Now a new construction of a proud farmer | स्वाभिमानी शेतकरीची आता नव्याने बांधणी

स्वाभिमानी शेतकरीची आता नव्याने बांधणी

ठळक मुद्देउर्जितावस्थेसाठी आंदोलन : रयत क्रांती संघटनेत शांतता

अशोक पाटील ।
इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मिळालेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. राज्यातील सत्तेतही वाटा मिळाला नाही. त्यामुळे संघटनेत मरगळ येण्याची भीती होती. म्हणून त्यांनी संघटनेला उर्जितावस्था देण्यासाठी बुधवारी शेतकरी आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढले. बुधवारी उग्र आंदोलन करून त्यांनी अजूनही ‘स्वाभिमानी’ची ताकद राज्यभर जिवंत असल्याचे दाखवून दिले. तर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती शेतकरी संघटनेत मात्र अद्याप शांतता दिसत आहे.

दक्षिण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ताकदीवर ज्यांनी निवडणुकीत यश मिळवले, ते सरकारबरोबर गेले. त्यामुळे शेतकरी त्यांच्यापासून दुरावले. परिणामी राजू शेट्टी यांचा लोकसभेला पराभव झाला. राज्यात त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. शेवटपर्यंत त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळेच आता त्यांनी ‘सात-बारा कोरा’ हे आंदोलन हाती घेऊन संघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच उग्ररूप धारण केले.

दरम्यान माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचा झेंडा रोवला. मुलगा सागर याला भाजपमध्ये पाठवले. भविष्यातील राजकीय खुर्ची भक्कम व्हावी, याची काळजी त्यांनी घेतली. दुसरीकडे राजू शेट्टी यांनी साखरसम्राट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी हातमिळवणी केली. याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला.

विधानसभेत भाजपची सत्ता येईल, म्हणून सदाभाऊ खोत यांची गाडी बेफाम होती. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोटारीवर ‘स्वाभिमानी’ने कडकनाथ कोंबड्या भिरकावत ‘रयत क्रांती’ला टार्गेट केले. ‘रयत क्रांती’ची हवा विरळ झाली. भाजपविरोधी महाविकास आघाडी सत्तेत आली. आणि खोत यांच्याकडे फक्त विधानपरिषदेचे सदस्यत्व राहिले.

अवकाळी पाऊस व महापुरामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला. त्यावेळी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले. परंतु महाविकास आघाडीने ते आश्वासन पाळले नाही. हाच मुद्दा पुढे करून शेतकरी संघटनेला उर्जितावस्था देण्यासाठी राजू शेट्टी हे पुन्हा आंदोलनाचे हत्यार घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. यातून संघटना खरंच बाळसं धरेल का, हे येणारा काळच ठरवेल.

  • पुन्हा एकत्र : आल्यास...

लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी एकत्र आले आहेत. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हाच धागा पकडत जर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटना पुन्हा एकत्र आल्या, तर वावगे ठरू नये.

Web Title:  Now a new construction of a proud farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.