इथेच कर्ज घ्या अन् इथेच गुंतवणूक करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:59 PM2019-09-05T23:59:29+5:302019-09-05T23:59:33+5:30

श्रीनिवास नागे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कडकनाथ प्रकरणातून सुधीर आणि संदीप मोहितेने गुंतवणूकदारांना पद्धतशीर गंडा घातला. त्यासाठी ...

Get a loan here and invest here ... | इथेच कर्ज घ्या अन् इथेच गुंतवणूक करा...

इथेच कर्ज घ्या अन् इथेच गुंतवणूक करा...

googlenewsNext

श्रीनिवास नागे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कडकनाथ प्रकरणातून सुधीर आणि संदीप मोहितेने गुंतवणूकदारांना पद्धतशीर गंडा घातला. त्यासाठी ‘रयत’चे नाव ‘महारयत’ करून कंपन्यांची साखळीच तयार केली. वेगवेगळ्या उद्देशाने नऊ वेगवेगळ्या कंपन्या काढल्या. कोंबडी खाद्याच्या निर्मितीसाठी कारखाना सुरू केला. गुंतवणूकदारांसाठी कर्ज देण्याचीही सोय या महाठगांनी केली. त्यासाठी महारयत निधी लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. इथेच कर्ज घ्या आणि इथेच गुंतवा, हे त्यामागचे सूत्र!
कडकनाथ कोंबडी पालनाच्या साखळी योजनेत गुंतवणूकदार फशी पडत असल्याचे पाहून सुधीरने कंपनीचा विस्तार सुरू केला. संचालक जमा केले. काहींना तर फसवून संचालक बनवले. अटक करण्यात आलेला अंबक-चिंचणीचा हणमंत जगदाळे त्यातलाच. झेरॉक्स आणि पेपर विकण्याचा व्यवसायातून संसाराचा गाडा कसाबसा ओढणारा. सुधीर आणि तो खासगी क्लासेस चालवत. त्या ओळखीतून कोंबडीपालनासाठी कंपनी काढू म्हणून सुधीरने नोंदणीवेळी त्याच्या सह्या घेतलेल्या.
मग ‘रयत’मधून महारयत अ‍ॅग्रो, महारयत निधी बँक लिमिटेड, झेडएम मल्टिसर्व्हिसेस, रयत रेस्टो हॉटेल्स, महारयत अ‍ॅग्रो फिडस् अ‍ॅन्ड फूड्स, महारयत फाऊंडेशन, रयत हॅचरीज, रयत चिकन, महारयत एज्युकेशन इन्स्टिट्यूट या आणखी नऊ कंपन्या काढल्या. काही नुसत्याच कागदावर, तर काही प्रत्यक्ष कार्यरत. अ‍ॅग्रो फिडस् अ‍ॅन्ड फूड्स कंपनी संदीपच्या नावावर. या कंपनीकडून कोंबडी खाद्याची निर्मिती होते. त्याचा कारखाना इस्लामपुरात काढण्यात आला. गुंतवणूकदारांना तेथूनच खाद्याचा पुरवठा व्हायचा.
महारयत अ‍ॅग्रोमध्ये रोहित पुराणिक, प्रीतम माने, मृगेंद्र कदम, विजय शेंडे यांनाही संचालक केले, तर गणेश शेवाळे, मनोज देशमुख, वसीम इबुशे हे स्टार प्रचारक. यातला गणेश शेवाळे राजकीय कार्यकर्ता. शेतकरी संघटनांशी संबंधित. नेत्यांच्या मोटारीतून फिरणारा, त्यांच्या पोरांची पाठराखण करणारा.
जोरात जाहिरातबाजी झाली. सुधीरच्या मुलाखती चॅनेल्सवर झळकल्या. ही ‘यशोगाथा’ महाराष्टÑासह शेजारच्या कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगडपर्यंत गेली. यांचे सुरुवातीचे ‘टार्गेट’ होते सामान्य शेतकरी. नंतर बागायतदार, सेवानिवृत्त शिक्षक-नोकरदार, बेरोजगार, छोटे व्यावसायिक यांनाही भुरळ घातली गेली. सायकलवर फिरणाऱ्याला मर्सिडिस मोटारीतून फिरण्याचे स्वप्न दाखवले गेले. कमी भांडवलात, कमी वेळेत चांगला नफा मिळतोय म्हटल्यावर गुंतवणूकदार वाढले. गुंतवणुकीची रक्कम रोखीनेच घेतली जायची. ज्यांची पैशाची जुळणी होत नव्हती, त्यांच्यासाठी कर्ज देण्याचीही सोय या महाठगांनी केली. त्यासाठी महारयत निधी या कंपनीची स्थापना झाली.
कंपनी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करार करून घ्यायची. ‘आमची कंपनी रेशीम, मत्स्य, कुक्कुटपालन व शेळीपालनाचा व्यवसाय करत आहे. या माध्यमातून लोकांना प्रशिक्षण देणे, व्यवसाय उभा करून देणे, व्यवसायातून तयार होणारा माल खरेदी करणे ही उद्दिष्टे आहेत. कंपनी अंडी आणि पक्षी खरेदीची हमी देते. कंपनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करत नाही.’ हा त्यावरचा छापील मजकूर. मात्र त्यावरच्या सह्या बोगस. शिवाय सह्यांखाली नावांचा उल्लेखच नाही! प्रकरण उघडकीस आल्यावर गुंतवणूकदारांना हे समजलं! सगळाच बोगस व्यवहार!
राजकीय नेतेही बनले ‘अडकनाथ’
‘कडकनाथ’चा गंडा घालून घेण्यात राजकीय मंडळीही कमी नाहीत! काही कार्यकर्त्यांनी जमिनीचे तुकडे विकून, कर्ज काढून कोंबड्यांची शेड उभी केली. कामेरीच्या एकाने पंधरा लाख या धंद्यात लावले, तर इस्लामपुरातील भाजपच्या बड्या पदाधिकाºयाने २६ लाखाच्या कोंबड्या घेऊन झोकदार पोल्ट्री फार्म काढला. कंपनीने हात वर केल्यावर हे सगळे तोंड मिटून गप्प आहेत. (क्रमश:)

Web Title: Get a loan here and invest here ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.