ST Strike : प्रवाशांचे हाल, पण आमचंही जगणं बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 01:52 PM2021-11-24T13:52:35+5:302021-11-24T13:53:41+5:30

संतोष भिसे सांगली : एसटीच्या संपामुळे प्रवासी बांधवांचे हाल होताहेत, पण आमच्याही जगण्या-मरण्याचा प्रश्न गंभीर आहे अशी भूमिका एसटी ...

ST staff insists on your demand | ST Strike : प्रवाशांचे हाल, पण आमचंही जगणं बघा

ST Strike : प्रवाशांचे हाल, पण आमचंही जगणं बघा

googlenewsNext

संतोष भिसे
सांगली : एसटीच्या संपामुळे प्रवासी बांधवांचे हाल होताहेत, पण आमच्याही जगण्या-मरण्याचा प्रश्न गंभीर आहे अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली. संपामुळे प्रवाशांच्याही सहनशीलतेचा अंत पाहिला जातोय, त्यामुळे संपावरील तोडग्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

जिल्ह्यात ८ नोव्हेंबरपासून १०० टक्के संप सुरू आहे. आजवर १० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. बसस्थानके खासगी गाड्यांनी भरून गेली आहेत. त्यांच्याकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. स्थानकाबाहेरच ठिय्या मारून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. वडापसाठी दुप्पट आणि तिप्पट प्रवासभाडे आकारले जात आहे. त्यामुळे हा संप लवकरात लवकर मिटावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.

अब तक २७६

- संप सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आजवर २७६ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.

- सतरा कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात आले असून त्यामध्ये कंत्राटींचा समावेश आहे.

- त्याशिवाय प्रत्येक आगारात अनेकांना सेवामुक्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. कामावर या, अन्यथा कायमचे घरी जा असा इशारा दिला आहे.

प्रवाशांना त्रास, पण आमचे प्रश्नही महत्त्वाचेच

आमच्या संपामुळे प्रवाशांना त्रास होत असला, तरी आमचे प्रश्नही महत्त्वाचेच आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण झाल्याविना ते सुटणार नाहीत. आमच्या वेदना प्रवासी समजून घेतील अशी अपेक्षा आहे. - योगेश कांबळे, एसटी कर्मचारी

अत्यंत तुटपुंज्या वेतनावर आम्हांला घर चालवावे लागते. शासनाकडे वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. म्हणूनच विलीनीकरणाचा लढा सुरू केला आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.- नागराज कांबळे, एसटी कर्मचारी.

मागण्या योग्य, पण वेठीस धरू नका

ऐन दिवाळीत एसटी बंद राहिल्याने एसटीचे हक्काचे उत्पन्न बुडाले. खासगी वाहनांना जास्त पैसे देऊन आम्हांला प्रवास करावा लागला. एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर अडून राहू नये. - विनायक कोष्टी, प्रवासी, सांगली

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्यच आहेत, पण त्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाने केले, हे लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका ठेवावी. - लक्ष्मण कोळी, प्रवासी, तासगाव

संपामुळे १५ कोटींचे नुकसान

गेल्या १५ दिवसांत संपामुळे जिल्ह्यात एसटीला सुमारे १५ कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. भरघोस उत्पन्न देणारी पंढरपूरची कार्तिकी यात्राही सुनीसुनीच गेली. पुण्याला धावणाऱ्या काही खासगी शिवशाही गाड्यांमुळे थोडीफार प्रवासी वाहतूक सुरू आहे. सांगली, मिरज, शिराळा, विटा या आगारांचे नुकसान मोठे आहे.

Web Title: ST staff insists on your demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.