women In serials, where exactly do such women meet? | सिरिअलमध्ये असतात, तशा बायका नक्की कुठे भेटतात?

सिरिअलमध्ये असतात, तशा बायका नक्की कुठे भेटतात?

- सृष्टी सुयश

विविध टीव्ही वाहिन्यांवर मालिकांचा सिलसिला संध्याकाळी सहा वाजता जे सुरू होतो तो रात्री दहा-साडेदहापर्यंत चालतो.

मात्र, कुणाही सुजाण प्रेक्षकाला प्रश्न पडावा की आपल्या माथी मनोरंजनाच्या नावाखाली अतिशय हीन दर्जाच्या या मालिका का मारल्या जात आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आधीच, बिनबुडाचे, सुमार असलेल्या कथानकात पाणी ओतून ते वाढवलं जातं. कृत्रिम आणि बेताचाच अभिनय, ओढून ताणून केलेले विनोद, बडेजावी लग्न सोहोळे, रटाळ संवाद, तेच तेच प्रसंग, सततचा कुटुंब कलह दाखवणं, महिलांचा भडक मेकअप हे सारं सरसकट दिसतं. साधारण सगळ्या मालिका एकत्र कुटुंब पद्धती आणि त्यात चालणारी कट कारस्थानं यावरच आधारित आहेत, असं आपल्या लक्षात येईल. त्या कुटुंबात 4-5 स्त्रिया दाखवून त्या सतत एकमेकांवर कुरघोडी करण्यात धन्यता मानतात. अगदी काही मालिकांमध्ये एकमेकांना जिवे मारण्यापर्यंत त्यांची कट कारस्थानं चालतात. इथे दाखवल्या जाणाऱ्या सासू-सून, जावा-जावा, नणंद-भावजय यांच्यातले नाते म्हणजे सतत एकमेकींचे पाय मागे ओढणे आणि विक्षिप्त हावभाव करत त्या प्रसंगाचा आनंद लुटणं इतकाच मर्यादित असतो.

त्यातून हेच प्रेक्षकांच्या मनावर बिंबवलं जातं की, एक स्त्रीच दुसरीची शत्रू असते.

 

विवाह पश्चात सुनेला पुढचं शिक्षण घेताना, तिला समजून घेताना, तिच्याशी मायेनं वागणारी सासरची माणसं, नोकरी करताना तिच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी सासू अथवा कुटुंबीय हे त्यांना कालबाह्य वाटतात का? शिकलेली नायिका किंवा एखादी शिकलेली स्त्री पात्र इतकं भडक, असंवेदनशील, वयाचा मान न राखणारी, उर्मट आणि सततचे षडयंत्र रचणारी दाखवलं जातं. खरंच शिकलेली स्त्री अशी असते? आपल्या समाजात उच्चपदावर किती महिला बघतो, त्यांची विनयशीलता, निर्णय क्षमता, समाजात त्यांचं योगदान आणि प्रत्यक्ष मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अशा स्त्रिया यांच्यात किती विपरीत आहे? मालिकांमधील स्त्री पात्र या केवळ शोभेच्या बाहुलीप्रमाणे नटूनथटून दैनंदिन जीवनात वावरणे आणि कपटी डाव आखणे, नाती तोडण्यासाठी प्रयत्न करणे, हुकूमशाही करणे, यापलीकडे काय करतात? भारत अजून स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत प्रगती करतोय. ही अशी उदाहरणं देऊन समाजात नक्की काय संदेश दिला जातोय याचं सामाजिक भान मालिकांनी जपायला हवं.

या पात्रांना आयुष्यात काही ध्येयवादी असलेले, काही साध्य करण्याची धडपड करताना, लक्ष्य गाठताना घेतलेले कष्ट अथवा मेहनत करताना दाखवलं तर मालिका चालणार नाही असा यांचा समज आहे का? एका महिन्यात 300 कोटींची कंपनी करायची आणि नंतर भावनेच्या भरात ती एका अनुभव नसलेल्या, उथळ मुलीच्या स्वाधीन करायची, हे कुठे घडत असेल?

नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. जवळ जवळ प्रत्येक मालिकेमध्ये पुरुषाचे असे संबंध दाखवले आहेत. नवरा- बायकोच्या नात्यात सतत दाखवली जाणारी लपवाछपवी, सामंजस्याचा अभाव, नवऱ्याचे दुसरीशी असणारे संबंध, ती दुसरी स्त्रीदेखील कपटी असणं, संपत्तीसाठी जाळ्यात ओढणं, मुलाचा अथवा मुलीचा सूड घेण्यासाठी लग्न करणं... हे असं म्हणजेच नवरा बायकोचं नातं हे समीकरण मालिकांनी पक्कं केलं आहे.

या अवास्तव आणि अतिरंजित विश्वातून मालिकांची कथानकं, कधी बाहेर येणार? दर वेळेस समाज प्रबोधन कराच हा आग्रह नाही; परंतु वास्तवाशी निगडित काही कधी तरी दाखवाल की नाही.

srushti.pimpale@gmail.com

Web Title: women In serials, where exactly do such women meet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.