अबब!, सांगली जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचे तब्बल पावणेदोन लाख मतदार ‘बेपत्ता’
By संतोष भिसे | Updated: December 2, 2025 19:33 IST2025-12-02T19:33:26+5:302025-12-02T19:33:51+5:30
पत्तेच माहिती नाहीत, निवडणुका तोंडावर असताना त्यांना शोधणार कधी? उमेदवारांपुढेही पेच

अबब!, सांगली जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचे तब्बल पावणेदोन लाख मतदार ‘बेपत्ता’
संतोष भिसे
सांगली : राज्यभरात मतदार यादीतील गोंधळामुळे राजकीय क्षेत्रात काहूर माजले आहे. त्याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातही मतदार यादीमध्ये सावळागोंधळ दिसून येत आहे. तब्बल पावणेदोन लाख मतदारांचे पत्तेच गायब असून, ते नेमके कोठे राहतात, याची माहिती निवडणूक आयोगाला नसल्याचे दिसत आहे.
निवडणूक आयोगाने गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीचीच मतदार यादी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी वापरली आहे. तिच्या छाननीमध्ये अनेक त्रुटी आढळत आहेत. दुबार नावे, चुकीची छायाचित्रे हा गोंधळ तर आहेच, शिवाय तब्बल १ लाख ७० हजार २३४ मतदारांचे निश्चित पत्तेच त्यांच्या नावापुढे नमूद नाहीत. त्यांचा घर क्रमांक, प्रभाग क्रमांक, रस्ता किंवा परिसर याची माहिती नाही.
आयोगाने सर्व जिल्ह्यांतील पत्ते नसणाऱ्या मतदारांची संख्या जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ४ लाख २ हजार १०८ मतदार बेपत्ता आहेत. सर्वात कमी म्हणजे ९ हजार १०६ बेपत्ता मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. राज्यभरात ५४ लाख १४ हजार ६० मतदार बेपत्ता आहेत. या यादीत सांगली जिल्हा १४ व्या क्रमांकावर आहे.
सन २०२४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर मतदार यादीतील घोळावर विरोधी पक्ष सातत्याने प्रहार करीत आहे. आयोगाला वेळोवेळी त्यांच्या आरोपांवर खुलासा करावा लागत आहे. आयोग जणू आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. अशावेळी विरोधकांच्या आरोपांना बळ देणारे पुरावे मतदार यादीतून समोर येत आहेत. राज्यभरात अर्धा कोटी मतदार बेपत्ता असणे म्हणजे विरोधकांच्या हातात मोठे शस्त्र गवसले आहे.
वेळ अपुरा, मतदारांना शोधणार कसे?
नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान मंगळवारी (दि.२) होत आहे. बुधवारी लगेच मतमोजणी होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे मतदार यादीत दुरुस्ती करणे किंवा या बेपत्ता मतदारांचा ठावठिकाणा शोधणे या कामांसाठी निवडणूक आयोगाकडे पुरेसा वेळच नाही. या स्थितीत सदोष मतदार यादीच्या आधारेच निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.
आयोग अनभिज्ञ, उमेदवार कसे पोहोचणार?
मतदार यादीत नोंद असलेल्या पावणेदोन लाख मतदारांचे पत्ते निवडणूक आयोगाला माहिती नाहीत. या स्थितीत त्यांना मतदानाच्या स्लिप पोहोचणार नाहीत हे स्पष्ट आहे. हे मतदार कोठे राहतात, याची माहिती आयोगालाच नसेल तर उमेदवार त्यांना कोठे शोधणार, हादेखील प्रश्न आहे. विजयासाठी एकेक मत महत्त्वाचे असल्याच्या स्थितीत तब्बल पावणेदोन लाख मतदार अशाप्रकारे बेपत्ता असणे उमेदवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.