६७ वर्षांत चारच महिला आमदार - सांगली जिल्ह्यात यावर्षी तीनच महिला रिंगणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:29 PM2019-10-11T22:29:34+5:302019-10-11T22:32:48+5:30

सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री अशोक पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तासगाव आणि सांगली विधानसभा मतदारसंघ सोडल्यास, सहा मतदारसंघात महिला उमेदवारच नाहीत.

Three women are in the field this year! | ६७ वर्षांत चारच महिला आमदार - सांगली जिल्ह्यात यावर्षी तीनच महिला रिंगणात!

६७ वर्षांत चारच महिला आमदार - सांगली जिल्ह्यात यावर्षी तीनच महिला रिंगणात!

googlenewsNext
ठळक मुद्देराजकारणात दुय्यम स्थानाबद्दल महिलांची सर्व राजकीय पक्षांबद्दल नाराजी

अशोक डोंबाळे ।
सांगली : जिल्ह्यात नेत्यांच्या मांदियाळीत महिलांचे नेतृत्व झाकोळले गेले आहे. जिल्ह्याच्या ६७ वर्षांच्या राजकारणात केवळ सरोजिनी बाबर, श्रीमती कळंत्रे (आक्का), शालिनीताई पाटील, सुमनताई पाटील या चौघींनाच आमदार पदाची संधी मिळाली आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंंगणात तर तीनच महिला उमेदवार आहेत.

जिल्ह्यात विधानसभेची पहिली निवडणूक १९५२ मध्ये झाली. या पहिल्याच निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातून श्रीमती कळंत्रे (आक्का), तर शिराळा विधानसभा मतदारसंघातून सरोजिनी बाबर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. या निवडणुकीत कळंत्रेआक्का व सरोजिनी बाबर या दोन्ही महिला विजयी झाल्या. त्यानंतर १९८० मध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून शालिनीताई पाटील यांना काँग्रेसकडून संधी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात नामदेवराव मोहिते निवडणूक मैदानात होते. या निवडणुकीमध्ये शालिनीताई यांना ४४ हजार ३४१, तर मोहिते यांना १४ हजार ७९९ मते मिळाली होती.

शालिनीतार्इंनी विक्रमी २९ हजार ५४२ मताधिक्य घेऊन विजय मिळविला होता. त्यानंतर ३५ वर्षांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर २०१५ मध्ये राष्ट्रवादीने सुमनताई पाटील यांना तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. सुमनताई पाटील विक्रमी एक लाख १२ हजार ९६३ मतांनी विजयी झाल्या.

राष्ट्रवादीने आता पुन्हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून सुमनताई पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार आहे. मात्र यावेळी कुमठे (ता. तासगाव) येथील सुमनताई पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत सुमनताई पाटील पुन्हा विजय खेचून आणणार का, हा चर्चेचा मुद्दा आहे. उर्वरित सात विधानसभा मतदारसंघात नारीशक्तीचा जयघोष करणाऱ्या एकाही पक्षाने महिलांना उमेदवारीच दिलेली नाही. सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री अशोक पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तासगाव आणि सांगली विधानसभा मतदारसंघ सोडल्यास, सहा मतदारसंघात महिला उमेदवारच नाहीत.

जिल्ह्यात १२ लाख २१ हजार २१३ पुुरुष आणि ११ लाख ५३ हजार ०८६ महिला मतदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आणि गावापासून महानगरांपर्यंत राजकीय क्षेत्रात महिलांची मोठी फळी उभी राहू लागली. जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेच्या महापौर पदापर्यंतची संधी त्यांना मिळाली. इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना स्वतंत्र आरक्षण असल्यामुळे गावगाड्यातील उपेक्षित, शोषितांना प्रथमच राजकारणाचे अवकाश मोकळे झाले.

राजकारणात महिलांसाठी राखीव जागांमुळे, त्यांच्या सहभागामुळे सर्वसामान्य महिलांचे जीवनमान बदलू लागले आहे. कालपर्यंत शेतात खुरपणारी, चूल आणि मूल सांभाळणारी, खरकटे काढणारी स्त्री पंचायतीत जाऊन गावाचा कारभार पाहू लागली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ५० टक्के राहिले, किमान १० टक्के तरी महिलांना संधी देण्याचे धाडस राजकीय पक्षांनी दाखविण्याची गरज होती. पण, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांनी सांगली जिल्ह्यातील महिलांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राजकारणापासून दूरच ठेवले आहे.


सांगली जिल्ह्यातील : महिला आमदार
आमदार मतदारसंघ पक्ष वर्ष
कळंत्रेआक्का मिरज काँग्रेस १९५२
सरोजिनी बाबर शिराळा काँग्रेस १९५२
शालिनीताई पाटील सांगली काँग्रेस १९८०
सुमनताई पाटील तासगाव-क.महांकाळ राष्ट्रवादी २०१५

सुमनताई पाटील यांना २0१५ च्या निवडणुकीत सव्वालाखाचे मताधिक्य.

Web Title: Three women are in the field this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.