What if you want to get rid of the confusion of what to wear for office? | ऑफिसमध्ये काय घालू हा गोंधळ सोडवायचा असेल तर!
ऑफिसमध्ये काय घालू हा गोंधळ सोडवायचा असेल तर!

-सायली राजाध्यक्ष

देशात किंवा परदेशात कॉन्फरन्सला गेल्यावर कशा प्रकारचे कपडे घालावेत, असा प्रश्न मध्यंतरी एका मैत्रिणीनं विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काही तज्ज्ञ नाही. पण मला जे काही वाटतं ते मी सांगते.

 साड्या-सलवार कमीज-ट्राउझर्स-शर्ट

आपल्या देशात ज्या  स्त्रिया बँका, वित्तीय संस्था, महाविद्यालयं अशा ठिकाणी काम करतात त्या साड्या नेसण्याला प्राधान्य देतात. फक्त एरवी नेसण्याच्या साड्या आणि कामाच्या ठिकाणी नेसायच्या साड्या यात फरक आहे. कामावर जाताना साडी नेसायची असेल तेव्हा काही पथ्यं पाळावी लागतात. म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही किती आणि कशा प्रकारच्या लोकांना भेटता याचा विचार साड्या निवडताना करणं गरजेचं आहे.

तुम्ही एखाद्या बँकेत मोठय़ा अधिकारपदावर आहात तर मग तिथे तुम्हाला मीटिंग्जना, कॉन्फरन्सना जावं लागतं, वेगवेगळ्या लोकांना रोज भेटावं लागतं. तेव्हा तुम्ही खादी, रॉ सिल्क, टस्सर सिल्क, कॉटन, कोटा अशा पोताच्या साड्या नेसाव्यात. या साड्या निवडताना सौम्य रंगसंगती, सौम्य डिझाइन निवडावं.

याबरोबर उत्तम फिटिंगचं; पण साध्या पद्धतीचं ब्लाउज असावं. म्हणजे कोपरापर्यंतच्या बाह्यांचं किंवा थोड्या लांब बाह्यांचं किंवा साधं स्लीव्हलेसही चालेल. पण या ब्लाउजना विचित्र  आकाराचे गळे, नाड्या, लेस, घुंगरं, मणी आदी नसावेत. तुम्हाला साड्या वापरायच्या नसतील तर उत्तम दर्जाच्या कापडाचे म्हणजे खादी, रॉ सिल्क, कॉटन, सिल्क अशा प्रकारच्या कापडांचे, चांगल्या फिटिंगचे सलवार कमीज वापरू शकता. पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे आवडत असतील तर फॉर्मल ट्राउर्जस आपल्याकडे सर्रास मिळतात. त्यावर फॉर्मल शर्ट आणि एखादा सिल्कचा स्टोल किंवा स्कार्फ घेतला की काम भागतं. किंवा लिनन ट्राउर्जस आणि लिनन शर्ट किंवा टॉप्सही उत्तम दिसतात.

 दागिने कोणते असावेत?

कामाच्या ठिकाणी साड्यांवर अगदी माफक; पण उत्तम दर्जाचे दागिने घालावेत. लहानसं गळ्याशी बसणारं हि-याचं किंवा सोन्याचं मंगळसूत्र, मोत्याचा नाजुकसा सर, सोन्याची साखळी, चांदीची साखळी असं आपल्या आवडीप्रमाणे काहीही घालता येईल. आपल्या कपड्यांच्या रंगसंगतीला अनुसरून त्याची निवड करावी. बरोबर मॅचिंग कानातलं, हातात एखादी बांगडी किंवा ब्रेसलेट  घालावं. सलवार कमीज असेल तर मग साधेसेच दागिने घालावेत.

 इन्फॉर्मल कपड्यांची हौस
जाहिरात, मनोरंजन, लाइफस्टाइल नियतकालिक अशा ठिकाणी काम करत असाल तर तुम्हाला कपड्यांची निवड करण्यासाठी मनसोक्त पर्याय आहे. अशा ठिकाणी तुम्ही काहीसे इनफॉर्मल कपडे घालू शकता. म्हणजे लिनन ट्राउझर्स, हॅण्ड ब्लॉक प्रिण्टच्या कुर्तीज, फंकी टॉप्स, फ्लोरल स्कर्ट्, हारेम पॅण्ट्स, पलाझो, लाँग ड्रेसेस असं घालू शकता. सिल्व्हर ज्युलरी, मोठय़ा मण्यांची, ठाशीव रंगसंगतीची ज्युलरी घालू शकता. वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या कापडी बॅग्ज वापरू शकता. 

 कामानिमित्त परदेशात जाता तेव्हा.

जेव्हा परदेशात भारतीय प्रतिनिधी म्हणून तुम्ही कॉन्फरन्सला जाता तेव्हा साडी हा फॉर्मल पोशाख होतो. पण जर साडी नेसायला आवडत नसेल तर मग खादी, रॉ सिल्क, टस्सर सिल्क अशा पोतामध्ये सलवार कमीज वापरावेत किंवा वेल फिटेड पॅण्ट आणि अशाच पोताचे कुडते वापरावेत. रंग निवडताना साधारणपणे पेस्टल शेड्स किंवा ऑफ व्हाइट, काळा, काळ्याजवळ जाणारा निळा, पांढरा असे मोनोक्रोम्स वापरावेत किंवा अगदी फिका असेल तर कुठलाही रंग चालेल. पण राणी, चिंतामणी, केशरी, आंबा, लिंबू असे रंग शक्यतो निवडू नयेत. सलवार कमीजवर ओढणी घ्यायची नसेल तर मग स्टॅण्ड कॉलर, अगदी लहान गळा किंवा बंद गळा असे सलवार कमीज वापरावेत. पण जर गोल, व्ही, चौकोनी असा गळा असेल तर ओढणी घ्यावी. ओढणीचा रंगही सौम्य असावा.

बरोबर उत्तम डिझाइनच्या लेदर चपला किंवा बूट वापरावेत. गळ्यात एखादंच नाजूकसं गळ्यातलं, मोत्याचा सर असं काही तरी घालावं. कानातलंही लहानसं असावं. सलवार कमीज ऐवजी कुर्ती वापरणार असाल तर हीच पथ्यं पाळावीत. कुर्तीवर रेशमी स्टोल किंवा स्कार्फ उत्तम. पॅण्ट मात्न उत्तम फिटिंगची हवी.

(लेखिका साहित्य, स्वयंपाक आणि जीवनशैलीच्या आस्वादक आहेत) 

sayaliwrites@gmail.com

Web Title: What if you want to get rid of the confusion of what to wear for office?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.