अडचणीतील साखर कारखान्यांसाठी इथेनॉलचा आधार; सांगली जिल्ह्यात दिवसाला ६.६५ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन
By अशोक डोंबाळे | Updated: December 9, 2025 19:07 IST2025-12-09T19:06:43+5:302025-12-09T19:07:30+5:30
पाच वर्षांत उत्पादनात दुप्पट वाढ

अडचणीतील साखर कारखान्यांसाठी इथेनॉलचा आधार; सांगली जिल्ह्यात दिवसाला ६.६५ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन
अशोक डोंबाळे
सांगली: उपपदार्थाशिवाय साखर उद्योग टिकू शकत नसल्याची जाणीव कारखानदारांना झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी उपपदार्थांचे उत्पादन सुरू केले आहे. जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांकडून दररोज सहा लाख ६५ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. इथेनॉलला चांगला दर मिळत असल्याने त्याचा साखर उद्योगाला मोठा फायदा होतो आहे.
जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांची २०२०-२१ या आर्थिक वर्षात दररोज तीन लाख ६० हजार लिटर इथेनॉल उत्पादन क्षमता होती. हे कारखाने उसाचा रस, बी हेवी मोलॅसिस आणि साध्या मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करतात. गेल्या पाच वर्षांत कारखान्यांनी दुपटीने इथेनॉल उत्पादन वाढविले आहे. साखर कारखान्यांचा इथेनॉलकडे कल वाढल्यामुळे येत्या हंगामात साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र, इथेनॉल निर्मितीमुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यामुळे साखर कारखानदार आता उसाला ठरलेला भाव देण्यास तयार असल्याचे दिसत आहे.
पाच वर्षांपूर्वी पाच कारखाने दररोज एकत्रितपणे तीन लाख ६० हजार लिटर इथेनॉल उत्पादन करत होते. मात्र, २०२५-२६ या आर्थिक वर्षात साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन दुप्पटीने वाढवून सहा लाख ६५ हजार लिटर इतके केले आहे.
राजारामबापू कारखान्याचे साखराळे युनिट पूर्वी दररोज ७५ हजार लिटर इथेनॉल तयार करत होते. आता त्यांची क्षमता दुपटीने वाढवून दररोज दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती होत आहे. क्रांती कारखान्याचे उद्दिष्ट ९० हजार लिटर, सोनहिरा कारखान्याचे एक लाख ५ हजार लिटर इथेनॉल उत्पादनाचे आहे. उदगिरी शुगर कारखान्याची क्षमता एक लाख ३० हजार लिटर असून श्री. श्री. रविशंकर व हुतात्मा साखर कारखान्यांचे प्रत्येकी ५० हजार लिटर आणि विश्वासराव नाईक कारखान्याचे ९० हजार लिटर इथेनॉल उत्पादन होत आहे. हे सर्व साखर कारखाने सध्या कंपन्यांच्या मागणीप्रमाणे उत्पादन करत आहेत.
इथेनॉल करणारे कारखाने आणि त्यांची रोजची क्षमता
साखर कारखाना/प्रतिदिन क्षमता लिटरमध्ये
- राजारामबापू: १५०,०००
- क्रांती : ९०,०००
- सोनहिरा : १०५,०००
- हुतात्मा : ५०,०००
- उदगिरी : १३०,०००
- श्री श्री रविशंकर : ५०,०००
- विश्वासराव नाईक : ९०,०००
इथेनॉलसाठी मिळणारे दर (प्रतिलिटर)
इथेनॉल प्रकार / प्रतिलिटर दर
- सी-हेवी मोलॅसिस : ५७.९७
- बी-हेवी मोलॅसिस : ६०.७३
- उसाच्या रसापासून : ६५.६१
साखरेला इथेनॉल उत्तम पर्याय ठरत आहे. साखरेचे दर आणि एफआरपीचा विचार करता कारखाने आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. मात्र, इथेनॉलसह उपपदार्थ तयार करणारे कारखाने व्यवस्थित चालू राहू शकतील असे वाटते. मात्र, केंद्र सरकारने महागाईचा विचार करून इथेनॉलच्या दरात वाढ करणे गरजेचे आहे. तरच साखर कारखान्यांना इथेनॉल फायदेशीर ठरणार आहे. - आर. डी. माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू साखर कारखाना