्थिक परिस्थिती कशी होती?
माझ्या घरातील आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. आई, वडील, मी आणि माझ्या दोन बहिणी, असं आमचं कुटुंब. वडील वीज कंपनीत आॅपरेटर म्हणून काम करतात. मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावं, ही त्यांची इच्छा तिन्ही भावंडांनी अभियांत्रिकीची पदवी घेऊन पूर्ण केली.
स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात राहून तयारी कशी केली?
इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच माझी फियाट कंपनीमध्ये निवड झाली होती. एक वर्ष या नोकरीतून पैसे साठवले. हे पैसे जवळ होते. त्यातूनच पुस्तके खरेदी केली. क्लास लावला. या क्लासमध्ये भाऊजी प्रमोद चौगुले यांचे मला मार्गदर्शन लाभले.
स्पर्धा परीक्षेचा एका वर्षातील गेम प्लॅन कसा होता?
एकाच वर्षात यशस्वी व्हायचा असा गेम प्लॅन मी अभ्यास करताना आखला होता. स्पर्धा परीक्षा देणाºया युवक-युवतींनी परीक्षेची प्रत्येक संधी ही शेवटची आहे, असा विचार करून अभ्यास केला पाहिजे.
>अभ्यासाची बैठक ठरली फायद्याची
माझ्याकडे बुद्धी हेच भांडवल होते. अभ्यास करताना कधीही कंटाळा केला नाही. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना तर अत्यंत मन लावून अभ्यास केला. अभ्यासाची हीच बैठक पुण्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानाही फायद्याची ठरली. खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असताना देखील रूमवर पोहोचल्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असायचो.
>शालेय शिक्षणातच स्पर्धात्मक तयारी
खावली (ता. सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयात शालेय शिक्षण घेत असतानाच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी झाली. स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत होण्यासाठी येथील वास्तव्य फायद्याचे ठरले. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक असे मोठे अधिकारी शाळेत येऊन आपले मनोगत व्यक्त करायचे. त्यांच्या अमोघ वाणीतूनच प्रशासकीय सेवेत जाण्याची ऊर्जा मिळाली.
>आर्थिक परिस्थिती बेताची असूनही आई-वडिलांनी आम्हा तिन्ही भावंडांना अभियांत्रिकीच्या पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यांच्यावर आर्थिक ताण येऊ नये, याची काळजी घेतली. नोकरी करुन पैसे साठवले.
-प्रसाद चौगुले,
उपजिल्हाधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम

Web Title: The feeling of being inspired by 'Lokmat', a one-year 'game plan' for others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.