रोहित पाटील यांची बाजी, तर विश्वजित कदम यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 04:04 PM2022-01-20T16:04:04+5:302022-01-20T16:04:50+5:30

कडेगावमध्ये काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपने सत्तांतर घडवले, तर खानापूरला शिवसेना-काँग्रेसच्या आघाडीने सत्ता राखली.

In the Nagar Panchayat elections, Minister of State Vishwajit Kadam was defeated and Rohit Patil won | रोहित पाटील यांची बाजी, तर विश्वजित कदम यांना धक्का

रोहित पाटील यांची बाजी, तर विश्वजित कदम यांना धक्का

Next

सांगली : नगरपंचायत निवडणुकीत कवठेमहांकाळमध्ये सर्वपक्षीय पॅनलला, तर कडेगावमध्ये कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कवठेमहांकाळला आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने बाजी मारली. कडेगावमध्ये काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपने सत्तांतर घडवले, तर खानापूरला शिवसेना-काँग्रेसच्या आघाडीने सत्ता राखली. जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल काल, बुधवारी जाहीर झाला.

कवठेमहांकाळची लढाई आबांच्या मुलाने जिंकली

संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीत धक्कादायक निकाल लागला. शिवसेनेचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे, भाजपचे खासदार संजयकाका पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे-गजानन कोठावळे यांनी शेतकरी विकास आघाडी स्थापन केली होती. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल उभे केले. राष्ट्रवादीने १७ पैकी १० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली. शेतकरी विकास आघाडीला सहा जागांवर समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्ष निवडून आला. निवडणुकीत आपल्याला एकटे पाडल्याचा रोहित पाटील यांचा मुद्दा त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला.

कडेगावात भाजपची मुसंडी

कडेगाव नगरपंचायत म्हणजे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे ‘होमग्राउंड’ आहे. काँग्रेसकडे असलेली नगरपंचायतीची सत्ता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलने हस्तगत केली. भाजपला ११, काँग्रेसला ५, तर राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांच्या पॅनलला एका जागेवर विजय मिळाला. काँग्रेस-राष्ट्रवादीतील मतविभागणी भाजपच्या पथ्यावर पडली.

खानापुरात काँग्रेस-शिवसेनेची सत्ता अबाधित

खानापूरमध्ये काँग्रेस व शिवसेनेची संयुक्त सत्ता अबाधित राहिली. मात्र, दोन्ही पक्षांची प्रत्येकी एक जागा कमी झाली. काँग्रेसचे नेते, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, सुहास शिंदे आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीला ९ जागा, तर राष्ट्रवादीप्रणीत विरोधी जनता आघाडीला ७ जागा मिळाल्या. एका जागेवर अपक्ष निवडून आला.

महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी विजय

सांगली महापालिकेच्या प्रभाग १६ मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे तौफिक शिकलगार यांनी एकतर्फी विजय मिळविला. त्यांनी भाजपचे अमोल गवळी यांचा ३९९५ मतांनी पराभव केला. काँग्रेसने खणभागातील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. शिकलगार यांना ७४२९, भाजपचे गवळी यांना ३४३४, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांना ५३५, तर अपक्ष सुरेश सावंत यांना ५८७ मते मिळाली.

Web Title: In the Nagar Panchayat elections, Minister of State Vishwajit Kadam was defeated and Rohit Patil won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.