December deadline for irrigation projects | सिंचन प्रकल्पांसाठी डिसेंबरची डेडलाईन
सिंचन प्रकल्पांसाठी डिसेंबरची डेडलाईन

ठळक मुद्देयोजना पूर्ण करण्यासाठी जनमताचा रेटा महत्त्वाचा आहे. सिंचनाची कामे तात्काळ पूर्ण करणे गरजेची आहेत.

आटपाडी : राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टÑाच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही. ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. दुष्काळी भागातील योजनांचे प्रकल्प येत्या डिसेंबरपर्यंत ९० टक्के पूर्ण करा अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही. जे-जे करावे लागेल ते करून या सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा आमदार गणपतराव देशमुख यांनी दिला.

येथील भवानी हायस्कूलच्या पटांगणात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी सुरू केलेल्या शेतमजूर, शेतकरी-कष्टकरी संघटनेच्यावतीने २७ वी पाणी परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आ. देशमुख म्हणाले, परिषदेमध्ये आज जे ठराव केले आहेत, त्या सर्व ठरावांची तातडीने अंमलबजावणी करावी. यासाठी दुष्काळी भागातील लोकप्रतिनिधींना एकत्र करू. त्या-त्या विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांना भेटू. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ६० वर्षांच्या काळात नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. आम्ही आयुष्यभर दुष्काळ भोगला; पण पुढच्या पिढीच्या वाट्याला तरी ही परिस्थिती येऊ नये, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू.

परिषदेचे निमंत्रक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी म्हणाले, नागनाथअण्णांनी दुष्काळी भागात पाणी येऊ शकते, त्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन केले. तेव्हा काही मंडळींना हे दिवास्वप्न वाटले होते; पण जनतेच्या रेट्यामुळे दुष्काळी भागात पाणी आले. ८ जून हुन्नुरला विभागीय पाणी परिषद घेतली. योजना पूर्ण करण्यासाठी जनमताचा रेटा महत्त्वाचा आहे. सिंचनाची कामे तात्काळ पूर्ण करणे गरजेची आहेत.

माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, टेंभू योजनेचे १६ पंप सुरू होणे गरजेचे आहे. मात्र ६ पंपच सुरू असतात. टेंभूचे अधिकारी म्हणतात, आम्ही दोन महिन्याला आवर्तन देऊ शकतो. मग कुठे अडले आहे? वंचित गावांना टेंभूचे पाणी मिळाले पाहिजे. यावेळी प्रा. बाळासाहेब नायकवडी, प्रा. विश्वंभर बाबर, अ‍ॅड. बाबासाहेब बागवान, प्रा. दादासाहेब ढेरे, डॉ. स्मृतिका लवटे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत देशमुख, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांची भाषणे झाली.

 


Web Title:  December deadline for irrigation projects
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.