दादा-भाऊ, आपण नाही तिकडं लक्ष द्यायचं...आपण आपलं राजकारण करत राहायचं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:25 AM2021-04-10T04:25:43+5:302021-04-10T15:36:53+5:30

दादा अन्‌ भाऊंनी खरंच जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातलाय. अर्थात ‘वरून’ आदेश आला होताच ! त्यानिमित्तानं मिरजेच्या भाऊंचं बऱ्याच दिवसांनी रस्त्यावरचं दर्शन घडलं.

Maharashtra Coronavirus Lockdown restrictions and politics | दादा-भाऊ, आपण नाही तिकडं लक्ष द्यायचं...आपण आपलं राजकारण करत राहायचं!

दादा-भाऊ, आपण नाही तिकडं लक्ष द्यायचं...आपण आपलं राजकारण करत राहायचं!

googlenewsNext

>> श्रीनिवास नागे

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं महाआघाडी सरकारनं कडक निर्बंध जाहीर केले. बाजारपेठांना टाळं ठोकायचे आदेश काढले अन्‌ तमाम भाजपेयींना संधी मिळाली. निर्बंध आणि लाॅकडाऊनच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले. सांगलीत दणकून मोर्चा निघाला. कचकून गर्दी जमली. दादा अन्‌ भाऊ हे सांगली-मिरजेचे दोन्ही आमदार भरउन्हात नेतृत्व करत होते. सोबतीला भाजपेयी पदाधिकारी अन्‌ दादांची यंग टीम होती. सगळे कसे खांद्याला खांदा लावून सहभागी झाले. फिजिकल डिस्टन्सिंग अन्‌ जमावबंदीची ‘ऐशी की तैशी’! होऊ दे संसर्ग, फैलावू दे कोरोना... पण गर्दी दिसली पाहिजे. गुन्हे दाखल होऊ देत, पण दादा-भाऊ, आपण नाही तिकडं लक्ष द्यायचं...मंत्र्यांच्या बैठका अन्‌ कार्यक्रमांची गर्दी कशी चालते, असं सोशल मीडियावरून विचारत रहायचं. असाच जळजळीत लोकभावनेचा मुद्दा हातात घेत चालायचं.

---------------------

दादा अन्‌ भाऊंनी खरंच जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातलाय. अर्थात ‘वरून’ आदेश आला होताच ! त्यानिमित्तानं मिरजेच्या भाऊंचं बऱ्याच दिवसांनी रस्त्यावरचं दर्शन घडलं. दादा मात्र हल्ली समांतर पुलाच्या वगैरे अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लढताना दिसतात हं. महागाईनं मध्यमवर्गासह सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. पेट्रोल-डिझेलनं दराची शंभरी गाठलीय. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर पाच महिन्यांत सव्वादोनशेनं महागलाय. हे प्रश्न केंद्राच्या म्हणजे भाजपच्या (पक्षी : मोदीजींच्या) अखत्यारित येतात, म्हणून त्याविरोधात दादा-भाऊ रस्त्यावर कधी उतरलेले दिसले नाहीत.. अशी टिवटिव विरोधक करत असतात. आता तर सांगली-मिरजेतले मतदारही आपसात विचारू लागलेत. पण दादा-भाऊ, आपण नाही तिकडं लक्ष द्यायचं...

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रतिबंधक लसीकरण जोमानं सुरू झालंय. लसीकरणाचे फायदे दिसून आल्यानं आणि ४५ वर्षांवरील सगळ्यांनाच ती मिळणार असल्यानं लाभार्थींची संख्या झपाट्यानं वाढायला लागलीय. पण गेल्या चार दिवसांत सगळ्या महाराष्ट्रात लसीच कमी पडायला लागल्यात. सांगलीत तर दोन दिवसांपासून हळूहळू लसीकरण मंदावलं अन्‌ शुक्रवारी सकाळी साठा संपल्यानं ते पूर्णत: थांबलंच. ही लस केंद्र सरकारकडून राज्यांना पुरवण्यात येते. पण केंद्रानं पुरवठाच आवळलाय. भाजपचं सरकार असलेल्या राज्यांना जादा, तर अन्य राज्यांना कमी लस देण्यात येताहेत, याची आकडेवारीच समोर आलीय. महाराष्ट्रात लस वाया जाण्याचं प्रमाणही इतरांच्या तुलनेत कमी दिसतंय. तरीही पुरवठा कमी. नव्याने पुरवठा कधी आणि किती होणार, याची निश्चित माहिती नाही. राजकारणाचे वाभाडे निघताहेत. यावर दादा किंवा भाऊंनी त्यांच्या नेत्यांच्या मदतीनं केंद्राकडं मागणी केल्याचं ऐकीवात नाही, लसपुरवठा त्यांना ज्वलंत प्रश्न वाटतच नाही, असं काही नतद्रष्ट म्हणतात. पण दादा-भाऊ, आपण नाही तिकडं लक्ष द्यायचं...

------------------

सांगलीतल्या समांतर पूल उभारणीआधी बाजारपेठेत काहूर उठलंय. बाजारपेठेतील दादांचे हक्काचे मतदार नाराज झालेत. सांगली-पेठ रस्त्यासाठी ३५० कोटी मंजूर झाल्याचं सांगणाऱ्या दादांना गडकरींनी केवळ २२ कोटी डागडुजीसाठी दिल्यानंतर तोंडावर पडायला झालं. तिकडं मिरजेतही छत्रपती शिवाजी रस्त्यासाठी शंभर कोटी आणल्याचा ढोल वाजवणाऱ्या भाऊंना अद्याप या रस्त्यावरच्या खड्ड्यातूनच जावं लागतंय. दोन्ही शहरातल्या मुख्य रस्त्यावरच्या चिडलेल्या व्यापारी-विक्रेत्यांच्या तोंडावरून हात तर फिरवलाच पाहिजे ना ! मग त्यासाठी अशा मोर्चाची संधी वाया का घालवायची, असंही काहीजण बडबडतात. पण दादा-भाऊ, आपण नाही तिकडं लक्ष द्यायचं...आपण आपलं राजकारण करत रहायचं !

----------------------

जाता-जाता : दादा-भाऊंनी काढलेल्या मोर्चात भाजपेयींसोबत काही व्यापारी, विक्रेते सहभागी होते. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलेल्या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेही होते, पण विनामास्क ! तसे ते कोरोनाला रोग मानतच नाहीत अन्‌ मास्क वापरणं म्हणजे त्यांना ‘येडेपणा’च वाटतो. ‘कोरोनानं मरणारी माणसं जगण्यास लायकच नाहीत’, असं वक्तव्य करून त्यांनी नेहमीसारखी खळबळ उडवून दिली. मोर्चा, मोर्चाचा उद्देश, आयोजक राहिले बाजूला, पण सोशल मीडियापासून सगळ्या प्रसारमाध्यमांत भिडेंनीच फुटेज खाल्लं... पण दादा-भाऊ, आपण नाही तिकडं लक्ष द्यायचं.

Web Title: Maharashtra Coronavirus Lockdown restrictions and politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.