Why need to tell us to keep clean? | स्वच्छता ठेवा हे आपल्याला सांगावं का लागतं?
स्वच्छता ठेवा हे आपल्याला सांगावं का लागतं?

-सायली राजाध्यक्ष


स्वच्छता हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य आणि आवश्यक भाग आहे हेच अनेकांना मुळात मान्य नाहीये. स्वच्छता आहे की नाही हे ठरविण्याचे माझे दोन सोपे निकष असतात. कुठल्याही घरात गेल्यावर, त्या घरातलं स्वयंपाकघर आणि न्हाणीघर कसं आहे यावर त्या घरातली स्वच्छता ठरते. हेच निकष रेस्टॉरण्टलाही लागू होतात. 

रेस्टॉरण्टचं बाथरूम आणि किचन कसं आहे यावर त्या रेस्टॉरण्टमध्ये किती स्वच्छता पाळली जाते ते कळतं. अनेक घरांमध्ये बाथरूममध्ये ओल्या कपड्यांचा वास येत असतो. जाळीवर केसांचे दिवसेंदिवस साठलेले पुंजके असतात.
भारतात सरकारला लोकांनी हात स्वच्छ धुवावेत यासाठी अजूनही जाहिराती कराव्या लागतात.  साबणानं हात कसे धुवावेत आणि का धुवावेत हे लोकांना परत परत समजावून सांगूनही पटत नाही. केवळ हात स्वच्छ धुतल्यानं आपण अनेक आजारांना दूर ठेवू शकतो; पण अनेकांना हे मान्य करणंच अवघड जातं. शिंकताना, खोकताना नाकासमोर रूमाल धरावा हे लोकांना सांगावं लागतं. रस्त्यात थुंकणं तर आपल्याकडे सर्रास चालतं. मुळात थुंकावंसं का वाटतं?  थुंकी ही शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रि या आहे. ती गिळणं अपायकारक नाही; पण तसं न करता लोक पचापच रस्त्यावर थुंकत असतात. 

शाळेत शिकवतात, महानगरपालिका जाहिराती करतात, जागोजागी फलक लावलेले असतात; पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करून लोकांचं थुंकणं सुरूच असतं. नुकतीच कोलकात्याला जाऊन आले. इतक्या सुंदर आणि जुन्या शहरांची लोकांनी अस्वच्छेतनं वाट लावलेली आहे. ही एकेकाळची ब्रिटिशांची राजधानी. एकेकाळच्या वैभवाची साक्ष देणा-या  इमारती आता मोडकळीला आलेल्या. त्याची डागडुजी नाही. जागोजागी इलेक्ट्रिसिटीच्या तारा लोंबकळत असलेल्या. रस्त्यावर जागोजागी थुंकलेलं, खाण्याच्या अत्यंत कळकट टप-या. कच-याचे ढीग. एकूण परिस्थिती फार वाईट. बरं पाणी नाही म्हणावं तर जागोजागी ब्रिटिशांच्या काळातले सार्वजनिक नळ आहेत ते अव्याहत चालू असतात. लोक त्याखाली रस्त्यावरच अंघोळी करत असतात. त्या पाण्याची जागोजागी थारोळी असतात. आपण काय करतोय हे आपल्या शहरांचं? 
जे शहरांचं, तेच घरांचं. आपल्या ओळखीच्या लोकांची घरं बघा, कळकट चादरी, वर्षानुवर्षं साफ न केलेले सोफे आणि खुच्र्या, धुळीनं माखलेलं फर्निचर हे आपण कित्येकांच्या घरात बघतो. सुदैवानं भारतात आपल्याला मदतनीस मिळतात. स्वत:ला होत नसेल तर मदत घ्या ना करून इतरांकडून. थोडे पैसे मोजावे लागतील. र्शमाला तितकं मोल द्यायला हवंच; पण लोकांना नाही पटत ते. स्वयंपाकघरात वापरले जाणारे रूमाल रोज बदलायला हवेत. किंबहुना दिवसातून दोनदा बदलायला हवेत. ते धुताना उकळत्या पाण्यात भिजवून धुवायला हवेत. 
ओटा-टेबल पुसण्याचं कापड जंतुनाशक घालून भिजवून ठेवायला हवं. खरोखर विचार करा - हे किती घरांमध्ये घडतं? मग प्रश्न असा आहे की यात काय अवघड आहे? माझ्या परीनं मी याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केलाय. आणि ते म्हणजे स्वच्छतेबद्दल लोकांच्या मनात असलेली अनास्था. 
परदेशातही अत्यंत घाण बाळगणारे लोक असतात, नाही असं नाही; पण त्यांची संख्या तुलनेनं फार कमी असते. तर आपल्याकडे स्वच्छता पाळणा-याची संख्या कमी असते. आपल्याकडे नागरिकशास्त्रात भलेही काही शिकवलं जावो, पण प्रत्यक्षात वागता-बोलताना नक्की काय करायचं असतं हे अनेकांना उमगतच नाही. 

मी मुंबईत राहाते. मुंबईत सामान्यपणे लोक फ्लॅटमध्ये राहातात. आपलं घर स्वच्छ ठेवणारे पण फ्लॅटच्या दाराबाहेर घाण करणारे अनेक लोक मला माहीत आहेत. आपल्या घराबरोबरच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे? ती आपली जबाबदारी नाही का? कच-याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. ज्या कच-याचं विघटन होतं तो वेगळा ठेवून विघटन न होणारा कचरा वेगळा ठेवणं महत्त्वाचं आहे. प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे.  हातालाच वळण लावलं तर अनेक गोष्टी सोप्या होतील.

हे करता येईल?
 * वारंवार साबणानं चोळून हात धुणं.
 * स्वयंपाकघरातले रूमाल उकळत्या पाण्यात धुणं आणि वेळोवेळी बदलणं.
*  ओटा-टेबल पुसायचे कपडे जंतुनाशक घालून धुणं.
*  कच-याचं वर्गीकरण करून मग विल्हेवाट लावणं.
 * फ्रीज, मायक्रोवेव्हसारखी यंत्रं  जंतुनाशकानं पुसणं, त्यांची स्वच्छता राखणं.
*  पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुऊन मग भरणं.
 * पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर लावणं आणि शक्य झाल्यास उकळून पिणं.
 * घरातल्या चादरी, अभ्रे, सोफा कव्हर, खुर्च्यांचे  कव्हर वेळोवेळी बदलणं.
* स्वयंपाकघरात हात धुण्याचा साबण ठेवणं आणि मदतनिसांना त्याचा वापर  करणं अनिवार्य करणं.
 * आपल्या घराबरोबरच आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं. 
*  अस्वच्छता करणा-याना संकोच न बाळगता स्पष्ट शब्दांमध्ये सांगणं.

(लेखिका साहित्य, स्वयंपाक आणि जीवनशैलीच्या आस्वादक आहेत) 

sayaliwrites@gmail.com

Web Title: Why need to tell us to keep clean?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.