‘स्वच्छ भारत’च्या दिखाव्यासाठी ३५ लाखांची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:24 AM2019-11-22T00:24:20+5:302019-11-22T00:24:32+5:30

दत्ता पाटील । तासगाव : दोन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तब्बल ३५ लाखांचा चुराडा सुशोभिकरणाच्या नावाखाली करण्यात आला होता. ...

Lacs of 2 lakhs for the appearance of 'Swachh Bharat' | ‘स्वच्छ भारत’च्या दिखाव्यासाठी ३५ लाखांची उधळपट्टी

तासगाव नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत साडेपाच लाख रुपये खर्चून केलेले रस्ता सुशोभिकरणाचे काम.

Next

दत्ता पाटील ।
तासगाव : दोन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तब्बल ३५ लाखांचा चुराडा सुशोभिकरणाच्या नावाखाली करण्यात आला होता.
सांगली रस्त्यावर कापूर ओढ्यानजीक पालिकेने साडेपाच लाख रुपये खर्चून केलेले सुशोभिकरणाचे काम बेकायदेशीर असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे पालिकेच्या बेकायदा कामाचे कारनामे चव्हाट्यावर आले आहेत. जनतेच्या पैशाची बेकायदा कामांवर उधळपट्टी कशासाठी करण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी नगरपालिकेवर आहे. शहरात अतिक्रमणे होऊ नयेत, झालेली अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी पालिकेवरच आहे. मात्र पालिकेकडून नागरिकांना नियमाची जाणीव करून देण्याऐवजी, नियम धाब्यावर बसवून काम सुरु असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. केवळ निमयांची पायमल्लीच नव्हे, तर शहरातील जनतेच्या हितासाठी मिळालेला लाखो रुपयांचा निधी बेकायदा कामांवर खर्च केला आहे.
यापूर्वी लाखो रुपयांच्या बेकायदा कामाचे कारनामे चव्हाट्यावर आले होते. असाच एक बेकायदा कामाचा कारनामा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईमुळे चव्हाट्यावर आला आहे.
तासगाव ते सांगली रस्त्यावर कापूर ओढा पुलानजीक दोन वर्षापूर्वी रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी सुशोभिकरण करण्यात आले होते. दोन्ही रस्त्यांच्या मधोमध बाजूला पेव्हिंग ब्लॉक बसवून मध्ये माती ओतण्यात आली होती. त्यावर शोभेची झाडे लावण्यात आली. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. या कामासाठी साडेपाच लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र हे काम करताना बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली नाही.
दोन वर्षे हे काम कायम होते. मात्र यावेळी पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूने पाणी जाण्यासाठी गटारीची व्यवस्था नव्हती. पाऊस पडल्यानंतर रस्त्यालाच गटारींचे स्वरुप येत होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ होत होतीच किंंबहुना रस्ताही खराब झाला. पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पालिकेने केलेले सुशोभिकरणाचे काम पूर्णपणे उखडून टाकले. या कामापासून पुढे काही अंतरावरदेखील सुशोभिकरण करण्यात आले आहे. हे काम काढून घेण्याबाबत बांधकाम विभागाकडून पालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. आठ दिवसांत हे काम काढले नाही, तर पुन्हा बांधकाम विभागाकडून हे काम काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या बेकायदा कामाचा कारनामा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला असून जनतेच्या पैशाची बेकायदेशीर उधळण होत असल्यामुळे नागरिकांतून मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बेलगाम कारभार; नियमांना फाटा
दोन वर्षांपूर्वी शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मोहीम सुरु होती. या मोहिमेअंतर्गत पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वच्छता आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली तब्बल ३५ लाख रुपयांची उधळपट्टी केली. कोणतीही परवानगी नसताना, नियमांना फाटा देत पालिकेने केलेली कामे आता उखडून टाकली जात आहेत. इतकेच नव्हे, तर याच काळात निधी खर्ची पडलेल्या कामांचा मागमूसदेखील राहिला नाही. त्यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाºया कारभाºयांचा कारभार बेलगाम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Lacs of 2 lakhs for the appearance of 'Swachh Bharat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.