Wheat Chivada.. Very easy if you try | गव्हाचा चिवडा केला तर जमतो!
गव्हाचा चिवडा केला तर जमतो!

-निता बारी, शिरपूर, धुळे. 

 प्रवासात सोबत म्हणून किंवा घरातही मधल्या वेळेस भूक लागते तेव्हा पोटभरीचा खाऊ हवा असतो. आम्ही लहान असताना या पोटभरीच्या खाऊसाठी आईला कधीही दुकानात जावं लागलं नाही. ती घरातच अनेक प्रकारचा खाऊ तयार करायची. त्या खाऊपैकी आम्हा सर्वांना आवडायचा तो आईच्या हातचा गव्हाचा खमंग चिवडा. 

गव्हाचा चिवडा करणं ही तशी सोपी गोष्ट नाही; पण आमच्या घरी तो नेहमी असायचा. माझी आई आणि आजी हा चिवडा करायची. आता मीही करते. मेहनतीचं काम म्हणून तो कोणी करत नाही. बाजारातही हा चिवडा मिळतो, पण आपण घरी करतो तशी चव या चिवड्याला नसते. गव्हाच्या चिवड्याची तयारी महत्त्वाची. ही तयारी करणं अंगवळणी पडलं की मनात आला तेव्हा हा चिवडा करता येतो. 

तयारी : गहू पाण्यात भिजत टाकावे. तिसर्‍या दिवशी गव्हाचे पोट उलते. नंतर ते गहू पाण्यातून स्वच्छ धुऊन टोपलीत निथळत ठेवावेत. त्यातलं पाणी पूर्ण निघालं की गव्हाला मीठ, पापड खार, सवागी आणि सोडा व्यवस्थित लावून घ्यावा. रात्रभर गहू झाकून ठेवावे. सकाळी उन्हात वाळत टाकावे. तीन-चार दिवस चांगले कडकडीत वाळले की डब्यात भरावेत. चिवडा करतेवेळी ते आपल्याला वापरता येतात. हे गहू जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच करतात. तरच ते चांगले फुलतात. हे गहू तेलात किंवा मिठात गरम करून फुलवतात.
गव्हाचा चिवडा
साहित्य : भिजवून वाळवलेले गहू, शेंगदाणे, दाळ्या, लसूण, जिरे, कढीपत्ता, धनेपूड, जिरेपूड, मीठ, तिखट आणि हळद. 

कृती : गहू तेलात किंवा मिठात भाजून फुलवून घ्यावेत. त्याला लसूण, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, डाळ्या यांची फोडणी करावी. जिरेपूड, धनेपूड, तिखट, मीठ, हळद चवीप्रमाणे टाकून कालवून घ्यावेत. आवडत असल्यास थोडी पिठीसाखर टाकावी. वाटल्यास थोडी शेवही टाकू शकतो.


Web Title: Wheat Chivada.. Very easy if you try
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.