ठाण्यासमोर जमाव येताच युवकांना सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:28 IST2018-01-03T23:27:26+5:302018-01-03T23:28:16+5:30

ठाण्यासमोर जमाव येताच युवकांना सोडले
सातारा : सातारा शहरात बंदमुळे तणावपूर्ण वातावरण झाले होते. काही ठिकाणी वाहनांच्या काचा फोडल्या. ठिकठिकाणी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून वाहतूकही थांबविण्याचा प्रयत्न केला गेला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्या सुटकेसाठी जमावाने शहर पोलिस ठाण्यासमोर गर्दी करून या ‘युवकांना सोडणार नसाल तर याद राखा’ असा इशारा दिला. या संशयितांना सोडल्यानंतर तणाव निवळला.
आंदोलनामुळे सातारा शहरात सकाळपासून कार्यकर्ते पायी व दुचाकीवर फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. त्यामुळे राजवाडा, पोवई नाका, सातारा बसस्थानक, भूविकास बँक, गोडोली, विसावा नाका आदी प्रमुख रस्त्यांवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. सकाळी करंजे नाका परिसरात रिक्षाची वाहतूक थांबवून त्याची काच फोडली. त्यामुळे मोठी गर्दी जमली होती. याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला. तसेच काही युवकांना ताब्यात घेतले.
दरम्यान, शहरातील निघालेली दुचाकी रॅली तेथे आली. त्यांनी युवकांना सोडावे, अशी मागणी केली. त्यास पोलिसांनी नकार दिल्याने पोलिस आणि जमावामध्ये बाचाबाची झाली. तसेच युवकांच्या नातेवाइकांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिस त्यांना शाहुपूरी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यांच्यापाठोपाठ नातेवाइकांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. त्यानंतर युवकांना सोडा नाही तर आम्हालाही अटक करा, अशी मागणी केली. परिसरात तणाव निर्माण झाल्याने अखेर पोलिसांनी त्या युवकांना सोडले.
दरम्यान, दुपारी महामार्गावरील देगावफाटा परिसरातील प्रिती हॉटेलच्या पार्किंगमधील एका कारवर दगडफेक करून काच फोडली गेली. यामुळे तणावाचे वातावरण पसरले. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन युवकांना ताब्यात घेऊन जमाव पांगवला. या तिघांना शहर पोलिस ठाण्यात हजर केले असता येथेही जमावाने पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली.
दरम्यान, काही संघटनांच्या पदाधिकाºयांनी पोलिसांना ‘या युवकांना सोडणार नसाल तर याद राखा’ असा इशारा दिला. यावेळी पोलिस व जमावामध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून युवकांना समज देवून सोडले.
संदीप पाटील
दिवसभर आॅन फिल्ड
जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील सकाळपासून सर्वत्र लक्ष ठेवून होते. सातारा शहरातील फिरून बंदोबस्त पाहिला. तसेच दिवसभरात सातत्याने वायरलेसवरून कर्मचाºयांना सूचना देत होते. सातारा शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी व प्रमुख चौकात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
साताºयात पोलिसांची रणनिती यशस्वी
एखाद्या ठिकाणी काही घटना घडल्यास पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत होते. तातडीने कारवाई करून संशयिताला ताब्यात घेऊन जमाव पांगवण्याची रणनिती पोलिसांनी आखली होती. त्यामुळे सातारा शहरात अपवादात्मक ठिकाणी हिंसक घटना घडल्या..
फक्त संबंधितांनाच ताब्यात घेण्याची सूचना
कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे बुधवारी सातारा जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळला गेला होता. दरम्यान, काही ठिकाणी तोडफोड झाल्यामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ‘हिंसाचाराला जबाबदार असणाºया मंडळींनाच केवळ ताब्यात घ्या. त्या ठिकाणी उपस्थित असणाºया बघ्यांना त्रास देऊ नका,’ अशा सूचनाही दिल्या होत्या.