Wraps And Rolls from chapati | पोळीचे चटपटीत रॅप्स अँण्ड रोल्स
पोळीचे चटपटीत रॅप्स अँण्ड रोल्स

-भक्ती सोमण

पोळीचा वापर जेवणात रोजच केला जातो. अनेकदा पोळी आणि भाजी खाऊन कंटाळाही येतो. अशावेळी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत; पण आता पोळीलाच आधुनिक रूप देत तयार होणारे रॅप्स, रोल, फाहिता, लेबनीज श्वार्मा, अमेरिकन फ्रँकी हे प्रकारही सध्या खूप चलतीत आहे. चटपटीत आणि पोटभरीचे असे हे प्रकार आहेत. 

ही पोळी  मैदा किंवा मक्यापासून केली जाते. विविध भाज्या, पनीर, सॉसेस यामुळे त्याची चवही अप्रतिम लागते. एकंदरीत पोळीचा हा आधुनिक अवतार जितका जास्त चमचमीत तितका तो लोकप्रिय होतो. ही सगळी रुपं चवीलाही उत्तमच.
रॅप्स
मैदा किंवा मक्याच्या जाडसर लुसलुशीत रूमाली रोटीत मॅयोनिज सॉस, वेगवेगळ्या भाज्या, टिक्की, काहीवेळी सालसा भरून रॅप्स तयार होतात. यात भरपूर मॅयोनिज सॉस क्रिमीपणा येण्यासाठी घालतात. ग्रील केलेल्या भाज्या, कबाब, बटाट्याची टिक्की असे विविध प्रकार रॅप्समध्ये घालतात. 

फाहिता  

आपल्याकडे ज्याप्रमाणे रोजच्या जेवणात गव्हाच्या पिठाची पोळी करतात. अगदी त्याचप्रमाणे मेक्सिकन पदार्थ तयार करताना त्यात मक्याचं पीठ, मैदा, थोडंसं मीठ आणि पाणी एकत्र करून केलेल्या पिठाच्या गोळ्यापासून जी पोळी बनते त्याला टॉर्टीला म्हणतात. 

हा टॉर्टीला भाजून त्याच्यामध्ये शिजलेला राजमा, कॉर्न, सालसा, पनीरचे तुकडे, रंगीत सिमला मिरची, ऑल्व्हिस घालून केलेला फाहिता हा प्रकार सध्या चलतीत आहे. 

अरेबिक श्वार्मा 

अरेबिक पद्धतीचा हा श्वार्मा खरं तर मासांहारी; पण शाकाहारींसाठी त्यात पनीरचा वापर केला जातो. धगधगत्या निखा-यावर मोठय़ा सळईला पनीर लावलं जातं. त्याला खालून कोळशाची धग मिळते. श्वार्मासाठी वापरला जातो तो जाड पिटा ब्रेड. म्हणजेच एका अर्थानं मैद्याची जाडसर पोळी. ही पोळी निखा-यावर भाजून त्यामध्ये टोमॅटो सॉस, ताहिनी (तिळाचा) सॉस, क्रिम लावून त्यात लागेल तसे निखार्‍यावरचे भाजत असलेले तुकडे भरपूर कोबी, कांदा घालून दिले जातात. महत्त्वाचं म्हणजे यातलं  भाजलेलं पनीर आणि सॉसचं कॉम्बिनेशन जिभेवर रेंगाळतं.  त्यामुळे खाण्याचा आनंद घेत घेत हा श्वार्मा खूपच चटपटीत लागतो.

 रोल

मैदा किंवा गव्हाच्या पोळीला सॉस लावून त्यात आवडीप्रमाणे भाजलेल्या भाज्या घालून वर कांदा, सिमला मिरची घातली की रोल तयार होतो. यात भाज्यांचे कबाब, पनीर टिक्की, फलाफल घातले जातात. या रोलमध्ये सध्या तंदुरी पनीर टिक्का, व्हेज रोल, मॅक्स्किन रोल खूप लोकप्रिय आहेत. 

फ्रँकी 

मैद्याच्या पोळीला सॉस लावून त्यात कांदा घालून बटाट्याची भाजी वरून चाट आणि फ्रँकी मसाला घालून फ्रँकी करतात. आता तर या फ्रँकीत खूप बदल झाले आहेत. आजकाल अनेक कॉलेजच्या नाक्यावर असे फ्रँकी सेंटर दिसतात. त्यात बटाट्याच्या भाजीऐवजी नूडल्स स्टफ्ड करून दिले जातात.

सालसा

पोळीच्या या चटपटीत प्रकारांबरोबर तोंडी लावण्यासाठी सालसा दिला जातो.  टोमॅटो, काकडी, सिमला मिरची, कांदा हे साहित्य अगदी बारीक चिरायचे किंवा मिक्सरमधून काढायचे. त्यात आवडीनुसार मिरी, मीठ, सिलेंत्रो (कोथिंबीर) आणि टोमॅटो सॉस घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून सालसा तयार होतो.  हाच सालसा इतर पदार्थांसोबत तोंडी लावण्यासाठीही वापरतात.

(लेखिका ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)  

bhaktisoman@gmail.com


Web Title: Wraps And Rolls from chapati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.