महापालिकेतील भाजप महाआघाडीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:57 PM2019-09-05T23:57:58+5:302019-09-05T23:58:03+5:30

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून घेऊन भाजपने महापालिकेची सत्ता मिळविली. वर्षभर गुण्यागोविंदाने कारभार झाला. पण स्थायी समिती ...

On the way to the BJP front in the Municipal Corporation | महापालिकेतील भाजप महाआघाडीच्या वाटेवर

महापालिकेतील भाजप महाआघाडीच्या वाटेवर

Next

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून घेऊन भाजपने महापालिकेची सत्ता मिळविली. वर्षभर गुण्यागोविंदाने कारभार झाला. पण स्थायी समिती सदस्यांच्या निवडीवरून भाजपमध्ये पहिली ठिणगी पडली आहे. पूर्वाश्रमीचे काँग्रेसी भाजपच्या शिस्तबद्धतेमुळे अस्वस्थ झाले आहेत. ठिणगीचा वणवा पेटणार नाही, याची खबरदारी आता भाजप नेत्यांना घ्यावी लागेल. अन्यथा भाजपच्या सत्तेची वाटचालही महाआघाडीच्या दिशेने झाल्यास आश्चर्य वाटू नये.
काँग्रेस-राष्ट्रवादीमधील महत्त्वाकांक्षी नेत्यांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यातून ४० वर्षांची काँग्रेसची सत्ता घालविण्यात भाजपला यश आले. अनेकांनी या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण भाजपच्या सत्तेत खारीचा वाटा हा पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नगरसेवकांचाच आहे. भाजपचे संख्याबळ सहयोगी सदस्यांसह ४३ असले तरी, त्यापैकी १५ हून अधिक नगरसेवक हे पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. हे नगरसेवक व त्यांच्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेल्या नाहीत. सत्तेच्या चाव्या नेहमीच आपल्याकडे ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे.
विकास महाआघाडीच्या काळापासून सत्तेचे काटे नेहमीच फिरले आहेत. त्यामागे पदाची अपेक्षा होती. या अपेक्षा नेत्यांनी पूर्ण न केल्याने सत्तेचा बट्ट्याबोळ झाला होता. हा सारा खेळ शेवटच्या अडीच वर्षात रंगत असे. पण भाजपच्या सत्ताकाळात पहिले वर्ष संपता संपताच ठिणग्या उडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच महापौर बदलावरून हालचाली गतिमान झाल्या होत्या. पण या हालचाली लवकरच थंडावल्या. पण स्थायी समिती सदस्य पदावरून मात्र मोठी ठिणगी पडली आहे. महापालिकेची तिजोरी आपल्या हातात असावी, अशी साऱ्यांचीच अपेक्षा असते. भाजपचे पहिले सभापती म्हणून अजिंक्य पाटील यांची निवड झाली. पण त्यांच्या कारभारावर माजी आमदार दिनकर पाटील, कोअर कमिटीचे सदस्य सुरेश आवटी यांचे ‘लक्ष’ होते. त्यानंतर पुढचा सभापतीही मर्जीतीलच हवा, म्हणून काहीजणांनी फिल्डिंग लावली. पण त्याला भाजपच्या नेत्यांनी धक्का दिला.
पुढचा सभापती मिरजेचा होणार, अशी चर्चा होती. त्यासाठी पांडुरंग कोरे, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने अशी नावे चर्चेत होती. पण यापैकी एकालाही स्थायीत संधी मिळाली नाही. कोरे वगळता सुरेश आवटी गटाच्या दहा नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अगदी राजीनाम्याचाही इशारा दिला आहे. सभेला आवटी गटाच्या दहा सदस्यांसह खुद्द कोरेही गैरहजर होते. यातून त्यांची नाराजी उघड आहे.
महाआघाडीच्या काळातही आवटी गटाने पहिल्यांदा बंडाचे निशाण फडकविले होते. त्यानंतरचा इतिहास सांगलीकरांना माहीत आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळातही आवटी गट भाजपवासी झाला. त्यामुळे सत्तेचा लंबक नेहमीच झुकता राहिला. आताही भाजपमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे.
स्थायी सदस्य निवडी पूर्ण झाल्या. लवकरच सभापतीही निवडला जाईल. तोंडावरच विधानसभा निवडणुका असल्याने या नाराजांना भाजपचे नेते शांतही करतील. पण दीड वर्षानंतर होणाºया महापौर निवडीवेळी मात्र भाजपच्या नेत्यांना सावध भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा शेवटच्या अडीच वर्षात भाजपची ‘महाआघाडी’ झाली तर नवल नाही.

दिलीप सूर्यवंशी गटही : नाराज
महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात माजी नगरसेवक दिलीप सूर्यवंशी गटाची भूमिकाही महत्त्वाची ठरली होती. सूर्यवंशी गटाचे चार नगरसेवक आहेत. त्यांचे पुतणे धीरज सध्या उपमहापौर आहेत. गेल्या सव्वा वर्षात धीरज सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या राजकारणात चांगलाच जम बसविला आहे. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशीही त्यांचे सख्य आहे. सूर्यवंशी गटाने स्थायी समितीसाठी नगरसेवक संजय यमगर यांचे नाव सूचविले होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत यमगर यांचे नाव निश्चित असल्याचे सांगितले जात होते. पण अखेरीस यमगर यांचाही पत्ता कट झाला. त्यामुळे स्थायी सदस्यांची नावे सभागृहात वाचली जात असताना उपमहापौर धीरज सूर्यवंशी व्यासपीठावर नव्हते. ते सदस्यांत बसून होते. काहीजणांनी विनंती केल्यानंतर ते व्यासपीठावर गेले. यावरून त्यांच्या गटातही नाराजीचा सूर असल्याचे दिसून येते.

Web Title: On the way to the BJP front in the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.