Uttaraswara's Rathotsav in Attapadi in Sangli district with great enthusiasm | सांगली जिल्ह्यातील आटपाडीत उत्तरेश्वराचा रथोत्सव मोठ्या उत्साहात
सांगली जिल्ह्यातील आटपाडीत उत्तरेश्वराचा रथोत्सव मोठ्या उत्साहात

आटपाडी : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील उत्तरेश्वर देवस्थानच्या कार्तिक यात्रेत गुरुवारी रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवीन रथावर भाविकांनी  गुलाल व खोब-याची उधळण केली. संपूर्ण आटपाडीतून रथातून उत्तरेश्वर देवाची मिरवणूक काढण्यात आली.

यात्रेसाठी सागवानी नवीन रथ कर्नाटक राज्यातून बनवून आणला आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून तो देवस्थानला अर्पण करण्यात आला. पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख व त्यांच्या पत्नी ऐश्वर्या यांच्याहस्ते रथाची विधिवत पूजा झाली. त्यानंतर तो देवस्थान समितीला अर्पण करण्यात आला.

माजी आ. देशमुख, सरपंच वृषाली पाटील, अ‍ॅड. धनंजय पाटील यांच्याहस्ते रथोत्सव मिरवणुकीचे श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, माजी उपसभापती काकासाहेब पाटील, कलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप पाटील, संचालक अजयकुमार भिंगे, उपसरपंच प्रा. अंकुश कोळेकर, दिलीप माळी, बाबासाहेब माळी, राऊसाहेब सागर, जयंत नेवासकर, राहुल गुरव, सुरेश बालटे, बजरंग फडतरे, शशिकांत सागर, ग्रामपंचायतीच्या सदस्या सुवर्णा माळी, रेखा ऐवळे, स्वाती देशमुख, लक्ष्मी बालटे, नितीन सागर, बाळासाहेब मेटकरी, उमाकांत देशमुख, सर्जेराव राक्षे आदी उपस्थित होते. नंदकुमार पाठक, बाबूराव गुरव यांनी पौरोहित्य केले.

रथ ओढण्याचा मान माळी समाजास आहे. रथाचे पूजन मानकरी देशमुख व इनामदार घराण्यातील हर्षवर्धन देशमुख, अनिल देशमुख व इनामदार यांनी केले. ग्रामपंचायत कार्यालय, देशमुख गल्ली, एसटी बसस्थानक, कलेश्वर मंदिर, कासार गल्ली, मुख्य बाजारपेठ या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: Uttaraswara's Rathotsav in Attapadi in Sangli district with great enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.