सांगलीत इंधन दरवाढीविरुद्ध कॉंग्रेसची निदर्शने; केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:12 PM2020-06-29T14:12:53+5:302020-06-29T14:13:14+5:30

सांगलीत कॉंग्रेस भवनासमोर ग्रामीण व शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

Congress protests against fuel price hike in Sangli | सांगलीत इंधन दरवाढीविरुद्ध कॉंग्रेसची निदर्शने; केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध

सांगलीत इंधन दरवाढीविरुद्ध कॉंग्रेसची निदर्शने; केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध

Next

सांगली : कोरोना संकटकाळात आर्थिक संकटांचा सामना करणा-या नागरिकांवर इंधन दरवाढीतून मोठा आर्थिक बोजा टाकल्याबद्दल केंद्र शासनाचा निषेध करीत कॉंग्रेसने सोमवारी सांगलीत धरणे आंदोलन केले. केंद्र शासनाच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
सांगलीत कॉंग्रेस भवनासमोर ग्रामीण व शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते, महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक व युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.

एका मोठ्या स्क्रीनद्वारे सकाळपासून देशभरातील इंधनदरवाढीविरोधातील संतापाचे चित्रीकरण दाखविण्यात येत होते. सकाळी ११ वाजता कॉंग्रेसने निदर्शने केली. ‘पेट्रोल, डिझेल दरवाढ करणा-या केंद्र शासनाचा धिक्कार असो’, ‘दरवाढ मागे घ्या, नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणा देत कॉंग्रेसने संताप व्यक्त केला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड कमी असतानाही मोदी सरकार त्याचा लाभ सामान्य जनतेला देण्यास तयार नाही. कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. उद्योग, व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेले नाहीत. त्यात ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. दररोजच्या भाववाढीमुळे पेट्रोल प्रतिलिटर ९.१२ रुपये तर डिझेल ११.0१ रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलला ८७ ते ८८ रुपये मोजावे लागत आहेत. काही राज्यांमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग झाले आहे.
आंदोलनात नगरसेवक संतोष पाटील, मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, रवींद्र वळवडे, अ‍ॅड. मनिषा रोटे, फिरोज पठाण, रवीराज शिंदे, कय्युम पटवेगार, अमित पारेकर, आशिष चौधरी, कवठेमहांकाळचे अविराजे शिंदे, बाळासाहेब गुरव, आप्पासाहेब शिंदे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Congress protests against fuel price hike in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.