Demand for 2800 crore central government for agriculture sector in Kolhapur region | कोल्हापूर विभागातील कृषि क्षेत्रासाठी 2800 कोटींची मागणी

कोल्हापूर विभागातील कृषि क्षेत्रासाठी 2800 कोटींची मागणी

ठळक मुद्दे कोल्हापूर विभागातील कृषि क्षेत्रासाठी 2800 कोटींची मागणीविभागामध्ये 209392 हेक्टर कृषि क्षेत्राचे नुकसान

सांगली  : कोल्हापूर विभागामध्ये 2 लाख 9 हजार 392 हेक्टर कृषि क्षेत्राचे नुकसान झाले असून त्यासाठी सुमारे 2800 कोटींची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे, असे सांगून कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, महापुराने शेतकऱ्यांची अवस्था विदारक केली आहे. त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.

खरीप हंगाम 2019 मध्ये सातारा जिल्ह्यात 38 हजार 225 हेक्टर, सांगली जिल्ह्यात 66 हजार 98 हेक्टर तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 69 हेक्टर कृषि क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी केंद्र शासनाकडे 2 हजार 800 कोटींची मागणी करण्यात आली असून कृषि संदर्भात सर्व पंचनामे त्वरीत पूर्ण करा असे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.

कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा या परिक्षेत्रात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून तिनही जिल्ह्यांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर नंदकुमार काटकर, कृषि संचालक डॉ. नारायण शिसोदे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी सातारा सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कोल्हापूर ज्ञानदेव वासुरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सातारा सुनिल बोरकर, कृषि उपसंचालक (आत्मा) तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात 235 गावे बाधित असून मिरज तालुक्यातील 27, वाळवा तालुक्यातील 44, शिराळा तालुक्यातील 95, पलूस तालुक्यातील 31, कडेगाव तालुक्यातील 34 व तासगाव तालुक्यातील 4 गावे बाधित आहेत. यातील नजरअंदाजे 1 लाख 20 हजार 231 शेतकऱ्यांचे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. यातील 21767.42 हेक्टरवरील म्हणजे 32.93 टक्के क्षेत्राचा पंचनामा झाला आहे. शिराळा व पलूस तालुक्यातील सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले असून यात प्रामुख्याने ऊस, भात, सोयाबीन, मका व द्राक्षे या पिकांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील 1 लाख 37 हजार 725 खातेदारांच्या 38 हजार 225 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कराड, पाटण, सातारा, कोरेगाव, फलटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 332 गावातील 10009.48 हेक्टरवरील क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नुकसान झालेल्या पिकांमध्ये ऊस, भात, मका, सोयाबीन, हळद, आले व घेवडा या पिकांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 3 लाख 13 हजार 710 खातेदारांचे 1 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त शिरोळ तालुक्यातील पिकांचे 80 टक्के नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये ऊसाखालील क्षेत्र 75 हजार हेक्टर आहे.

नदीकाठची सर्व पीके 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाण्याखाली राहिल्याने या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कोल्हापूर विभागातील जवळपास 1 हजार 992 गावे अतिवृष्टीने बाधित आहेत. प्राथमिक अंदाजानुसार खरीप तसेच बहुवार्षिक पिकांचे 2 लाख 9 हजार 392 हेक्टर क्षेत्रामध्ये 33 टक्केपेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व ठिकाणचे कृषि संबंधित पंचनामे करण्याचे काम गतीने सुरू असले तरी ते दोन दिवसात पूर्ण करा असे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.

शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन कटिबध्द असून एनडीआरएफ मधून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात येणार आहेच शिवाय कृषि व संलग्न अन्य योजनांमधूनही मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या विम्याची परिकक्षा 70 टक्के असून ती 70 वरून 90 टक्के करण्याचे आवाहन केंद्राला करण्यात आले आहे.

विम्याचा लाभ शेतकऱ्यांना सहज सुलभतेने मिळावा यासाठी तालुकास्तरावर दक्षता समिती निर्माण करण्यात आली असून शेतकऱ्यांशी मैत्रीपूर्ण वर्तणूक ठेवावी असे निर्देश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत. महापुराच्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषि कर्जाचे पुर्नगठण करण्यासाठी आरबीआयकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगून खराब झालेला ऊस व अन्य पिके यांच्याजागी पेरणीसाठी चना व गव्हाचे बियाणे तातडीने उपलब्ध करून द्या. शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिके दाखवा.

शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूरांबाबतही विचार व्हावा या दृष्टीकोनातून त्यांच्यासाठी शेत रस्त्यांची पुर्नबांधणी नरेगाच्या माध्यमातून करा. ठिबक सिंचन, मोटार पंप यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे गतीने करा असे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी दिले.

या बैठकीत प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर नंदकुमार काटकर सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सातारा सुनिल बोरकर यांनी दिली.

 

 

 

Web Title:  Demand for 2800 crore central government for agriculture sector in Kolhapur region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.