शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संशोधने आत्मसात करावीत : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 07:38 PM2020-02-15T19:38:34+5:302020-02-15T19:40:35+5:30

गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलामध्ये दर्जेदार शिक्षणातून नवी पिढी घडविण्याचे काम होत असून या पुढील काळात या संस्थेने शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संशोधने आत्मसात करून नवी शिक्षण प्रणाली राबवावी, असे प्रतिपादन माजी केंद्रिय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज येथे केले.

New research in the field of education should be embraced: Sharad Pawar | शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संशोधने आत्मसात करावीत : शरद पवार

शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संशोधने आत्मसात करावीत : शरद पवार

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण क्षेत्रातील नवनवीन संशोधने आत्मसात करावीत : शरद पवारगुलाबराव पाटील संस्थेचा रौप्य महोत्सवी सांगता समारंभ संपन्न

सांगली : गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलामध्ये दर्जेदार शिक्षणातून नवी पिढी घडविण्याचे काम होत असून या पुढील काळात या संस्थेने शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संशोधने आत्मसात करून नवी शिक्षण प्रणाली राबवावी, असे प्रतिपादन माजी केंद्रिय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज येथे केले.

गुलाबराव पाटील संकुल मिरज येथे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट संस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रिय मंत्री मल्लीकार्जुन खर्गे होते.

समारंभास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार ऋतुराज पाटील, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

दिवंगत गुलाबराव पाटील यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांनी सहकार चळवळीला नवा विचार आणि नवी शक्ती दिली, असे गौरवोदगार काढून खासदार शरद पवार म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी सहकार संघाच्या माध्यमातून कतृत्ववान व्यक्तींचे जाळे निर्माण केले. त्यांच्या विचाराचा आणि कार्याचा वसा पृथ्वीराज पाटील यांनी जोपासला आहे. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून कित्येक डॉक्टर तयार करून रूग्णसेवेचे महान कार्य यशस्वीपणे चालविले आहे. त्यांनी या संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

गुलाबराव पाटील शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्वकांक्षी काम होत असून यापुढील काळात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रिय मंत्री मल्लीकार्जुन खर्गे यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी सहकारात भरीव काम केले असून त्यांचे विचार या संस्थेच्या माध्यमातून चिरंतन राहतील. शिक्षणाबरोबरच आचार विचार आणि संस्कार या गोष्टींना प्राधान्य देवून चांगल्या विचारधारेतून सामाजिक समानता आणि समता जोपासली जावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, स्वर्गीय गुलाबराव पाटील हे थोर आणि आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांचा वारसा पृथ्वीराज पाटील समर्थपणे सांभाळत आहेत. या संस्थेने यापुढील काळातही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वसा जोपासून समाज विकासात अग्रेसर रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील शिक्षण संस्थेतून उत्तम दर्जाचे काम होत असून जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नवनव्या शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. गुलाबराव पाटील यांनी सहकार चळवळ वाढविली आणि जोपासली असे गौरवोदगारही त्यांनी काढले.

या प्रसंगी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी गुलाबराव पाटील पुरस्कार तसेच आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरणही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्व. डॉ. पतंगराव कदम खुले सभागृहाचे आणि स्व. संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल नामकरण सोहळा पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला.

प्रारंभी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. समारंभास मिरज उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे, अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: New research in the field of education should be embraced: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.