पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:24+5:302021-04-13T17:48:01+5:30

Gudhipadwa CoronaVirus Market Satara : गुढीपाडव्याचा सण यंदाही कोरोनाच्या सावटाने काळवंडला आहे. छोट्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या उत्पादनांना कवडीमोल भावाने उठाव मिळत असल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेवर संक्रांत कोसळली आहे. लाखोंच्या उलाढालीने साजरा होणारा हा उत्सव यंदा खूपच शांत आणि निरंक जात असल्याने व्यापाऱ्यासंह शेतकऱ्यांचे डोळेही पाणावले आहेत. दुष्काळापेक्षाही ही परिसिथती गंभीर असल्याचे जुनेजाणते सांगतात.

Corona Sankrant on the market at the moment of Padva! | पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत!

पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत!

googlenewsNext
ठळक मुद्देजरंडेश्‍वर, पाली, पुण्याचा दगडूशेठ हलवाई येथेही यंदा सातारी साखरगाठी नाही

सातारा : गुढीपाडव्याचा सण यंदाही कोरोनाच्या सावटाने काळवंडला आहे. छोट्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या उत्पादनांना कवडीमोल भावाने उठाव मिळत असल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेवर संक्रांत कोसळली आहे. लाखोंच्या उलाढालीने साजरा होणारा हा उत्सव यंदा खूपच शांत आणि निरंक जात असल्याने व्यापाऱ्यासंह शेतकऱ्यांचे डोळेही पाणावले आहेत. दुष्काळापेक्षाही ही परिसिथती गंभीर असल्याचे जुनेजाणते सांगतात.

हिंदू नववर्षाचा सण म्हणून गुढीपाडव्याचा मुहूर्त गाठण्यासाठी अनेक घरांमध्ये वर्षभर वाट पाहिली जाते. गतवर्षीसह यंदाही कोरोनाचे संकट घोंगावू लागल्याने व्यापाऱ्यासंह, शेतकरीही हवालदिल झाले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठेने अवसान एकवटले असले तरीही ग्राहक मर्यादितच येणार याची खूणगाठ त्यांनी बांधली आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षाही यावेळची परिस्थिती भयाण असल्याचे ज्येष्ठांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. न चुकता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणारी सातारी साखरगाठीही यंदा पहिल्यांदाच पाठवली नसल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

गुढीच्या काठ्यांची उलाढाल ठप्प

गुढी उभी करायला लागणाऱ्या बांबूच्या काठ्या आठवडाभर आधी बाजारपेठेत दाखल होतात. शहराच्या मुख्य चौकात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या काठ्यांची उलाढाल लाखांच्या घरात असते. कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही या बांबूंना मागणी नसल्याचे व्यापारी सांगतात. गुढीपाडव्यासाठी आवश्यक असणाऱ्या बांबूच्या कळकाची कापणी एक महिना आधीच केली जाते.

एक महिना आधी कळक कापून तो सोलला जातो. त्यावर असणारी कोंबे काढून तो गुळगुळीत केला जातो. त्यानंतर या कळकांना पंधरा ते वीस दिवस कडक उन्हात वाळवल्यानंतर वरून आणि खालून छाटले जातात. साताऱ्यातील काही भागांत बांबू येतो. अनेकदा याची कोकणातून मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. स्थानिक बांबूचे दर तुलनेने कमी असतात. अपार्टमेंटमुळे मोठ्या बांबूऐवजी चार ते पाच फूट बांबू नेण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे व्यापारी सांगतात. सरासरी १५ ते २० फूट उंचीचा कळक सामान्यपणे गुढी उभारण्यासाठी नेला जातो.

फुले कोमेजली… शेतकरी हिरमुसला!

गुढीपाडव्याच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत झेंडूच्या फुलांना मागणी असते. कोरोना आटोक्यात आल्याची अटकळ वर्तवून काही शेतकऱ्यांनी डिसेंबरमध्येच झेंडूची लागवड केली. वातावरण पोषक असल्याने तीन महिन्यांत फुलेही चांगली आली, पण गत पंधरा दिवसांत कोरोनाचा उद्रेक वाढला आणि बाजारपेठा ठप्प झाल्या. याचा परिणाम झेंडूवरही झाला. लागवड करताना सरासरी ८० रुपये किलोचा दर गृहित धरण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र अवघ्या वीस रुपये किलो दराने फुले विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

कोरोनाने अनेकांचे आडाखे चुकवले. जगभरातील परिस्थिती पाहता शेतीमालाला सध्या सर्वत्रच मागणी कमी झाली आहे. झेंडूची लागवड करताना चांगल्या दराची निश्‍चितच आशा होती; पण गेल्या दोन आठवड्यांत पूर्ण चित्र होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्यांना हे नुकसान झेपणारे नाही.
- मनोहर साळुंखे,
प्रगतिशील शेतकरी, नागठाणे

गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात सामान्यांची गर्दी अजिबात नाही. पाडवा साजरा करायचा म्हणजे हजारभर रुपयाला फोडणी ही मानसिकता सध्या दिसते. बांबू, साखरगाठी, हार, कडुनिंबाची पाने, साडी आदी गोष्टींसाठी खर्च करण्यापेक्षा ते वाचवून ठेवू, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
- श्रीधर हादगे,
बांबू व्यावसायिक, सातारा

गेल्या पाच दशकांतील सर्वाधिक नीचांकी साखरगाठी यंदा आम्ही बनविल्या. बाजारपेठेत उदासीनता आहे. कोरोनाच्या दहशतीचे पडसाद यंदाच्या सणावर पाहायला मिळत आहेत. बाजारात लोक फिरताहेत; पण त्यांच्या खिशातून पैसे बाहेर येणे अशक्य दिसतेय. इतकी भयावह परिस्थिती १९७२ च्या दुष्काळातही पाहिली नव्हती.
- भारतशेठ राऊत,
मिठाई व्यावसायिक, सातारा

 

 

 

 

Web Title: Corona Sankrant on the market at the moment of Padva!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.