Sangli: कर्जासाठी दुसऱ्याच्या मिळकती तारण दिल्या, बँकेची सव्वा कोटीची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:28 IST2025-11-05T15:28:27+5:302025-11-05T15:28:49+5:30
तीन दिवस कोठडी, मुख्य संशयित पसार

Sangli: कर्जासाठी दुसऱ्याच्या मिळकती तारण दिल्या, बँकेची सव्वा कोटीची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
सांगली : बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्जासाठी दुसऱ्याच्या मिळकती तारण देत असल्याचे भासवून तासगाव येथील गवळी कुटुंबाने तब्बल १ कोटी ३७ लाख ३४ हजार ३९६ रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी वाई अर्बन बँकेचे व्यवस्थापक रोहित यशवंत जमखिंडीकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दोन संशयितांना शिताफीने अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
कर्जदार सतीश बाबासाहेब गवळी (वय ४६) आणि जामीनदार मारुती राजाराम गवळी (५३) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर मुख्य कर्जदार संगीता सतीश गवळी (३९), संतोष बाबासो गवळी (४९) आणि जामीनदार शिवलिंग दगडू पाखरे (७८, रा. चिंचणी, आडवा ओढा, ता. तासगाव, जि. सांगली) हे पसार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील नेमीनाथनगर परिसरातील गणपती मंदिरानजीक वाई अर्बन बँकेची शाखा आहे. त्या बँकेमधून ३० डिसेंबर २०१९ रोजी संशयित कुटुंबाने ७० लाखांचे कर्ज काढले होते. यासाठी तारण ठेवण्यासाठी त्यांच्याकडे अधिक मूल्यांकनासाठी काही नव्हते. त्यामुळे गवळी यांनी दुसऱ्याच्या मालकीच्या मिळकती तारण देत असल्याचे बँक अधिकाऱ्यांना भासवले. तशी बोगस कागदपत्रे तयार केली आणि बँकेकडून ७० लाखांचे कर्ज घेतले. दि. ३० सप्टेंबर २०२५ अखेर त्यांनी बँकेत कर्जाचे हप्ते भरले नाहीत.
त्यामुळे या कर्जाचे ७० लाखांचे व्याजासहित १ कोटी ३७ लाख ३४ हजार ३९६ रुपये झाले आहे. त्यांच्याकडे प्रत्यक्षात कर्जासाठी जमीन दाखवली होती व कागदपत्रे तयार केली होती, ती बनावट होती. त्यामुळे बँकेची फसवणूक झाली आहे. त्यामुळे बँकेने या पाच जणांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. अधिक तपास उपनिरीक्षक भोपळे या करत आहेत.
पाचही संशयित होते पसार
गुन्हा दाखल होताच पाचही संशयित पसार झाले होते. विश्रामबागच्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपळे आणि त्यांच्या पथकाने यातील सतीश गवळी व मारुती गवळी या दोघांना शिताफीने पकडून अटक केली आहे. न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.