Crime News | Crime News खवले मांजर तस्करीतील सुत्रधार गोव्याचा; सदर बझारमध्ये भरदिवसा घरफोडी
Crime News खवले मांजर तस्करीतील सुत्रधार गोव्याचा; सदर बझारमध्ये भरदिवसा घरफोडी

ठळक मुद्देसदर बझारमध्ये भरदिवसा घरफोडी - तीन तोळं सोनं अन् सात हजारांची रोकड चोरीसकणकवली शहरातील दुकान फोडले ; महामार्गावरील घटना- पावणेदोन लाखांचा माल लंपास

सावंतवाडी : खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ संशयितांना मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. तर अन्य सहा जणांना यापूर्वी अटक करून त्यांना वन कोठडी देण्यात आली आहे. यातील मुख्य सुत्रधार हा गोव्यातील असून त्याचा साथीदार हा सह्याद्री पट्यातील असल्याचे तपास अधिकाऱ्यांच्यासमोर आले आहे.
दरम्यान आज आठही संशयितांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील अन्य तीन संशयित अद्याप फरार असल्याची माहिती या गुन्ह्याचे तपासी वनअधिकारी गजानन पानपट्टे यांनी दिली.

खवले मांजर तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने मंगळवार १४ जानेवारी रोजी सायंकाळी माडखोल-सावली धाबा परिसरात केली होती. यात पाच संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होते. यातील चौघांना न्यायालयात हजर करून वनकोठडी देण्यात आली होती. तर एकाची प्रकृती खालावल्यामुळे त्याच्यावर उपचार करून दुस-या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र त्याला बंधनपत्रावर सोडण्यात आले. तर अन्य संशयितांना तपासादरम्यान ताब्यात घेतले.


सदर बझारमध्ये भरदिवसा घरफोडी - तीन तोळं सोनं अन् सात हजारांची रोकड चोरीस

सातारा : येथील सदर बझारमधील नवीन म्हाडा कॉलनीतील सचिन किरतकुडवे यांच्या घरातून बुधवारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला. तीन तोळे सोने आणि सात हजारांची रोकडचा त्यामध्ये समावेश आहे.
सचिन किरतकुडवे हे सदर बझारमधील नवीन म्हाडा कॉलनीत वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी ते कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील तीन तोळ्यांचे दागिने आणि सात हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त टाकले होते.

सचिन किरतकुडवे हे दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी आले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर म्हाडा कॉलनीमध्ये आजूबाजूला संशयास्पद वस्तू सापडतेय का, याचा शोध घेतला. मात्र, पोलिसांना काहीही सापडले नाही. श्वानालाही पाचारण करण्यात आले होते. किरतकुडवे हे घराबाहेर गेल्यानंतर पाळत ठेवून कोणीतरी हा प्रकार केला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

 

 

  • कणकवली शहरातील दुकान फोडले ; महामार्गावरील घटना : पावणेदोन लाखांचा माल चोरट्यांनी केला लंपास


कणकवली : कणकवली शहरात पुन्हा एकदा धाडसी चोरीची घटना घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत एस. एम. हायस्कूल शेजारील पिटर इंग्लंड क्लॉथ शो रूमचे दर्शनी भागातील शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. तसेच शोरूममधील कपडे व रोख रक्कमेसह १ लाख ८२ हजार ३५५ रूपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या शोरूम जवळील सीसीटीव्ही कॅमे-यात हे चोरटे कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे कणकवली शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.

साधारणत: तीन महिन्यांपूर्वी संकेत श्रीधर नाईक यांनी कणकवली येथे पिटर इंग्लंड क्लॉथ शो रूम सुरू केला आहे. हा शोरूम सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे बंद करून कर्मचारी घरी निघून गेले. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या शोरूम जवळ राहणाºया काही नागरिकांना दर्शनी भागातील शटर उघडे दिसले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी दूरध्वनीद्वारे शोरूमचे मालक संकेत नाईक यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. नाईक यांनी आपल्या स्टोअर मॅनेजर तसेच काही कर्मचाऱ्यांना त्याबाबत कळविले.

पोलिसांना गांगोमंदिर समोरील रस्त्यावर शोरूममधील पॅन्ट लटकविण्याचा हुक आढळला आहे. त्यामुळे त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. या चोरीच्या घटनेबाबत शोरूमचे स्टोअर मॅनेजर शुभम सुभाष देसाई (रा. कळसुली, गडगेवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 

  • तीन चोरट्यांचा समावेश; पोलिसांचा अंदाज

शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमेºयात तीन चोरटे चोरी करताना कैद झाले आहेत. हे चोरटे २० ते ३० वयोगटातील असावेत तसेच ते सराईत असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दोन चोरटे हाताने शटर उघडताना सीसीटीव्हीत दिसत आहेत. त्यामुळे पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक शोरूमच्या आजूबाजूच्या इमारती व आस्थापनांमधील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून आणखीन काही सुराग मिळतो का? हे पहात आहेत. एक चारचाकी वाहनही पुसटशे सीसीटीव्ही कॅमेºयात दिसत आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
 

Web Title: Crime News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.