सांगलीत गरिब मुलांसाठी उभारली सायकल बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 04:21 PM2019-11-30T16:21:26+5:302019-11-30T16:22:47+5:30

शहरासह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील दानशून व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांनाही त्यांच्याकडील जुन्या वापरात नसलेल्या पण चांगल्या असलेल्या सायकली या बँकेस दान करण्याचे आवाहन मंचने केले आहे.

Bicycle bank set up for poor children in Sangli | सांगलीत गरिब मुलांसाठी उभारली सायकल बँक

सांगलीत गरिब मुलांसाठी उभारली सायकल बँक

Next
ठळक मुद्देमदनभाऊ युवामंचचा उपक्रम : मदन पाटील यांच्या जयंतीदिनीही विविध कार्यक्रम

सांगली : मैलो न् मैल दररोजची पायपीट करून शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या गरिबाघरच्या मुलांना इतर मुलांप्रमाणे सायकल मिळावी, त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ व जलद व्हावा या दृष्टीकोनातून सांगलीत प्रथमच सायकल बँक उभारण्यात आली आहे. मदनभाऊ युवामंचच्या युवकांनी व मदनभाऊ प्रेमींनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

दिवंगत कॉंग्रेस नेते मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त २ डिसेंबरला या उपक्रमास सुरुवात होणार आहे, अशी माहिती महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, आनंद लेंगरे, शीतल लोंढे आदींनी दिली. शहरासह जिल्ह्यात आजही हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. गरिबीमुळे सायकल खरेदी करू न शकणाºया अशा विद्यार्थ्यांना मदतीचा एक मोठा हात मदनभाऊ युवामंचने दिला आहे. सुमारे चाळीस सायकलींची ही बँक येथील विष्णुअण्णा भवनात उभारली गेली आहे.

शहरासह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील दानशून व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांनाही त्यांच्याकडील जुन्या वापरात नसलेल्या पण चांगल्या असलेल्या सायकली या बँकेस दान करण्याचे आवाहन मंचने केले आहे. या बँकेत नव्या-जुन्या सुस्थितीतील सायकली असणार आहेत. सातवीनंतर पुढील शिक्षण घेणाºया गरिबाघरच्या मुला-मुलींना वर्षभरासाठी या सायकली मोफत दिल्या जाणार आहेत. त्यानंतरही त्या नुतनीकरण करून त्या सायकली पुन्हा वापरास घेऊ शकतात, मात्र शिक्षण पूर्ण होताच त्यांना इतर गरिब मुलांसाठी त्या सायकली बँकेकडे परत कराव्या लागणार आहेत.

सांगलीतील बँकेत आता नव्या ४0 सायकली दाखल झाल्या आहेत. त्यांची संख्या लवकरच चारशे ते पाचशेच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ज्या मुलांना अशा प्रकारच्या सायकली हव्या आहेत त्यांनी युवामंचकडे किंवा विष्णुअण्णा भवनाकडे अर्ज करावेत, असे आवाहन संतोष पाटील यांनी केले. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहून तसेच शाळेचे शिफारस पत्र घेऊन त्याला योजनेचा लाभ दिला जाणार आहे. २ डिसेंबरला प्रातिनिधीक स्वरुपात काही मुला-मुलींना सायकली दिल्या जाणार आहेत.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
मदन पाटील यांच्या जयंतीदिनी २ डिसेंबरला त्यांच्या स्मारकाजवळ सकाळी अभिवादन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिवसभर विविध कार्यक्रम होतील. अपंगांना व्हिलचेअर, रुग्णांना विविध उपयोगी साहित्य तसेच कर्णबधीरांना श्रवणयंत्रवाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ८ डिसेंबरपासून मदनभाऊ चेस चॅम्पियनशीप बुद्धिबळ स्पर्धाही होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

Web Title: Bicycle bank set up for poor children in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.