सांगली : कोरोनाच्या वाढता संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करत शहरातून फिरणारी १८२ वाहने पोलिसांनी जप्त केली. नियमांचे पालन करत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरासह ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडक नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. त्यात अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी दिवसभरात १८२ वाहने जप्त करून त्यांच्यावर ९३ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागात नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनीही बाहेर फिरू नये व पाेलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उपअधीक्षक टिके यांनी केले आहे.