शुल्क कमीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:07+5:302021-05-14T04:39:07+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. मुले ऑनलाईन शिकत असली तरी त्यांच्यासाठी संस्थांचा फारसा खर्च होत नाही. ...

Demand for fee reduction | शुल्क कमीची मागणी

शुल्क कमीची मागणी

Next

सातारा : सातारा जिल्ह्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. मुले ऑनलाईन शिकत असली तरी त्यांच्यासाठी संस्थांचा फारसा खर्च होत नाही. त्यामुळे शिक्षण संस्थांनी मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी अनेक पालकांमधून केली जात आहे.

000000000

बाकड्यांची सोय

सातारा : साताऱ्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक कोरोना नसताना दररोज सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी कुरणेश्वरपर्यंत जातात. यादरम्यान नागरिकांना बसण्यासाठी सोय नसल्याने त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता या मार्गात ठिकठिकाणी बाकड्यांची सोय करण्यात आली आहे.

००००००००००

रेंजअभावी गैरसोय

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकविले जात होते. कोरोनाची दुसरी लाट उग्ररूप धारण करीत आहे. त्यामुळे जूनमध्ये शाळा सुरू होईल याची खात्री नाही. जावळी, सातारा, पाटण तालुक्यांतील दुर्गम भागातील अनेक गावांत मोबाईल इंटरनेटची रेंजच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

०००००००००००००

गावोगावच्या यात्रा रद्द

सातारा : सातारा जिल्ह्यात सध्या यात्रांचा हंगाम सुरू आहे. हनुमान जयंती दरम्यान यात्रा मोठ्या प्रमाणावर असतात. मात्र, कोरोना वाढत असल्याने यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागत आहे. त्यामुळे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

०००००

वजनात फसगत

सातारा : साताऱ्यातील जुना मोटार स्टॅण्डमध्ये दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. या ठिकाणी बसणारे अनेक व्यापारी, शेतकरी कापडात बांधलेल्या दगडाचा वापर करून वस्तू मोजून देतात. त्यातून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे जाणवत आहे. संबंधितांवर कारवाईची गरज आहे.

००००००००००

प्रेमीयुगुलांचा उपद्रव

मेढा : जावळी तालुक्यातील काही डोंगरात प्रेमीयुगुले येऊन बसत असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे. लाॅकडाऊन असल्याने हे थांबलेले असले तरी नेहमीचा त्रास वाचविण्यासाठी बंदोबस्ताची गरज आहे.

००००००

पिकअप्‌ शेडची गरज

सातारा : सातारा जिल्ह्यात एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना फाट्यावर जाऊन थांबावे लागत आहे. मात्र, अनेक ठिकाणी पिकअप्‌ शेडची सोय नसल्याने नागरिकांना ऊन, वारा सहन करीत थांबावे लागते.

०००००००

नवे सीसीटीव्ही कॅमेरे

सातारा : साताऱ्यातील अनेक रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणचे कॅमेरे खराब झाले होते. मात्र, आता राजवाडा, मंगळवार तळे मार्गात अनेक ठिकाणी कॅमेरे बसविलेले आहेत.

००००००००००

स्मशानभूमी नावाला

सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक गावांच्या स्मशानभूमी नदीकाठी आहेत. दोन वर्षे झालेल्या मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीची शेड वाहून गेली आहेत. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठीही जागा शिल्लक नाही. पर्यायी सोय करावी लागते. त्यामुळे स्मशानभूमीची कायम सोय करावी, अशी मागणी केली जात आहे.

——————-

बसस्थानक ओस

सातारा : जिल्ह्यात कोरोना दररोज उग्र स्वरूप धारण करीत असून, जिल्ह्यात दररोज सरासरी दोन हजारांच्या पटीत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना धोका वाढत असल्याने कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक ओस पडले आहेत.

———————

शाळांभोवती गवत

सातारा : जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळा कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून बंद आहेत. त्यामुळे तेथे निगा राखण्यासाठी कोणीही उपलब्ध नसतो. त्यामुळे शाळांच्या भोवती मोठ्या प्रमाणावर गवत उगवले आहे. ते कापलेले नसल्याने विद्रुप स्वरूप आले आहे. हेच गवत आता उन्हामुळे वाळून चालले आहे.

००००००००००

मास्क वापरण्याबाबत निष्काळजीपणा

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची नागरिकांमधील भीती कमी झाल्याचे जाणवत आहे. साताऱ्यातील आठवडा बाजारात अनेक व्यापारी, शेतकरी त्याचप्रमाणे ग्राहकही मास्क नाकाला न लावताच व्यवहार करीत आहेत. अनेकांचा मास्क केवळ हनुवटीला लावलेला असतो.

Web Title: Demand for fee reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.