Sangli: पलूसमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न उधळून लावला, संशयितांना चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात; वातावरण तणावपुर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:34 IST2025-12-02T15:32:55+5:302025-12-02T15:34:21+5:30
Local Body Election: पोलिसांनी दोन्ही प्रभागांतील मिळून सात जणांना ताब्यात घेतले

Sangli: पलूसमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न उधळून लावला, संशयितांना चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात; वातावरण तणावपुर्ण
पलूस: पलूस नगरपालिकेसाठी आज, सकाळपासूनच मतदानासाठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यानच, प्रभाग क्रमांक ५ व ७ मध्ये बोगस मतदानाच्या घटना उघडकीस आल्याने वातावरण तणावग्रस्त बनले. विरोधक उमेदवारांनी तीन वेळा होणारा बोगस मतदानाचा प्रयत्न उधळून लावत संशयित बोगस मतदारांना पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निलेश येसुगडे तसेच भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असल्याने सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची स्पर्धा दिसत होती. यामुळे वातावरण चांगलेच तापले असताना, बोगस मतदानाच्या सलग तक्रारींमुळे उमेदवार प्रतिनिधी आणि मतदार यांच्यात वादावादीचे प्रसंग घडले.
बोगस मतदानाचा संशय आल्यावर निलेश येसुगडे, मिलिंद येसुगडे, उमेदवार दिगंबर पाटील आणि सिमा माळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलिसांना आक्षेप नोंदवत मतदान प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही प्रभागांतील मिळून सात जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ७ मध्ये मतदानासाठी आलेल्या एका महिला मतदाराने मतदान केंद्रासमोर गाडी आणल्याने पोलिस आणि मतदारांमध्ये वाद झाला. काही वेळानंतर पोलिसांनी समजूत काढली; मात्र संबंधित मतदार मतदान न करता परत निघून गेल्याने वातावरण अधिकच तंग झाले.
बोगस मतदानाच्या प्रयत्नांमुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त कार्यकर्त्यांनी एका संशयितास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. वाढत्या गोंधळामुळे सुरक्षा यंत्रणेला अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. मतदान शांततेत आणि पारदर्शकतेत पार पाडण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. यावेळी उपविभागीय पोलिस उपअधिक्षक अशोकराव भवड, पोलीस निरीक्षक सोमेश्वर जंगम, शशिकांत माळी, अजय माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना पांगवले व वातावरण शांत करून मतदान प्रक्रिया शांततेत चालू ठेवली.