Sangli Crime: हद्दपार गुन्हेगारासह साथीदाराकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:19 IST2025-12-02T19:18:55+5:302025-12-02T19:19:12+5:30
हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून तो कवठेपिरान येथे आला होता

Sangli Crime: हद्दपार गुन्हेगारासह साथीदाराकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, दोघांना अटक
सांगली : पैशाच्या देवाणघेवाणीतून मिरज तालुक्यातील एका गावात घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. पीडित महिलेने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद देताच तत्काळ हद्दपार गुन्हेगार सूरज संभाजी पाटील (वय ३२) व साथीदार राजेंद्र अरविंद शिंदे (वय २२, दोघे रा. कवठेपिरान) या दोघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सूरज संभाजी पाटील हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध खून, मारामारी तसेच एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मार्च २०२६ पर्यंत त्याला हद्दपारीची नोटीस बजावली आहे. परंतु हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून तो कवठेपिरान येथे आला होता.
कवठेपिरान येथील त्याचा साथीदार राजेंद्र शिंदे याने परिसरातील एका गावातील व्यक्तीस २० हजार रुपये उसने दिले होते. त्यापैकी १२ हजार रुपये परत मिळाले होते. उर्वरित पैसे लवकर मिळत नसल्यामुळे शिंदे हा सूरजला घेऊन रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास संबंधिताच्या घरी गेला. तेथे पीडित महिलेस शिवीगाळ करून विनयभंग केला. त्यामुळे पीडितेने सांगली ग्रामीण ठाण्यात रात्री साडेदहा वाजता येऊन फिर्याद दिली.
फिर्याद दाखल होताच पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तत्काळ कवठेपिरान येथे जाऊन दोघांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. दोघांना विनयभंग, गृहअतिक्रमण, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी अटक केली आहे. उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी, सहायक फौजदार मेघराज रुपनर, हवालदार बंडू पवार, अभिजीत पाटील, विष्णू काळे, हिम्मत शेख यांच्या पथकाने कारवाई केली.