पाण्याखाली गेलेल्या पूलांची तपासणी करा : डॉ. दिपक म्हैसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:09 PM2019-08-17T13:09:05+5:302019-08-17T13:21:47+5:30

सांगली जिल्ह्यातील पूर ओसरला असून पाण्याखाली गेलेले पूल वाहतूक योग्य असल्याबद्दल संबंधित यंत्रणेने तपासणी करून घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी साशंकता आहे अशा पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. शासकीय इमारती, शाळा, समाज मंदिरे, अंगणवाडी, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय निवासस्थाने आदिंची तपासणी करून घ्यावी. नुकसानीच्या अनुषंगाने प्रत्येक यंत्रणेने पंचनामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले.

Examine the underwater bridges: Deepak Mhasecar | पाण्याखाली गेलेल्या पूलांची तपासणी करा : डॉ. दिपक म्हैसेकर

पाण्याखाली गेलेल्या पूलांची तपासणी करा : डॉ. दिपक म्हैसेकर

Next
ठळक मुद्देपाण्याखाली गेलेल्या पूलांची तपासणी करा : डॉ. दिपक म्हैसेकरआवश्यक तेथे स्ट्रक्चरल ऑडिट, पंचनामे गतीने पूर्ण कराबालभारतीकडून पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार

सांगली : जिल्ह्यातील पूर ओसरला असून पाण्याखाली गेलेले पूल वाहतूक योग्य असल्याबद्दल संबंधित यंत्रणेने तपासणी करून घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी साशंकता आहे अशा पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. शासकीय इमारती, शाळा, समाज मंदिरे, अंगणवाडी, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय निवासस्थाने आदिंची तपासणी करून घ्यावी. नुकसानीच्या अनुषंगाने प्रत्येक यंत्रणेने पंचनामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले.

जिल्ह्यातील पूर ओसरला असून मदत कार्य गतीने सुरू आहे. याबाबतची पाहणी करण्यासाठी व विविध यंत्रणांचा कामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सांगली जिल्ह्याला भेट दिली. वाळवा तालुक्यातील शिरगाव व पलूस तालुक्यातील बुर्ली येथे भेट देवून आरोग्य सुविधा, पाणीस्थिती, निधी वाटप, मदत केंद्रांचे कार्य याबाबतची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.

यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, विभागीय उपायुक्त दिपक नलवडे, गुड्डेवार, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

पूरबाधित गावांमध्ये घरे, पशुधन, कृषि आदिंबाबतचे पंचनामे व सर्व्हे तात्काळ पूर्ण करा असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, आजपर्यंत सुमारे 433 घरांची पूर्णता पडझड झाली असून 2 हजार 997 घरांची अंशत: पडझड झाली आहे. दुर्घटना होवू नये म्हणून पडझड झालेली घरे शासकीय यंत्रणामार्फत पाडली जावीत. जी घरे, इमारती धोकादायक असतील ती तात्काळ नागरिकांनी रिकामी करावीत. किती घरे राहण्यायोग्य आहेत याचे सर्व्हेक्षण शास्त्रशुध्द पध्दतीने व्हावे. याबाबतची ग्रामीण भागातील जबाबदारी तहसिलदार तर शहरी भागात महानगरपालिका यांची राहील. सानुग्रह अनुदानाच्या रक्कमा देत असताना बँकांनी आवश्यक खबरदारी घेवून रक्कम योग्य व्यक्तीच्या खात्यावर वर्ग होईल याची दक्षता घ्यावी.

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, सार्वजनिक बांधकामकडील 1466 रस्त्यांपैकी 484 कि.मी. चे 73 रस्त्यांचे 186 कोटी 25 लाख रूपयांचे नुकसान झाले असून ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे तेथे रस्त्यांचे डांबरीकरण करून वाहतूकयोग्य करण्यात येत आहेत. जे पूल पाण्याखाली होते त्यांची वाहतूक योग्य असल्याबाबतची तपासणी करावी. ज्या ठिकाणी शंका असेल तेथे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. किती पुलांची उंची वाढविणे आवश्यक आहे त्या दृष्टीनेही सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व्हे करावा.

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या धान्य वाटपाचा एकूण 3 हजार 336 कुटुंबांना 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ अन्नधान्य वाटप करण्यात आले असून ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत असल्याने पीठ गिरण्या बंद आहेत त्या ठिकाणी गव्हाचे पीठ देण्यात यावे. प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या मदत स्वीकृती व वितरण केंद्राकडे ज्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे, त्याची मागणी विभागीय स्तरावर करावी. ती उपलब्ध करून देण्यात येईल.

पाणीपुरवठा योजना तात्काळ दुरूस्त करून शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरू करावा. ग्रामीण भागातील ज्या पाणीपुरवठा योजना बंद आहेत त्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, पूरबाधित गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यापूर्वी ते स्वच्छ व पिण्यायोग्य आहे याची खात्री करा.

ज्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू आहे तथापि पाणी पिण्यायोग्य नाही त्या ठिकाणी टँकर्सव्दारे स्वच्छ पाणीपुरवठा करा. टँकरमधील पाण्याची क्वालिटी तपासण्याची जबाबदारी प्राधान्याने आरोग्य सेवकांची राहील. जलजन्य आजार होणार नाहीत याबाबतची सर्वतोपरी दक्षता घ्या. स्वच्छतेसाठी मागणी करण्यात आलेली फॉगींग मशीन, पोर्टेबल जेटींग मशिन, हँडपंप, टीसीएल पावडर, डस्टींग पावडर आदि स्वच्छता विषयक साधनसामुग्रीही प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल.

पूरस्थितीमुळे 229 गावातील 66098.5 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 1 लाख 19 हजार 724 शेतकरी बाधित झाले आहेत. यातील 10 हजार 318 शेतकऱ्यांच्या 4413.59 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे. एकूण बाधित कृषि क्षेत्राच्या तुलनेत ही टक्केवारी 6.68 टक्के आहे. उर्वरित कृषि क्षेत्राचे पंचनामेही त्वरीत पूर्ण करावेत, असे निर्देशही विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले.

जिल्ह्यातील 76 एटीएम बंद असून ती त्वरीत सुरू करण्याच्या दृष्टीने बँकांनी यंत्रणा कामाला लावावी. बीएसएनएलने सर्व दुरूस्त्यांसह यंत्रणा त्वरीत सुरळीत करावी. नदीकाठच्या भागात सखल भागामध्ये पाणीसाठे निर्माण झाले असून त्यामधून रोगराई पसरण्याची शक्यता आहे त्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ कराव्यात.

बालभारतीकडून पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणार

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, स्थलांतरीतांचे कॅम्प ज्या ठिकाणी शाळांमध्ये सुरू आहेत त्या ठिकाणाहून ते स्थानांतरीत करून अन्य मंगल कार्यालये व तत्सम इमारतींमध्ये हलवावेत. पूरग्रस्त भागातील जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून 55 हजार 496 विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तके, वह्या व अन्य शालेय साहित्य क्षतिग्रस्त झाले आहे याबाबत शासन बालभारतीकडून पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणार आहे. वह्या व अन्य साहित्य येत्या आठवड्यात विभागीय स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येईल.

 

Web Title: Examine the underwater bridges: Deepak Mhasecar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.