Complete training session of all the systems for the Sangli counting | सांगलीत मतमोजणीसंदर्भात सर्व यंत्रणाचे प्रशिक्षण सत्र संपन्न
सांगलीत मतमोजणीसंदर्भात सर्व यंत्रणाचे प्रशिक्षण सत्र संपन्न

ठळक मुद्दे मतमोजणी सुरळीतपणे पार पडण्यासाठी जबाबदारी पार पाडा - डॉ. अभिजीत चौधरीमतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले निर्देश

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 मे रोजी मतमोजणी होत आहे. मतमोजणीचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून, त्यासाठी नियुक्त सर्वांनी सतर्क राहून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. मतमोजणीशी संबंधित सर्व यंत्रणांनी पूर्ण तयारीनिशी मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज राहावे व आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा 44 सांगली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिले.

विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे मतमोजणीसंदर्भात सर्व यंत्रणाच्या प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी सर्वश्री विवेक आगवणे, तुषार ठोंबरे आणि बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह मतमोजणीसाठी नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणी प्रक्रिया निर्दोषपणे यशस्वी व्हावी, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रामाणिकपणे योगदान द्यावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मतमोजणी हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा अंतिम टप्पा आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी आवश्यक प्रशिक्षण गांभीर्याने पूर्ण करावे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मतमोजणी कक्षात उपस्थित प्रत्येकाने शिस्त, कायदा व सुव्यवस्था राखावी. मतमोजणीशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदानाची गोपनीयता राखावी, असे ते म्हणाले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, दि. 23 मे रोजी मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांनी सकाळी ठीक 6 वाजता वेळेत उपस्थित राहावे. मतमोजणीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी ठिकाणी प्रवेश देण्यात येणार नाही. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले मतमोजणीसाठी दिले गेलेले ओळखपत्र जवळ बाळगावे. त्याशिवाय, भ्रमणध्वनी, ध्वनीमुद्रण व चित्रीकरण करता येऊ शकेल, अशी अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पेन आदि बाबी सोबत आणू नयेत. यावेळी त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची आणि सुरक्षाविषयक बाबींची माहिती दिली.

उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी मतमोजणीशी संबंधित महत्त्वाच्या कायदेशीर बाबींची तसेच ईव्हीएम मतमोजणी संदर्भात सविस्तर माहिती दिली. उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांनी ईटीपीबीएस आणि टपाली मतमोजणीसंदर्भात माहिती दिली.

यावेळी मतमोजणीशी संबंधित सर्व यंत्रणांना मतमोजणी नियोजनाबाबत पुरेशी माहिती व्हावी, तसेच कोणाचाही गोंधळ होऊ नये, या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. मतमोजणीचे टप्पे, वैशिष्ट्ये, मतमोजणी नियोजन, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील मतमोजणीशी संबंधित कायदेशीर बाबी, प्रत्यक्ष मतमोजणी कक्षातील नियोजन व व्यवस्थापन, माध्यम कक्ष, मतमोजणी कक्षात प्रवेशास परवानगी असलेल्या व नसलेल्या व्यक्तिंची माहिती, मतमोजणी प्रतिनिधींची बैठक व्यवस्था, मतमोजणी करताना प्रत्यक्ष करावयाची कार्यवाही यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

दि. 22 मे रोजी मतमोजणीची रंगीत तालिम

इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस/सैनिक मतदार) साठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच सूक्ष्म निरीक्षकांसाठी दि. 17 रोजी प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ईटीपीबीएस स्कॅनिंग आणि टपाली मतमोजणी प्रात्यक्षिक संदर्भात पुढील प्रशिक्षण दि. 20 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. तसेच, दि. 22 मे रोजी दुपारी 2 वाजता सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन, जिल्हा क्रीडा संकुलच्या मागे, मिरज येथे मतमोजणी प्रक्रियेची रंगीत तालिम घेण्यात येणार आहे. त्याला मतमोजणीसाठी नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
 


Web Title: Complete training session of all the systems for the Sangli counting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.