अनोखी आदरांजली : गझलांच्या मैफलीत जागविल्या इलाहींच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:39 AM2021-02-12T10:39:11+5:302021-02-12T10:43:24+5:30

culture Sangli- भावार्थाने समृद्ध झालेल्या गझला, हृदयाला भिडणारे शेर आणि मनात दरवळणाऱ्या सुंदर गीतांनी सांगलीत दिवंगत गझलकार इलाही जमादार यांना आदरांजली वाहण्यात आली. संगीतकार, कवी, इलाहीप्रेमी व साहित्यरसिकांनी अभिवादन करतानाच इलाहींच्या गझलांचा या कार्यक्रमातून रसास्वाद घेतला.

Unique tribute: Memories of the gods awakened in the ghazal concert | अनोखी आदरांजली : गझलांच्या मैफलीत जागविल्या इलाहींच्या स्मृती

अनोखी आदरांजली : गझलांच्या मैफलीत जागविल्या इलाहींच्या स्मृती

Next
ठळक मुद्दे अनोखी आदरांजली : गझलांच्या मैफलीत जागविल्या इलाहींच्या स्मृती राजमती ग्रंथालयातर्फे सांगलीत 'गझलांजली'

सांगली : भावार्थाने समृद्ध झालेल्या गझला, हृदयाला भिडणारे शेर आणि मनात दरवळणाऱ्या सुंदर गीतांनी सांगलीत दिवंगत गझलकार इलाही जमादार यांना आदरांजली वाहण्यात आली. संगीतकार, कवी, इलाहीप्रेमी व साहित्यरसिकांनी अभिवादन करतानाच इलाहींच्या गझलांचा या कार्यक्रमातून रसास्वाद घेतला.

राजमती सार्वजनिक ग्रंथालय व इलाही जमादार मित्र परिवाराच्या वतीने नेमिनाथनगर येथे सांगली ट्रेडर्स सोसायटी सभागृहात 'गझलांजली' कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश पाटील, राजगोंडा पाटील, डी.व्ही. शेट्टी, अशोक रेळेकर, संजीव भरमगुडे, डॉ. नामदेव कस्तुरे, बाळासाहेब मिरजकर, इलाही जमादार यांचे बंधू बालेचांद जमादार, पुतणे सुहान जमादार आदी उपस्थित होते.

संगीतकार हर्षित अभिराज यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, इतके मोठे गझलकार आपल्या सांगली जिल्ह्यातील असूनही ते आपल्याकडून दुर्लक्षित राहिले. साहित्यप्रांतात त्यांनी दिलेले हे योगदान रसिक कधीही विसरणार नाहीत. अनेक दिग्ग्ज कलाकारांनी सांगलीचे नाव कला, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात गाजविले. इलाही जमादारसुद्धा अशा दिग्गजांच्या पंक्तीतील आहेत. त्यामुळेच त्यांना त्यांच्या गझलांमधूनच खरी आदरांजली वाहण्यात आली.

अभिराज म्हणाले की, इलाही जमादार हे मला गुरुस्थानी होते. त्यांच्या गझलांचे कौतुक केवळ मराठी रसिकांनीच केले नाही, तर दिवंगत लोकप्रिय गायक एस.पी. बालसुब्रमण्यम, संगीतकार, गायक पं. हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक दिग्गजांनीही केले. त्यामुळे मराठी रसिकांमध्ये, साहित्यात ते कायम जिवंत राहतील. त्यांच्या स्मृती शब्दांच्या, गझलांच्या माध्यमातून नेहमीच मनामनांत दरवळत राहतील. यावेळी गौस शिकलगार यांनी इलाही जमादार यांच्या कबरीजवळ सुचलेली गझल सादर करून रसिकांची मने जिंकली.

अभिराज यांनी 'निशिगंध तिच्या नजरेचा', 'शिक एकदा खरेच प्रीत तू करायला', 'लहरत लहरत, बहरत बहरत आली', 'चितेसारखे जाळ मला' या गझलांच्या गीतरचना सादर करून अनोखी आदरांजली वाहिली. इलाही जमादारांच्या शब्दांच्या जादूला रसिकांनी भरभरून दाद दिली.

अश्रूंनी वाहिली आदरांजली

इलाही जमादार यांचे बंधू बालेचांद जमादार यांना आदरांजली वाहताना अश्रू अनावर झाले. त्यांनी आपल्या बंधूंवर इतके लोक प्रेम करताहेत, हे पाहून मन भारावून गेल्याचे सांगितले. यावेळी वातावरण भावुक झाले होते.

इलाहींचे ग्रंथालयरूप स्मारक व्हावे

हर्षित अभिराज म्हणाले की, दुधगाव येथे इलाही जमादार यांचे एक ग्रंथालय स्वरूपात स्मारक व्हायला हवे. ज्याठिकाणी गझलांचा अभ्यास व प्रशिक्षणही असावे. यावर सुरेश पाटील यांनी याकामी सर्व ते सहकार्य आम्ही करू, असे आश्वासन दिले.

Web Title: Unique tribute: Memories of the gods awakened in the ghazal concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.