corona in sangli- परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 01:49 PM2020-04-06T13:49:24+5:302020-04-06T13:51:47+5:30

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून उर्वरित 21 रूग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा स्वॅब तपासणी करण्यात येईल.

corona in sangli - First Patient Out of Coronation Free - Jayant Patil | corona in sangli- परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त- जयंत पाटील

corona in sangli- परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त- जयंत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली जिल्ह्याला दिलासा परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त- जयंत पाटीललॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत अनावश्यक बाहेर पडू नका, धार्मिक स्थळांवर गर्दी करू नका

सांगली : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून उर्वरित 21 रूग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा स्वॅब तपासणी करण्यात येईल.

उपचार घेत असलेल्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थीर आहे. जिल्ह्यातील रूग्ण संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा परिषद यासह सर्व यंत्रणांनी प्रचंड मेहनत घेतली आहे व काटेकोर अंमलबजावणी केली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत जनतेने घरीच राहून सहकार्य करावे. अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करून विनाकारण रस्त्यांवर येणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मिरज संदीप सिंह गील, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. नणंदकर, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपविभागीय अधिकारी मिरज डॉ. समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, यांच्यासह विविध यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्हा लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व तालुक्यात जाऊन स्थितीचा आढावा घेतला आहे. जिल्ह्यात समाधानकारक स्थिती असून जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. द्राक्ष, केळी, कलिंगड आदि उत्पादक शेतकरी जे माल बाहेर पाठविण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना प्रशासनाने सर्वोतोपरी सहकार्य करावे.

जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढणार नाहीत याबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी. सद्या जिल्ह्यात एकूण १६ शिवभोजन केंद्रे सुरू असून कामगार, गरजवंत, गरीब यांची उपासमार होऊ नये म्हणून आवश्यक तेथे तहसिलदार यांनी शिवभोजन केंद्रे सुरू करावीत, असे सांगून ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही शालेय पोषण आहार मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असून कोणत्याही धार्मिक स्थळावर लोकांनी एकत्र येऊ नये असे आवाहन केले. मिरज येथे अद्ययावत कोरोना चाचणी लॅब चालू झाल्याने आजूबाजूच्या जिल्ह्यानांही त्याची सेवा मिळत आहे. कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर मिरज सिव्हील हॉस्पीटल पूर्ण क्षमतेने चालावे यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल, असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. शहरी व ग्रामीण भागात जिल्हा परिषद व महानगरपालिकेने केलेल्या औषध फवारणीचेही यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले.

जीवनावश्यक सुविधा सुरळीत रहाणे ही माझी नैतिक जबाबदारी- पालकमंत्री जयंत पाटील

जिल्ह्यातील जनता हे माझे कुटुंब असून त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत होईल हे पहाणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळेच मी जिल्ह्यात गावोगावी जाऊन बैठका घेतल्या, लोकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, आरोग्य अधिकारी व अन्य संबधित सर्व यंत्रणा यांना आवश्यक सूचना देण्याचे काम सातत्याने केले. ज्या स्थितीतून आपण सर्वजण जात आहोत अशावेळी लोकांचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत, अशा भावना पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.

 

Web Title: corona in sangli - First Patient Out of Coronation Free - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.