corona virus -‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे काव्यमय आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 01:07 PM2020-03-21T13:07:40+5:302020-03-21T13:10:01+5:30

वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे सांगलीतील इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी अनोखे आवाहन केले आहे. त्यांची कविता सोशल मिडियावरून व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

corona virus - Doctor's poetic appeal against 'corona' | corona virus -‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे काव्यमय आवाहन

corona virus -‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे काव्यमय आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे काव्यमय आवाहन कविता सोशल मिडियावरून व्हायरल

सांगली : वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे सांगलीतील इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी अनोखे आवाहन केले आहे. त्यांची कविता सोशल मिडियावरून व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

कवितेत त्यांनी लोकांना सतर्कतेचे आवाहन करतानाच आधुनिक युगात हरवलेली माणुसकी, आरोग्याबाबतचा गाफिलपणा, अस्वच्छता, बेशिस्तपणा, हरवलेले स्वत्व या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकला आहे. साहित्य, सामाजिक चळवळीत सातत्याने ते सहभागी असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या या अनोख्या काव्यत्मक आवाहनास पसंती मिळत आहे.

माणसांनो, बदला आता !

माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे
अन्यथा सर्वांचं मरण अटळ आहे.
अन्यथा सर्वांचं सरण अटळ आहे.

हवा गढुळली, तशी माणसंही...
जमीन भेगाळली, आणि माणसंही ,
पाणी आटलं..., माणसांचंही तेच झालं .
कितीही खणलं तरी , माणसांना पाझर फुटत नाही .
'फवारणी' सुरूच आहे ..

फळं अकाली पिकवून, 'माणूस' अकाली गळू लागलाय .
हे गळणं अटळ आहे...
माणसानो बदला आता, अन्यथा सर्वांचं मरण अटळ आहे.

जमिनीत साखर पेरताय, तिथं मीठ उगवतंय .
माणसांत साखर पेरताय, तिथं कॅन्सर उगवतोय .
माणसांनो, आता 'वेळ' भरत आलीय...
काळ बदलतोय,
लक्षात ठेवा,

माणसाला मीठ फुटलं तरी चालेल ,
पण जमिनीला कॅन्सर होता कामा नये...
जमीन मरता कामा नये. तिचं जगणं अटळ आहे .
माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे ,
अन्यथा मरण अटळ आहे.

फेसबुक, वॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम...
जळमट जायला हवं .
इमोजीचं स्माईल ओरिजिनल चेहऱ्यावर यायला हवं .
'हळवं मन' आता डिलिट व्हायला लागलंय...
त्याला पुन्हा माणसांत आणायला हवं .

मोबाईलवरची बोटं पुन्हा मातीत आली,
तरच जगणं सुखद आहे. माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे,
अन्यथा मरण अटळ आहे.
माणसाचं खूप झालं, आता प्राण्यांना आरक्षण हवं .
वाघ, सिंह, हत्ती, चिमणी, पाखरं ...
त्यांना केवळ पोटाला हवं .

झाडांच्या पानांतून दिसणारा बिबट्या...
केवळ पोटासाठी ....
शेताशेतांतून, रानारानांतून आणि हो...
हल्ली वर्तमानपत्राच्या पानांपानांतूनही दिसतो .
करायचंच असेल तर,
माणसातल्या ...

मोकाट जनावरांना करा जेरबंद दिसताक्षणी.
धरणीवरच्या त्या जिवांचं असणं 'अटळ' आहे .
माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे ,
अन्यथा मरण अटळ आहे .

माणसांनो ... बदलाच आता !
असे मारत सुटलात सा?्यांना..
झाडांना, वेलींना आणि मुक्या प्राण्यांना...,
तर ...शापातून सुटका नाही .

एक दिवस...
तुमच्यातही रुजणार नाही बीज .
उजाड होऊन जाल या मातीसारखे .
तडफडून मराल चिमण्या-पाखरांसारखे .

किंवा....
धावत सुटाल बेभान, जिवाच्या आकांताने,
माणसांच्या कळपात सापडलेल्या बिबट्यासारखे ,
आणि ...

....आणि....
विषाणूंची अदृश्य फौज जाळी लावून बसली असेल ...
तुमच्यासाठी ....
एक दिवस.

हा शाप अटळ आहे ,
माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे .
अन्यथा मरण अटळ आहे
अन्यथा सरण अटळ आहे.

- डॉ. अनिल मडके

Web Title: corona virus - Doctor's poetic appeal against 'corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.