सांगली, मिरज मतदारसंघात नगरसेवकांचे बळ कोणाच्या पदरात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 10:35 AM2019-10-03T10:35:03+5:302019-10-03T10:36:41+5:30

सांगली व मिरज या दोन मतदारसंघात पक्षांतर्गत गटबाजीमुळे काही नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, तर काहींनी छुपी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रचाराचा ज्वर चढल्यानंतर नगरसेवकांची भूमिका आणखी स्पष्ट होईल.

In whose ranks do corporators force? | सांगली, मिरज मतदारसंघात नगरसेवकांचे बळ कोणाच्या पदरात?

सांगली, मिरज मतदारसंघात नगरसेवकांचे बळ कोणाच्या पदरात?

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली, मिरज मतदारसंघात नगरसेवकांचे बळ कोणाच्या पदरात?महापालिकेत भाजपचे ४३, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक

शीतल पाटील

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सांगलीमिरज या दोन मतदारसंघात महापालिका नगरसेवकांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरली आहे. पाच वर्षात अनेक नगरसेवकांनी पक्ष, निष्ठा बदलल्या आहेत. त्यांच्या टोप्या व गळ्यातील पट्ट्यांचे रंगही बदलले आहेत. त्यात पक्षांतर्गत गटबाजीमुळे काही नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, तर काहींनी छुपी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रचाराचा ज्वर चढल्यानंतर नगरसेवकांची भूमिका आणखी स्पष्ट होईल.

महापालिका क्षेत्र दोन विधानसभा मतदारसंघात विभागले गेले आहे. त्यामुळे विधानसभेची हद्द बदलल्यानंतर सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी सोयीची भूमिका घेतली आहे. महापालिकेत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत. सत्ता भाजपची असून त्यांचे ४३ नगरसेवक आहेत, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक आहेत.

गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ निवडणुकीत आहेत. पण भाजपच्या नगरसेवकांतही सारे काही आलबेल नाही. माजी आमदार दिनकर पाटील यांनी बंडाचे निशाण फडकविल्याने त्यांच्या समर्थक नगरसेवकांची भूमिका काय राहणार, हे महत्त्वाचे आहे. त्यात स्थायी समिती सदस्य व सभापती निवडीवरून भाजपअंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने तेही नाराज आहेत. त्यामुळे हे नाराज नगरसेवक भाजपला हात दाखविण्याचे संकेत आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादीची महापालिका निवडणुकीतही त्यांची आघाडी होती. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांत गतवेळच्या तुलनेत चांगला समन्वय आहे. महापालिकेत मदन पाटील व विशाल पाटील यांचा गट आहे. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आदेश अंतिम असतो.

गेल्यावेळी राष्ट्रवादीने भाजपच्या आ. गाडगीळ यांना छुपी मदत केली होती. यंदा मात्र आघाडीचा धर्म पाळला जाणार असल्याचे नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. पण त्यातही काही नगरसेवकांचा भाजप नेत्यांशी घरोबा आहे. महापालिका निवडणुकीत भाजप नेत्यांनी मदत केल्याचे बोलले जाते. त्याचा पैरा ते फेडणार असल्याचीही चर्चा रंगली आहे.

मिरजेत सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांना भाजपचे नगरसेवक आनंदा देवमाने यांनी आव्हान देण्याची तयारी चालविली आहे. त्यांना भाजप नगरसेवकांची साथ मिळणार का? हाही प्रश्न आहे. त्यात खाडे यांचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कोण कोणाला मदत करतो, याचीच उत्सुकता आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बळ कोणाच्या पारड्यात पडणार, हे प्रचाराच्या रणधुमाळीवेळी स्पष्ट होईल.

Web Title: In whose ranks do corporators force?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.