‘मोहितें’च्या मनोमिलनाचा चेंडू ‘पवारां’च्या कोर्टात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:51 AM2021-03-04T04:51:41+5:302021-03-04T04:51:41+5:30

प्रमोद सुकरे लाेकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नजीकच्या काळात होऊ घातली आहे. ...

Mohite's match in Pawar's court! | ‘मोहितें’च्या मनोमिलनाचा चेंडू ‘पवारां’च्या कोर्टात!

‘मोहितें’च्या मनोमिलनाचा चेंडू ‘पवारां’च्या कोर्टात!

Next

प्रमोद सुकरे

लाेकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नजीकच्या काळात होऊ घातली आहे. ही निवडणूक ‘तिरंगी होणार की दुरंगी’ याबाबत खुद्द सभासदांमध्येच संभ्रमावस्था आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आहे; परिणामी ‘कृष्णा’तही महाविकास आघाडीचा सूर काहीजण आळवीत आहेत. त्यामुळे दोन माजी अध्यक्ष मोहितेंच्या मनोमिलनाचा चेंडू थोरल्या पवारांच्या कोर्टात गेला असून, ते काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

कृष्णा कारखान्यात भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले गटाची सत्ता आहे. वर्षभरापूर्वीच विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल संपला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे वर्षभराची मुदतवाढ संचालक मंडळाला लाभली आहे. एप्रिल-मे महिन्यात निवडणुकीची शक्यता आहे.

निवडणूकपूर्व प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, सभासद असणाऱ्या संस्थांचे ठराव मागविण्यात आले आहेत, तर ‘पॅनल प्रमुखांची वरात सभासदांच्या दारात’ पोहोचली आहे. सत्ताधारी सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सभासद बैठकांवर जोर दिला आहे, तसेच संस्थापक पॅनलचे प्रमुख, कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व रयत पॅनलचे प्रमुख, माजी अध्यक्ष डाॅ. इंद्रजित मोहिते यांनीही सभासद संपर्क दौरे वाढविले आहेत. त्यामुळे सध्यातरी कारखान्यात तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपने मध्यंतरी याचे बुरूज ढासळण्याच्या प्रयत्न केला; पण राज्यात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने ढासळलेले बुरूज सावरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस प्राधान्याने करीत आहे. त्यामुळे भाजपच्या ताब्यात असणारा ‘कृष्णा’ कारखाना काढून घेण्यासाठी काही व्यूहरचना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कारखान्यात महाविकास आघाडीचे पॅनल असावे, असा सूर उमटत आहे.

नुकतीच मुंबईत यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. माजी मुख्यमंत्री व दोन विद्यमान मंत्र्यांची यावेळी उपस्थिती होती. त्याच बैठकीतील चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर बुधवारी एका शिष्टमंडळाने घातली. ‘कृष्णा’त सत्तांतर करावयाचे असेल तर काय करावे लागेल याची थोडक्यात माहितीही एका मंत्र्याने पवार यांना दिल्याचे खात्रीशीर समजते. त्यामुळे आता डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाचा चेंडू थोरल्या पवारांच्या कोर्टात गेला आहे. आता यावर ‘जाणता राजा’ नेमका काय मार्ग काढणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.

चौकट :

दोघेही पवारांच्या जवळचे ...

कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते हे दोघेही शरद पवारांच्या जवळचे मानले जातात. इंद्रजित मोहिते हे काँग्रेस विचाराच्या पठडीतील आहेत, तरीही राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी इंद्रजित मोहिते कारखान्याचे अध्यक्ष असताना त्यांना साखर संघाचे उपाध्यक्ष, डिस्टिलरी असोसिएशनचे अध्यक्ष, प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष, अशी पदे भूषविण्याची संधी दिली होती, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला यापूर्वी दहा वर्षे त्यांनी विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे आणि पुढील दहा वर्षांसाठी विश्वस्त म्हणून त्यांची निवड झाली आहे. अविनाश मोहिते हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यामुळे हे दोन्ही मोहिते थोरल्या पवारांचा शब्द प्रमाण मानणारे आहेत, हे नक्की !

Web Title: Mohite's match in Pawar's court!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.