working woman-burn out mom- how to deal with stress? read this.. | ऑफिसात बॉस आणि घरी मुलं छळतात तुम्हाला? - मग हे वाचा..
ऑफिसात बॉस आणि घरी मुलं छळतात तुम्हाला? - मग हे वाचा..

ठळक मुद्देकार्यालयीन कौशल्य आणि आत्मविश्वास यांचं गुणोत्तर कोण बदलतं?लेखातील दोन्ही  फोटो  सौजन्य - रिडिफायनिंग मॉम डॉट कॉम 

सखी ऑनलाइन टीम


ऑफिसमध्ये कामाचा ताण खूप असतो. त्यात बॉस झापतो. सहकारी कधीतरी टोमणे मारतात. आपलं कामच संपत नाही. आपल्याला नवीन स्किल्स जमत नाही, तुम्ही स्पीड वाढवा कामाचा असं सुचवलं जातं, मनासारखी पगारवाढ होत नाही त्यावेळी आपण घरी कसे वागतो हे कधी तपासून पाहिलं आहे का? पुरुषांच्याबाबतीत हे गृहित धरलं जातं की, त्याला कामाचा ताण आहे. त्याला घरी ताण देऊ नका. बायकांना मात्र घर आणि काम दोन्ही गोष्टी सांभाळाव्याच लागतात आणि त्यात एक तिसरी मोठी जबाबदारी असते ती मुलांची, पालकत्वाची. आणि आईकडून तर सुजाण पालकत्वाची अपेक्षा आणखी मोठी असते. इतरांपेक्षाही बाई स्वतर्‍च स्वतर्‍ला उत्तम पालक असण्याच्या परीक्षेलाही बसवते, त्याचा परिणाम असा होतो की, ऑफिसातल्या कामाचा ताण आई म्हणून वागण्यावरही पडतो, आणि लक्षातही येत नाही इतकी हुकुमबाजी आई म्हणून घरी सुरु होते.

 


अलीकडेच अमेरिकेच्या कार्लटन विद्यापीठाने प्रसिद्ध केलेला अभ्यास सांगतोय की, ज्या बायकांना नोकरीत मनस्ताप जास्त त्या घरात मुलांशी अधिक उद्धटपणे वागतात. म्हणजे बाहेरच्यांचा राग घरात काढतात, मुलांवर काढतात असं नव्हे तर त्या मुलांना अधिक धाकात ठेवण्याचा प्रयत्न  करतात. आपल्या मुलांनी इतर मुलांपेक्षा सरसच असावं आणि आई नोकरी करते म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असं कुणीही म्हणू नये म्हणून त्या मुलांशी जास्त ‘स्ट्रिक्ट’ वागतात. पालक म्हणून कसं वागायचं हे मला कुणी शिकवू नका, मला कळतंय असं घरातल्या अन्य वडीलधार्‍यांना बजावतात. आपल्याकडे पालकत्वाची सगळी कौशल्य आहेत, त्यात आपण कुठंही कमी पडत नाही, असं त्यांना दाखवून द्यायचं असतं. त्यांच्या कार्यालयीन कामाच्या कौशल्याचा, त्यांच्या आत्मविश्वासाचा संदर्भ त्या पालकत्वाशी लावतात आणि परिणाम म्हणून मुलांवर जास्त ऑर्डरी सोडतात. मात्र त्याचा उलट परिणामच होतो. ऑफिसात बॉस ऐकत नाही, घरात नवरा आणि मुलं ऐकत नाहीत, आपली कामं कुठंच सुरळीत होत नाहीत असं म्हणून त्या जास्त हवालदील होतात. अधिक चुका करतात. आणि स्ट्रेस वाढवून घेतात. 
अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार अशा दुहेरी कातरीत सापडलेल्या महिलांनी कुठंतरी मनमोकळं केलं पाहिजे. घरात किंवा कार्यालयातही कामं सोपी होतील म्हणून मदत मागितली पाहिजे. आणि आपलं कार्यालयीन काम, त्यातले बदल आणि आपलं मुलांशी असलेलं नातं यात स्पर्धा लावणं बंद केलं पाहिजे. तरच या ताणातून वाट सापडू शकते.

 

 

Web Title: working woman-burn out mom- how to deal with stress? read this..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.