भाजप स्वार्थासाठी घटना पायदळी तुडवण्याचे काम करीत आहे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र
By प्रमोद सुकरे | Updated: December 2, 2025 17:21 IST2025-12-02T17:19:29+5:302025-12-02T17:21:29+5:30
लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिला नाही

भाजप स्वार्थासाठी घटना पायदळी तुडवण्याचे काम करीत आहे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र
कराड: राज्यात नगरपालिका निवडणुकांसाठी आज, मंगळवारी मतदान सुरु आहे. दरम्यानच, उद्या होणारी मतमोजणी २१ डिसेंबरला करण्याचा न्यायालयाने निर्णय दिला. ही सगळी परिस्थिती पाहता हा निवडणूक आयोगाचा व सरकारचा गोंधळ आहे. त्यामुळे हा भारताचा नव्हे तर मोदींचा निवडणूक आयोग असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना केली.
चव्हाण म्हणाले, खरंतर नगरपालिकेच्या निवडणुका ९/१० वर्षांनंतर होत आहेत. ७३/७४ वी घटनादुरुस्ती झाली. त्यानुसार दर ५ वर्षांनी स्थानिक स्वराज्य निवडणूका घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण राजकीय स्वार्थापोटी भाजपने घटना पायदळी तुडवत या निवडणुका पुढे पुढे ढकलण्याचे काम केले. अनेक वर्ष येथे प्रशासक लादले. लोकांचे अधिकार संपुष्टात आणण्याचा हा त्यांचा डाव आहे.
आता सरकार तर ही निवडणूक आयोगाची चूक आहे. त्यामुळे काही निवडणुका पुढे ढकलल्या, तर मतमोजणी पुढे गेल्याचे सांगत आहे. पण सरकारी वकील न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले हे ते सांगत नाहीत. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे भाजपचे सरकार करीत आहे.असेही चव्हाण म्हणाले.
लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नाही!
मुळातच लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिलेला नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकांचा विश्वास उडत चालला आहे. अशात आता मतदानानंतर मतमोजणी १७/१८ दिवस पुढे ढकलल्याने त्या गोडाऊन मध्ये राहणार आहेत. आता तेथे त्या मशिनशी काही छेडछाड होईल का हे माहित नाही असा प्रश्न उपस्थित केला.
जनता जागृत होणे गरजेचे
लोकशाही टिकवण्यासाठी जनता जागृत होणे गरजेचे आहे. जोपर्यत जनता जागृत होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. नाहीतर इथे हलक्या पावलांनी हुकूमशाही कधी येईल हे कळणार नाही असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.