What will you do to keep your home fresh and airy in the rainy season? | पावसाळ्यात घर प्रसन्न ठेवण्यासाठी काय कराल?
पावसाळ्यात घर प्रसन्न ठेवण्यासाठी काय कराल?

-कविता भालेराव

पाऊस येण्याआधी पावसाची आपण आतुरतेनं वाट पाहतो. आणि पाऊस एकदा सुरू झाला की मग आनंद होता; पण तो खूपच पडायला लागला की मात्र त्रास होतो. 
पावसाळ्यात ऊन नाही खूप त्यामुळे एक प्रकारचं उदास वातावरण तयार होतं. घरातही एक प्रकारचा दमटपणा राहातो. 
या दमटपणामुळे घराची, घरातल्या वस्तूंचीही खूप काळजी घ्यावी लागते. खूप पाऊस सुरू होण्याआधी आपण घराचं छत, गच्ची, बाल्कनी साफ करून घेतोच; पण काही गोष्टी करायच्या राहातात किंवा त्या जास्त पाऊस झाल्यामुळे म्हणून आपल्याला कराव्या लागतात. अगदी छोट्या वाटणा-या गोष्टी पावसाच्या काळात आपल्या घराला उत्साही, ताजंतवानं ठेवण्यासाठी फारच उपयुक्त असतात.
 

हे करता येईल.

1. घरातल्या खिडक्या शक्यतो उघड्या ठेवाव्यात. त्यामुळे हवा खेळती राहाते. दमटपणा कमी होतो. खिडकीच्या फटीतून पाणी येत असेल तर ती सिलिकोन किंवा तत्सम सोल्युशननं भरून टाकावी.
2. शू रॅकचे दरवाजेपण अधूनमधून उघडे करून ठेवावेत. म्हणजे त्यात कुबट वास राहात नाही. शू रॅक वेळोवेळी साफ करावी. कारण त्यात माती राहाते. कधी कधी ओले मोजेपण शूजमध्ये राहातात त्यामुळे शू रॅकमध्ये कुबट वास राहातो. हा वास  त्रासदायक ठरतो. शू रॅकमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवाव्यात म्हणजे वास येतं नाही.
3. दमट आणि कोंदट वातावरणात झुरळं जास्त होण्याची शक्यता असते.  पण मोकळ्या खिडकीमुळे जर स्वयंपाकघरात हवा खेळती राहिली तर झुरळं होत नाहीत. सिंक खालील जागा नियमितपणे स्वच्छ ठेवावी कारण तिथेपण वास येत  राहातो.
4. स्वयंपाकघरातील कपाटांचे दरवाजे अधूनमधून उघडे करून ठेवावेत. यामुळे हवा खेळती राहाते आणि धान्य नीट राहण्यासाठी मदत होते.
5.  झोपण्याच्या खोलीतली खिडकी जर उघडी ठेवता येतं नसेल तर किमान जाळी उघडी करून ठेवावी. पावसाळ्यात ब-याचदा खिडकीत कपडे वाळत घातलेले असतात. त्यामुळेपण खोलीत अंधार वाटतो आणि हवा येत नसल्यानं कोंदटल्यासारखं वाटतं. शक्य असल्यास कपडे स्टॅण्डवर वाळत घालावे आणि खिडक्या मोकळ्या ठेवाव्यात. 
6. झोपण्याच्या खोलीमधील कपड्यांची कपाटं  मधून मधून उघडी करून ठेवावीत. म्हणजे कपडे हवेशीर राहातात. आजकाल ज्या सुवासिक स्ट्रीप मिळतात किंवा सॅशे मिळतात ते कपाटात ठेवावे. अगदी सोपं काही करायचं झाल्यास कडुलिंबाच्या झाडाची पानं ठेवावीत. म्हणजे कपड्यांना विचित्र वास येत नाही. कपाटात कपडे ठेवताना आधीपेपर पसरवून मगच कपडे ठेवावे. महत्त्वाची कागदपत्रं ही प्लॅस्टिक फोल्डरमध्ये ठेवावीत. 
7. पावसाळ्यात न्हाणीघरात फारच कोंदट वातावरण निर्माण झालेलं असतं. न्हाणीघरातले लुवार्स जास्तीत जास्त उघडे ठेवावे म्हणजे न्हाणीघर स्वच्छ राहायला मदत होईल. न्हाणीघरातल्या नाहणी जाळीवर जास्तीत जास्त डांबराच्या गोळ्या ठेवाव्यात म्हणजे झुरळं होत नाही. सुवासिक कँडल ठेवणे, स्प्रे मारणे किंवा सुगंधी स्ट्रिप ठेवणे यामुळे न्हाणीघर प्रसन्न राहायला मदत होते. 
8. खूप पाऊस पडताना गालिचे गुंडाळून ठेवून द्यावेत. प्लॅस्टिकमध्ये रोल करून ठेवावेत. वूडन फ्लोरिंग व्हॅक्स पॉलिश करून घेतल्यास ते फुगत नाही. आजकालच्या फरशीवर पाणी सांडलेलं दिसत नाही त्यामुळे फरशी सतत कोरडी ठेवावी. नाहीतर अपघात होण्याची शक्यता असते.
9. कुंद वातावरणात घर ताजंतवानं ठेवण्यासाठी चमकदारर रंगाचे पडदे लावावेत. कुशनचे अभ्रेही अशाच प्रकारच्या रंगाचे वापरावेत. जेणेकरून वातावरणातील औदासिन्य कमी वाटतो.
10. बाल्कनीतील काही झाडं घरात आणून ठेवावीत म्हणजे आनंदी वाटतं. फक्त कुंडीच्या ताटलीतलं पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी.
11. घरात एकूणच वातावरण प्रसन्न राहण्यासाठी सुगंधी मेणबत्त्यांचा वापर करावा. घरात विविध सुंदर फुलांची सजावट करावी. घरात आपल्याला आवडेल असा एक कॉर्नर तयार करावा.

( लेखिका इंटिरिअर डिझायनर आहेत)

kavitab6@gmail.com


Web Title: What will you do to keep your home fresh and airy in the rainy season?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.