What was the reason for women's weeping ? | ‘ हर एक बात पे रोना आया’ असं बायकांच्याच बाबतीत का होतं?
‘ हर एक बात पे रोना आया’ असं बायकांच्याच बाबतीत का होतं?

-डॉ. मृदुला बेळे

आज शाळेचा पहिला दिवस. स्नेहा आणि तिचा पती राजेश त्यांच्या लेकीला, मुक्ताला शाळेत सोडायला आले आहेत. राजेशची कार शाळेजवळ थांबते आणि मुक्ता मजेत हात हलवून टाटा करत निघून जाते. राजेश कार सुरू करून घरी जायला निघतो. बराच वेळ झाला, स्नेहा काही बोलत  नाहीये, हे लक्षात येऊन तो तिच्याकडे पहातो तर स्नेहाच्या डोळ्यातून धो धो अश्रूपात होत असलेला.
‘अगं काय झालं काय इतकं रडायला? मुक्ता काय पहिल्यांदा शाळेत जातेय का? पाचवीत गेली आहे ती आता? रडतेस काय इतकी?’ - राजेश 

‘हो, बघ ना रे. एवढीशी चिमुरडी होती मुक्ता. तिला प्ले ग्रुपला सोडायला आलो होतो. बघता बघता नर्सरी, केजी, प्रायमरी संपलं आणि हायस्कूलला गेलीसुद्धा. आता लवकरच तिची शाळा संपेल, मग कॉलेज संपेल, आणि सासरी जाईल की रे ती निघून. किती भरभर मोठी होते आहे ती’ - मुसमुसत हे बोलत असताना स्नेहाच्या डोळ्यातून अखंड अश्रूपात चालू आहे. आणि हा तडीपार विचार करून आपली बायको इतके अश्रू का वाया घालवतेय याची राजेशला काहीही टोटल लागत नाही.

 अनघा आणि अपर्णा दोघी सख्ख्या मैत्रिणी. अनघा गेली काही वर्षं योगसाधना करतेय. काही महिन्यांपूर्वी तिनं अपर्णालाही आपल्या योगासनाच्या क्लासला यायला भाग पाडलं आहे. क्लास घेणारी मेधाही अनघाची मैत्रीण आहे. मेधा आज योगनिद्रा शिकवते आहे. सगळेजण हळूहळू योगसमाधीत गेले आहेत. शांत वाटतं आहे सगळ्यांना. क्लास संपला आहे. अनघा आज योगनिद्रेत किती शांत वाटलं ते मेधाला सांगते आहे, आणि अचानक अपर्णाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलंय.
‘अगं काय झालं काय?’ - अनघा विचारते.

‘खूप प्रयत्न करून मी जाऊच शकले नाही योगनिद्रेत. माझ्या नशिबातच नव्हता हा सुंदर अनुभव’ - अपर्णा 
‘अगं पुढच्या वेळी जमेल तुला. त्यात काय एवढं?’ - मेधा 
पण आपल्या मैत्रिणीला हा सुंदर अनुभव आज मिळाला नाही म्हणून आता अनघाच्याही डोळ्यात पाणी आलंय. आणि या दोघींचं एकमेकींवरचं प्रेम पाहून मेधाच्याही. जवळ उभा राहून त्यांचा हा संवाद ऐकणारा गिरीश मात्र हे सगळं पाहून चाट पडला. 
 

बॉसच्या केबिनमध्ये वंदना तरातरा शिरते तेव्हा ती प्रचंड चिडलेली आहे. तिची काहीही चूक नसताना तिला काल मेमो मिळाला, त्याचा जाब विचारण्यासाठी ती आता चालली आहे. बॉसला सूनवायचंच असं ठरवून ती आत जाते पण तावातावानं बोलता बोलता ती कधी रडायला लागली हे तिला कळतच नाही. तिच्या डोळ्यातून घळाघळा वाहाणारे अश्रू पाहून बॉसलाही काही सुचेनासं होतं. चिडण्याऐवजी आपण रडलो का म्हणत वैतागून चडफडत वंदना बाहेर पडते.

आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर ब-याच बायकांचं असं होतं. किरकोळ कारणावरून त्या कधी रडायला लागतील हे इतरांना तर सोडाच, खुद्द त्यांनाही समजत नाही.अनेकदा तर बायका अशा रडतात हा चेष्टेचा विषय असतो पुरुषांच्या गप्पांमध्ये. एवढय़ा तेवढय़ावर रडून त्या सगळी सहानुभूती आपल्याकडे खेचून घेतात असंही अनेकांना वाटतं. विशेषत: कामाच्या जागांवर, ऑफिसमध्ये बायका शस्त्र म्हणून आपल्या रडण्याचा ‘वापर’ करतात असाही आरोप केला जातो. तर ‘आम्ही जास्त संवेदनशील आहोत, हळव्या आहोत, तुमच्यासारख्या दगड नाही, म्हणून रडतो आम्ही’ हे बायकांनी पुरुषांना यावर दिलेलं उत्तर असतं. 

खरंच असं असतं का? म्हणजे संवेदनशील असलेला माणूस जास्त रडतो, आणि जो रडत नाही तो संवेदनशील नसतो, असं काही आहे का? 
डॉ. व्हिंगरहोट्स म्हणून एक डच प्राध्यापक आहेत. माणसाचं रडणं आणि त्याचे अश्रू  हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार स्त्रिया वर्षातून सरासरी तीस ते चौसष्ठ वेळेला रडतात, तर पुरुष रडतात सहा ते सतरा वेळेस. शिवाय एकदा  रडायला लागल्या की बायका जितका वेळ रडण्यात घालवतात तो पुरुषांपेक्षा दुप्पट असतो.  

हे असं का आहे? खरंच का बायका जास्त हळव्या असतात पुरुषांपेक्षा? 
असं सरसकटीकरण सर्रास केलं जातं खरं. पण अनेक शास्रशुद्ध अभ्यासातून हे सिद्ध झालंय की हे चूक आहे. खरं तर जितक्या वेळेला बायका भावनाप्रधान झालेल्या असतात तेवढय़ाच वेळेला पुरुषही भावनाप्रधान होतात. पण त्यांच्या रडण्याच्या प्रमाणात मात्र खूप तफावत आहे. म्हणजेच काय, तर बायका आपल्या भावना रडण्याच्या स्वरूपात जास्त प्रमाणात व्यक्त करतात. पुरुष मात्न या भावना दाबून ठेवणं पसंत करतो. कारण ‘रडतोस काय बायकांसारखा?’ हे वाक्य त्यानं आयुष्यभर ऐकलेलं असतं. ‘आपण किती कणखर आहोत’ हे दाखवणं भाग आहे हे त्याच्या मनावर बिंबवलं गेलेलं असतं. त्यामुळे तो आपले अश्रू गिळून टाकायला शिकतो.

पटकन रडून मोकळं होणं हे बाईला मिळालेलं एक वरदान आहे. कारण रडून झालं की ती मोकळी होते. भावनांची वाफ निघून जाऊन ती शांत होते.  तणाव रडून पटकन कमी होतो. पुरुष मात्र आतल्या आत सोसत बसतो आणि जास्तीचे तणाव निर्माण करतो. शिवाय रडणा-या  व्यक्तीला  कुणाच्या तरी भावनिक आधाराची गरज आहे, असं आसपासच्या लोकांना समजतं. रडणा-या चे अश्रूच जणू ही मदत मागत असतात. ही मदत मिळाली तर  भावनांचा निचरा व्हायला मदत होते. स्रिया रडून अशी मदत जणू नि:संकोचपणे मागत असतात. पुरुष मात्र  एकटाच कुढत बसतो. 

बायकांच्या जास्त रडण्याला काही जीवशास्त्रीय आणि शारीरिक कारणंही आहेत ! त्यातलं एक कारण म्हणजे पुरुषाच्या डोळ्यात ज्या अश्रूनलिका असतात  त्या ब-याच खोल असतात. त्यामुळे डोळ्यात टच्चकन पाणी येऊन वाहायला लागत नाही. बाईच्या डोळ्यातल्या अश्रूनलिका मात्र  ब-याच उथळ असतात. त्यामुळे त्या पटकन भरतात आणि वाहायला लागतात. टेस्टोस्टेरोन हे जे पुरुषात प्राधान्यानं असलेलं हॉर्मोन आहे, तेही त्यांना सहजासहजी रडू देत नाही. 

विशेष म्हणजे कधी मात्र  डोळ्यात कचरा गेला म्हणून, किंवा कांदा चिरला म्हणून डोळ्यात पाणी येतं पण आश्चर्य  म्हणजे भावनाप्रधान होऊन ढाळलेले अश्रू  आणि इतर कारणामुळे वाहिलेले अश्रू  यांच्यात चक्क रासायनिक फरक असतो. भावनिक अश्रू मध्ये  प्रोलॅक्टीन नावाचं एक हॉर्मोन सापडतं जे इतर अश्रूमध्ये नसतं. हे भावभावनांशी सबंध असलेलं हॉर्मोन आहे. या हॉर्मोनचं बायकांच्या रक्तातलं प्रमाण पुरुषांपेक्षा तब्बल साठ टक्के जास्त असतं.

लहानपणी मुलात आणि मुलीत असलेल्या या हॉर्मोनेच्या प्रमाणात काहीही फरक नसतो. त्यामुळे लहान मुली आणि  मुलं सारख्याच प्रमाणात रडतात. मोठेपणी मात्र हे प्रमाण बदलतं. आणि म्हणून कदाचीत बायका पुरुषांपेक्षा जास्त रडतात. 

पण इतकी चिरफाड कशाला बायकांच्या रडण्याची? तर आपल्या रडण्यामुळे जर आपला तणाव कमी होत असेल, आणि तो कमी करणारे सुहृद मिळणार असतील तर आपल्या रडण्याला लाजायचं कशाला? चारचौघात डोळ्यात पाणी आलं तर आलं! ज्यानं फायदा होतो ती गोष्ट करणं कशाला सोडायचं? ‘बायका रड्याच असतात’ म्हणून कुणी थट्टा केली तर बिनधास्त ठणकावून म्हणायचं की,

कभी खुदपे कभी हालातपे रोना आया 
बात निकली तो हर इक बातपे रोना आया, 

हे अजरामर गाणं लिहिणारा साहीर, गाणारा रफी, संगीत देणारे जयदेव आणि त्यावर अभिनय करणारा देव आनंद, सगळे पुरुषच आहेत बरं का !

(शिकण्या-शिकवण्यात रमणा-या लेखिका प्राध्यापक आहेत.)

 mrudulabele@gmail.com


Web Title: What was the reason for women's weeping ?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.