During the monsoon, 221 tankers are started in the district: - Watch 4.5 lakh people | पावसाळ्यातही जिल्ह्यात २२१ टँकर सुरू - : साडेचार लाख लोकांना झळा
पावसाळ्यातही जिल्ह्यात २२१ टँकर सुरू - : साडेचार लाख लोकांना झळा

ठळक मुद्देमान्सून लांबल्यामुळे तीव्रता वाढली; दुष्काळी तालुक्यांमध्ये चाराटंचाई

सांगली : मान्सूनपूर्व पावसाचा जोर नसल्यामुळे आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या पावसाळा असतानाही जिल्ह्यातील १८५ गावांसह १३०० वाड्या-वस्त्यांवरील चार लाख ३२ हजार लोकसंख्येला २२१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळी तालुक्यांत मान्सूनपूर्व पाऊस झाला नसल्यामुळे चाराटंचाईही निर्माण झाली आहे. टँकर व चारा छावण्यांवरच सारी भिस्त आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी भागाकडे पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणीटंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पाण्याअभावी दुष्काळी तालुक्यांत पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीही झालेली नाही. दरवर्षी दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात उन्हाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व पाऊस बऱ्यापैकी होतो. पण, यावर्षी उन्हाळी एकही पाऊस झाला नाही. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकरी खरीप पेरणी करत असतो. परंतु, यावर्षी उन्हाळी आणि मान्सूनपूर्व पाऊस झाले नसल्यामुळे चिंता वाढली आहे. खरीप पेरणीचा कालावधी संपत आला तरीही मान्सूनचा जोर दिसत नाही. शिराळ्यात सर्वाधिक पाऊस होतो, मात्र तेथेही अद्याप पावसाचा जोर नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्य शासनाने मागीलवर्षी टँकरमुक्त जिल्हा म्हणून घोषित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळेच जिल्हा टँकरमुक्त झाल्याची चर्चा होती.

पण, दुसºयाचवर्षी टँकरमुक्त जिल्ह्यातील १८५ गावे आणि १३०० वाड्या-वस्त्यांना ऐन पावसाळ्यात टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील अनेक गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्या ठणठणीत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिला व लहान मुलांची भटकंती सुरू आहे.

शिल्लक साठा : सहा टक्केच
जिल्ह्यामध्ये लहान आणि मोठे असे ८४ पाझर तलाव असून त्यामध्ये ९४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. यापैकी सध्या या पाझर तलावांमध्ये केवळ ४३३.०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. तो केवळ सहा टक्केच आहे, असा अहवाल सांगली पाटबंधारे विभागाचा आहे. जिल्ह्यातील एकाच तलावामध्ये ७५ टक्के पाणीसाठा असून ५० टक्के पाणीसाठा ९, तर २५ टक्के पाणीसाठा १७ पाझर तलावांमध्ये आहे. पावसाळ्यातही २६ पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले असून, ३१ पाझर तलावांमधील पाणीसाठा मृतसंचय पातळीच्या खाली आहे. ही परिस्थिती मान्सूनचा जोरदार पाऊसच बदलू शकणार आहे.

जिल्ह्यातील २२१ टँकरच्या १८५ गावांसह तेराशे वस्त्यांवर रोज ६४१ खेपा होणे अपेक्षित आहे. पण, नियोजनाअभावी टँकरच्या ६८ खेपा कमी-जास्त असल्याचे खुद्द शासकीय अहवालातच नमूद आहे. पिण्याच्या पाणी टँकरच्या खेपा कमी-जास्त असल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबद्दल नागरिकांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.

जिल्ह्यात टँकरची सद्यस्थिती...
तालुका टँकर गावे वाड्या-वस्त्या लोकसंख्या
जत ११९ ९७ ७२४ २३३५२२
क़ महांकाळ २५ ३० १४१ ४७८६१
तासगाव १९ १८ १५१ ४५५४९
मिरज ६ ८ ३८ २७९७२
खानापूर १४ १७ १८ २७६०८
आटपाडी ३७ १४ २२८ ४९७२२
शिराळा १ १ ० ५४५
एकूण २२१ १८५ १३०० ४३२७७९

६८ खेपा कमी


Web Title: During the monsoon, 221 tankers are started in the district: - Watch 4.5 lakh people
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.