भाजपकडून बेटी भगावचे काम चित्रा वाघ : राष्ट्रवादी भवनजवळ राम कदमांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:45 IST2018-09-05T22:43:55+5:302018-09-05T22:45:15+5:30
‘राज्यातील भाजप सरकार महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हे फक्त जाहिरातीतून सांगत आहे. मात्र, त्यांच्या पक्षाचे आमदार मुजोर झाले आहेत. भाजपचे धोरण हे बेटी बचाव नसून बेटी भगाव असे आहे,’ असे सांगून

भाजपकडून बेटी भगावचे काम चित्रा वाघ : राष्ट्रवादी भवनजवळ राम कदमांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
सातारा : ‘राज्यातील भाजप सरकार महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हे फक्त जाहिरातीतून सांगत आहे. मात्र, त्यांच्या पक्षाचे आमदार मुजोर झाले आहेत. भाजपचे धोरण हे बेटी बचाव नसून बेटी भगाव असे आहे,’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सहकारी महिलांसह आमदार राम कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
येथील शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेण्यात आली. मंत्री तावडे यांच्याकडे आमदार राम कदम यांच्याबद्दल निषेध व्यक्त करून सर्वजण राष्ट्रवादी भवनमध्ये आले. यावेळी वाघ यांच्यासह जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी भवनपासून पायी मोर्चा काढण्यात आला. आमदार राम कदम यांचा प्रतीकात्मक पुतळा चित्रा वाघ यांनी हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. महिलांच्या बाबतीत राम कदम किती मुजोर झाले आहात पाहा. ही घटना घडूनही ते माफी मागत नाहीत. मुलींना ते वस्तू समजतात का? भाजप शासनाच्या काळात गेल्या एक वर्षात ३३०० मुली गायब झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार काय करते, हा प्रश्न आहे. आता तर त्यांच्या पक्षाच्या आमदाराने बेताल वक्तव्य केले आहे, असे जोरदारपणे सांगितले. यानंतर मोर्चाने जाऊन पारंगे चौकात आमदार राम कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.