Stable government matters more than party ideology | पक्षांच्या विचारधारेपेक्षा स्थिर सरकार महत्त्वाचे -विश्वजित कदम
पक्षांच्या विचारधारेपेक्षा स्थिर सरकार महत्त्वाचे -विश्वजित कदम

सांगली : पक्षांच्या वेगवेगळ््या विचारधारा असणे हा तात्त्विक मुद्दा आहे. विचारधारा किंवा सरकार स्थापनेच्या मुद्द्यापेक्षा लोकहिताचा संयुक्तिक कार्यक्रम घेऊन स्थिर सरकार देणे महत्त्वाचे आहे, असे मत कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच कदम सांगलीत आले होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्फूर्तीस्थळास अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, भाजप विचारसरणी नसलेला पक्ष आहे. अनेक राज्यात स्वत: वेगवेगळया आघाड्या करायच्या, मात्र इतरांनी तशी कृती केली की टीका करायची, असे त्यांचे धोरण आहे. सध्या राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि इतर पक्षांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वीस दिवस झाले तरी, सरकार स्थापन होत नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. ज्या पक्षाकडे सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत तयार होते, त्यांनी सरकार स्थापन करण्यास नकार देऊन राज्यावर वेगळी परिस्थिती आणली आहे. अशा परिस्थितीत राज्याला स्थिर सरकार कसे देता येईल, यासाठी राष्ट्रवादी, कॉँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही दिवसात या प्रयत्नांना यश मिळेल.

भाजपने आजवर अनेक राज्यात अत्यंत कमी संख्येने आमदार निवडून आलेले असतानाही, वेगवेगळ््या मार्गाने सत्ता बळकावली आहे. विचारधारा हा तात्त्विक मुद्दा आहे. आता सरकार बनवणे हा मुद्दा महत्त्वाचा नाही. तर येणाऱ्या पाच वर्षात सरकार स्थिर राहणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सुटले जातील, हे पाहिले पाहिजे. विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे. दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे, महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत देणे, ही गरजेची बाब आहे. त्यासाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांची चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रात स्थिर सरकार उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Stable government matters more than party ideology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.