Why the rules for laughing? | हसण्याला नियम कशाला?
हसण्याला नियम कशाला?

-सोनाली लोहार


मी हसते तेव्हा 99 टक्के वेळा माझी संपूर्ण बत्तीशी दाखवून हसते, असं माझ्या सगळ्या प्रेमळ मित्न-मैत्रिणींचं म्हणणं आहे.
म्हणजे खासगीमध्ये ही मंडळी ‘एवढं दात काढून हसायला काय झालं?’ या शब्दातच माझा उद्धार करत असतात. पण मोजून मापून हसणं  मला जरा जडच जातं, हे अगदीच खरं आहे. हसणं हे आनंदी राहण्यासाठीचं एक जोरदार साधन आहे आणि ते सतत वापरत राहणं गरजेचं असतं, अशी माझी पक्की समजूत आहे. पण त्यामुळे लोकांचे मात्न भयंकर गैरसमज होत असतात! 
माझ्या लग्नाच्या वेळचा किस्सा आमच्या कुटुंबात आजही चवीनं चघळला जातो. आता लग्नाचा दिवस  म्हणजे आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस किनै? (मला खात्नी आहे इथे सर्व विवाहित मंडळींनी कपाळावर हात मारून घेतला असेल! असो.) तर त्या दिवशी स्टेजवर उभी असलेली नवरी, म्हणजे मी, येणा-या - जाणा-या च्या शुभेच्छांचा स्वीकार आपल्या खास बत्तीशी स्टाइलमध्ये अगदी आनंदानं निथळत करीत होते. पण खरंच सांगते, आनंद बघवला जात नाही हो काही मंडळींना! पाहुणे मंडळीतलं कोणीतरी वडिलांना बोललचं, ‘अहो किती हसतेय ही! नवरी आहे नं ती, थोडं आवरतं घ्यायला सांगा की जरा’. आता काय बोलायचं सांगा! हसण्यावर पण रेशनिंग?! 
 हसरंच आहे लेकरू आमचं असं म्हणून आमच्या बत्तीशीवर आईवडिलांनी पांघरुण घालायचे दिवस मग अशाप्रकारे संपले. 
किती हसावं, कसं हसावं, कधी हसावं, कधी हसू नये.. बापरे किती ते नियम !
माझ्या एका मैत्रिणीच्या आईचं निधन झालं. सुना- नातवंडं, मुलं-बाळं सगळ्यांचं छान झालेलं बघून समाधानानं आईनं डोळे मिटलेले. मैत्रीण दिवसभर डोळ्यातून टीप गाळत होती. आई जाण्याचं दु:खच खूप वेगळं असतं. दुस-या दिवशी आम्ही मैत्रिणी तिला परत भेटायला गेलो. सगळी नातेवाईक मंडळी बसली होती. आम्ही आमच्या मैत्रिणीशी एका कोप-यात बोलत होतो. वातावरण हलकं करावं म्हणून आमच्यातल्या एकीनं जरा वेगळा विषय काढला आणि तो किस्सा ऐकून आमची ती मैत्रीण एकदम खुदकन हसली. 
एका क्षणात सगळ्या नातेवाइकांचे चेहरे गर्रकन आमच्या दिशेनं वळले. आश्चर्य, राग, संशय, तुच्छता.. बापरे, काय काय भाव होते त्या नजरांमध्ये! खोलीत एकदम पिनड्रॉप शांतता! मैत्रिणीचे डोळे परत भरून आले. मात्र  या वेळेला ते अश्रू आईसाठी कमी आणि अपराधीपणाच्या भावनेचे जास्त होते. मला प्रश्न पडला, ती हसली म्हणजे तिचं आई जाण्याचं दु:ख संपलं असं होतं का? खरं तर अशा परिस्थितीत तिच्या चेह-यावर आलेलं एक हास्य हे गरजेचं नव्हतं का? खरंच हसणं म्हणजे आनंद आणि रडणं म्हणजेच दु:ख व्यक्त करणं असतं का? कधी कधी नं हसरा चेहराही फार फसवून जातो. 
‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा राहे हो’. छातीत उफाळून येणा-या दु:खाला खोलवर दाबून चेह-यावर उमटलेले हसू हे खूप वेदनादायी असतं. 
माझी एक मैत्रीण अशीच कायम एक हसरा मुखवटा घालून असते. वैयक्तिक आयुष्यात सुखानं तिची साथ कधीच सोडून दिलीय. कॅन्सर झालाय, नव-यानं घटस्फोटाची नोटीस दिलीय, ऑफिसमधे वरिष्ठांचं सहकार्य नाही, नातेवाइकांचं पाठबळ नाही. काय आणि किती वाईट व्हावं एखाद्याच्या बाबतीत, त्याचं हे उदाहरण. 
एकट्यात स्वत:ला कोंडून घेऊन ती कधी कधी मुसळधार रडून घेते. आमच्यासारख्या एक-दोन घट्ट मैत्रिणींकडे कधीतरी सगळी तडफड काढते; पण बाहेरच्या जगासमोर मात्र तोच हसरा मुखवटा! जिवाच्या आकांतानं चेह-यावर ओढून आणलेलं ते हसू. दमछाक होतेय तिची, पण तिला माहितीये ज्या क्षणी ते हसू तिला ओढून आणता येणार नाही त्या क्षणी ती संपली असेल. पठ्ठी, अशी मस्त गंडवतेय जगाला.
काही हास्य मात्रनं, अगदी सहज उमललेल्या पहाटेच्या केशरी देठाच्या प्राजक्तफुलासारखी निर्मळ असतात. जीवणीच्या कडांवरून ओघळून जेव्हा चेह-यावर पसरतात तेव्हा पहाट झाल्याचा भास होतो. आतून-बाहेरून शांत, शुद्ध  सात्त्विकतेतून उमलेलं हे असं हास्य  आजकाल दुर्मीळ होत चाललं  आहे. पण चुकून- माकून अशा हास्याची नजरभेट झालीच तर मग मात्र सगळा दिवसच कसा सुंदर बनून जातो.
याच्या अगदी विरुद्ध उदाहरण म्हणजे आमचे एक मित्रवर्य. त्याच हसणं म्हणजे किंचित मान वाकडी करून नागानं फुत्कार टाकावं तसं छद्मीपणे घशातून  हँ  असा आवाज काढणं असतं. त्या एका हँ चा अर्थ ‘फालतू लेकाचे! मराल एक दिवस किड्या मुंग्यांच्या मौतीने’ या टाइप असतो. असं सगळं असूनही तो अजूनही आमच्या मित्न परिवाराचा हिस्सा कसा आहे ते आम्हा अबोध (त्याच्या भाषेत निर्बुद्ध ) मंडळींना अजून समजलेलं नाही.
काही मंडळींचं हसू हे अगदी डोळ्यातूनच सांडायला सुरुवात होते. म्हणजे शब्दश: हं!
माझ्या एका मैत्रिणीला हसू अनावर झालं की ती एकाक्षणी घुसमटून रडायलाच लागते. तिच्याबरोबर विनोदी नाटक-चित्रपट बघायला जाणं म्हणजे तर आपली गेल्या जन्मीची पापं या जन्मी फेडण्याइतकं वाईट असतं. रंगमंचावर जोरदार विनोद घडत असताना ही बाई इथे आपल्या शेजारी बसून जोरजोरानं हुंदके देत असते. लोक विचित्र नजरेनं आपल्याचकडे बघतात आणि आपली अवस्था म्हणजे ‘सांगताही येत नाही आणि उठताही येत नाही’ अशी होऊन जाते. 
काही जादूगार मंडळी मात्र हसतात बरं का फक्त डोळ्यांनीच. चेह-यावरची रेषाही न हलवता ! त्यांच्या डोळ्यातली चमकच इतकी गहिरी होते की अंधारात एखादी वीज लख्खकन चमकून जावी. हे हसू ओळखायला मात्र जबरदस्त अनुभवी नजर लागते. खेळात नवख्या असणा-याला ते सहजासहजी नाही जमत. गंमत असते हो हसण्याची! किती ते प्रकार त्याचे.
 प्रेमळ हसू, लबाड हसू, निरागस हसू, अगतिक हसू, राजकीय हसू, मादक हसू, दु:खी हसू, बंदिस्त हसू, मुक्त हसू, गूढ हसू, तृप्त हसू. कसंही असावं; पण हास्य असावं. हरवलं असेल एखाद्याचं तर शोधून आणून द्यावं. पण हसणं असावं!  
आयुष्यातल्या खूप सार्‍या  दु:खाच्या-तणावाच्या प्रसंगात मला आपले पु. लं., चार्ली-चॅप्लिन आणि कधीकधी अगदी टॉम अँण्ड जेरीनेही तारून नेलं आहे. हास्य हे फार मोठं औषध आहे. खूप सा-या  वेदना आणि जखमांवरचा इलाज. कुठेतरी हृदयाचा एक बालिश कोपरा असतो, त्याचं कोवळेपण जपलं तर करता येतो तो. आणि मग येतं हसता मोकळेपणानं कुठल्याही वेदनेला पचवून किंवा पार तिच्या छाताडावर उभं राहूनही! 
मी आजही तितकीच खळखळून हसते, आजही अधूनमधून कोणीतरी कुजबुजत, ‘बाई जरा जास्तच हसतात नै’. ते ऐकलं की माझं हसू दुप्पट होऊन जातं. 
डोक्यात कुठेतरी कोणीतरी सतत एक सूर आळवत असतं.
.सुहास्य तुझे मनास मोही.!

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत) 

sonali.lohar@gmail.com

Web Title:  Why the rules for laughing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.