‘पर्ल्स’विरोधात तक्रारींचा ओघ
By Admin | Updated: December 12, 2014 23:44 IST2014-12-12T22:33:28+5:302014-12-12T23:44:00+5:30
एकूण २१ तक्रारी : फसवणुकीचा आकडा वाढला

‘पर्ल्स’विरोधात तक्रारींचा ओघ
सातारा : मुदत संपलेल्या ठेवीचा परतावा न केल्याप्रकरणी ‘पर्ल्स’विरोधात शुक्रवारी आणखी पाच तक्रारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या सर्वच प्रकरणात झालेली फसवणुकीची रक्कम ३.१0 लाख इतकी आहे.
दरम्यान, ‘पर्ल्स’विरोधात आतापर्यंत २१ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, प्रत्येक तक्रारीमध्ये कंपनीचे संचालक, एजंट, यांच्यासह सातारा कार्यालयातील व्यवस्थापक आणि सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारीनुसार फसवणूक झालेली रक्कम बारा ते पंधरा लाखांच्या पुढे गेली आहे.
शुक्रवारी ज्या पाच ठेवीदारांनी तक्रार केली त्यामध्ये सुरेश कोडिंबा सकपाळ (रा. बागलेवाडी, ता. पाटण आणि रक्कम ५0 हजार), संतोष रामचंद्र सकपाळ (रा. बागलेवाडी, ता. पाटण आणि रक्कम पाच हजार), अतुल रामचंद्र येवले (रा. गडकर आळी, सातारा आणि रक्कम ३0 हजार), दत्तात्रय कुंडलिक निकम (रा. साकुर्डी वस्ती, ता. कऱ्हाड, आणि रक्कम दोन लाख), राजाराम कांबळे (रा. मसूर, ता. कऱ्हाड आणि रक्कम ३0 हजार) यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपल्या तक्रारी वेगवेगळ्या स्वरूपात दिल्या असल्या तरी ठेवीची रक्कम वगळता आरोप आणि मजकूर एकच आहे.
दरम्यान, या अनुषंगाने आणखी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ‘एमपीआयडी अॅक्ट’ अंतर्गत कारवाई करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे.
पाचही तक्रारदारांनी संचालक तर लोचन सिंग, सुखदेव सिंग, गुरमित सिंग, सुब्रता भट्टाचार्य, प्रेमजित कांडा (सर्वजण सातवा मजला, गोपाळदास भवन, बराखांबा रोड, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली) यांच्यासह एजंट, कार्यालय व्यवस्थापक सोनावणे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी या सर्वांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेद्रे करत आहेत. (प्रतिनिधी)