Sharad Pawar not threatening debt waiver | सरसकट कर्जमाफीची धमक मुख्यमंत्र्यांत नाही : शरद पवार
मणेराजुरी (ता. तासगाव) येथे मंगळवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रचार सभेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे भाषण झाले. यावेळी डावीकडून रोहित पाटील, अरूण लाड, अविनाश पाटील, आ. विश्वजित कदम, सुमनताई पाटील, अनिता सगरे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमणेराजुरीत सभा; गडकिल्ल्यात छमछम वाजवू पाहणारे सरकार हटवा

तासगाव : उद्योगपतींनी बुडवलेले ८१ हजार कोटींचे कर्ज सरकारने भरले. मात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची धमक मुख्यमंत्री आणि सरकारमध्ये नसल्याची टीका राष्टवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे मंगळवारी केली. शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांत छमछम वाजवू पाहणा-या सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्टÑवादीच्या उमेदवार, आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रचारार्थ पवार यांची सभा झाली. यावेळी आमदार पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, रोहित पाटील, राष्टÑवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अरुण लाड, अनिता सगरे, बाजार समितीचे सभापती जयसिंग जमदाडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे सरसकट कर्जमाफी करण्याची धमक नाही. आॅनलाईन कर्जमाफी देणार म्हणून सांगितले. ३१ टक्के शेतकऱ्यांना फायदा झाला; मात्र ६९ टक्के लोकांना छदामसुध्दा मिळाला नाही. आम्ही १२ टक्क्यांचे व्याज शून्य टक्क्यांपर्यंत आणले. आजही तसाच लाभ दिला जातो; मात्र हे सरकार याप्रश्नी उदासीन आहे.
पवार म्हणाले, महाराष्टÑ आमच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री सांगतात, मैदानात आमच्यासमोर पैलवान नसल्याचे सांगतात, पण मी त्यांना सांगितले, ‘मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे. कुस्तीचे काम तुमचे नव्हे’. अमित शहा प्रश्न विचारतात,‘पवार साहबने क्या किया’. हे मोदींचा हात धरून गुजरातमधून केंद्रात आले.

पाच वर्षांपूर्वी अमित शहा देशाला माहीत तरी होते का? महाराष्टÑात सत्ता यांची. यांनी काय केले हे सांगायचे सोडून पवारांनी काय केले, हे विचारतात. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी केले. त्यानंतर वीटसुध्दा टाकली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. भाजप सरकारने भूमिपूजन केले. त्याचीही पाच वर्षात वीट पडली नाही. महाराष्टÑाचे किल्ले सुधारणार, असे सांगून तेथे हॉटेल, बार काढण्याचा निर्णय या सरकारने घेतला. बार म्हटले की छमछम आलीच. जेथे शिवबांची तलवार तळपली, तिथे छमछम वाजवणार असतील, तर यासाठी सरकारला मते द्यायची का?

आबांना महाराष्ट्र विसरणार नाही
तासगाव कारखाना सुरू करण्याचा आर. आर. पाटील यांचा ध्यास होता. तो सुरू केला नाही. आबा गेल्याचे दु:ख आहे; मात्र आबांचा विचार महाराष्ट कदापी विसरणार नाही. आबांच्या विचारांसाठी सुमनतार्इंना निवडून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.
 


Web Title:  Sharad Pawar not threatening debt waiver
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.