What is CPR? | 'कार्डिअ‍ॅक अरेस्ट'वेळी जिवात जीव आणणारा CPR; घडवू शकतो चमत्कार!
'कार्डिअ‍ॅक अरेस्ट'वेळी जिवात जीव आणणारा CPR; घडवू शकतो चमत्कार!

- डॉ. रुचिरा खासने

आयुष्यात कधी कधी काही प्रसंग असे घडतात की, जे आपल्याला अंतर्बाह्य हलवून सोडतात. मागच्या आठवड्यात माझ्या बाबतीतही असंच काहीसं घडलं.

 व्यवसायानं मी डॉक्टर. नाशिकच्या एका मोठय़ा हॉस्पिटलच्या आयसीयूत अतिदक्षता तज्ज्ञ म्हणून काम करते. काम संपलं की दिवसभराचा मानसिक शारीरिक ताण दूर करण्यासाठी जीममध्ये जाण्याचा माझा शिरस्ता असतो. फोनवरून आयसीयूतील काही महत्त्वाच्या रुग्णांची रुग्णांची आवश्यक ती माहिती सतत घेणं चालू असतंच. माझी सारी महत्त्वाची कामं झाली आणि मुलीचं थोडं खेळून झालं की, रात्नी नऊच्या सुमारास आम्ही दोघी घरी येतो. मग जेवण  वगैरे ! माझी 78 वर्षांची आईदेखील आमच्यासोबतच राहाते.

अलीकडेच क्रि टिकल केअरच्या एका राष्ट्रीय परिषदेत मला एक छोटेखानी व्याख्यान देण्याचं निमंत्रण मिळालं. परिषद जवळ आली आणि माझी तयारी विशेष नव्हती म्हणून त्या दिवशी माझ्या इतर सर्व गोष्टींना बगल देत मी जीमनंतर सरळ घरी पोहोचले.  घरात गेले तेव्हा आई जागी होती. तिचं जेवण नेहमी आमच्याबरोबरच होतं. मी तिला उठवलं आणि जेवायला बोलावलं.
जेवणाची तयारी करायला म्हणून मी किचनकडे वळाले आणि थोडी पुढे गेले इतक्यात मला काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी सुरुवातीला त्या आवाजाकडे जरा दुर्लक्षच केलं. पण मी किचनपर्यंत पोहोचूनही आई माझ्या पाठोपाठ आली नाही म्हणून परत तिच्या खोलीत गेले तेव्हा समजलं की आई पडलीये. सुदैवानं तिला काही लागलं नव्हतं. 
आईला मी विचारलं की,  ‘काय झालं?’  तर ती म्हणाली,  ‘काही नाही गं , जरा तोल गेला. आता मी ठीक आहे. येते.’ 
ती ठीक असल्याची मी नीट खात्रीही केली. मी किचनकडे वळले. काही सेकंदच झाले असतील इतक्यात पुन्हा एकदा जोरात आवाज आला. आवाजाची तीव्रता आधीपेक्षा जरा जास्तच होती. मागच्या अनुभवानं सावध झाल्यानं यावेळी मी लगोलग आवाजाच्या दिशेने पळाले. पाहते तर काय? आई बाथरूमसमोर निपचीत पडली होती. मी जोरात किंचाळले आणि आईला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तिनं काहीच प्रतिसाद दिला नाही. मी तिची नाडी पाहिली. नाडी अजिबात लागत नव्हती. मी क्षणभर सुन्न झाले. हे असं कसंहोऊ शकतं? तो कार्डियाक अरेस्ट होता.

आयसीयूत काम करत असल्यानं कार्डियाक अरेस्टचं हे दृश्य मला अजिबात नवीन नव्हतं. पण यावेळेस परिस्थिती वेगळी होती. 
समोर कोणी अनोळखी रुग्ण नव्हता तर खुद्द माझी आई होती. अगतिकपणे मी तिला सीपीआर सुरू केला. छातीवर दाब देण्याची क्रिया (चेस्ट कॉम्प्रेशन्स) सुरू केली. चेस्ट कॉम्प्रेशन्सची  दोन आवर्तनं पूर्ण झाली; पण प्रतिसाद मात्र काहीच नव्हता. 

नाडी लागत नव्हती. आता मात्र माझा धीर खचू लागला होता. जिवाच्या आकांतानं आई आई करत मी किंचाळत सीपीआर देत होते. पण कोणी माझा आवाज ऐकत होते की नाही कुणास ठाऊक? मोठय़ा अपार्टमेंट राहत होते, अवतीभोवती घरं; पण कोणाला माझा साधा आवाजही ऐकू येऊ नये?
सीपीआरची तिसरी फेरी सुरू केली आणि आईचा मंद प्रतिसाद मला जाणवला. डोळ्यांची हालचाल होते आहे असं जाणवलं. सीपीआरची तिसरी फेरी पुरी करून मी नाडी पाहिली.  तिची नाडी आता लागत होती; पण आता पुन्हा कार्डियाक अरेस्ट आला तर? त्वरित  तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज होती.  
 

सीपीआर कसा द्यायचा माहिती आहे का?

एका हाताच्या बोटांनी आईची नाडी तपासत मी फोनवर कॉन्टॅक्ट लिस्ट चाळू लागले.  माझ्याच अपार्टमेण्टमधील एका डॉक्टर मैत्रिणीला मी पहिला फोन लावला. पण नेटवर्कअभावी तो लागला नाही. मग मी माझ्या भावाला फोन लावला. बहुतेक तोही गडबडीत असावा. सैरभैर होत मी आणखी इकडे-तिकडे फोन लावले. अखेर चौथा फोन लागला आणि यथावकाश मदतही मिळाली. 
आईला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि उपचार सुरू झाले. या सर्व गडबडीत तिच्या हाताचं हाड मोडलं, छातीच्या एका बरगडीला फ्रॅक्चर झालं. त्यावर उपचार सुरू आहेत. दुखापत झाली होतीच; पण तरीही माझी आई माझ्यासोबत आहे या गोष्टीचाच मला सर्वाधिक आनंद झाला. माझे भाऊ-बहीण मित्नमंडळी सारे माझ्या मदतीला धावून आले आणि हा कठीण प्रसंग पार पडला. 

आज या घटनेला जेमतेम आठ-दहा दिवस झाले असतील. पण माझी झोप उडाली आहे. अनेक प्रश्न माझ्या मनात  उभे राहिलेले आहेत.
  पहिला प्रश्न  हा की अशा प्रसंगी मी आणखी काय करू शकले असते?  काही बाबतीत मी जरा भांबावलेच हे जरी खरं असलं तरी केवळ वेळीच सीपीआर देता आल्यानं माझी आई या प्रसंगातून सुखरूप परत आली. गेली बारा वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ मी अतिदक्षता विभागात काम करत आहे आणि सीपीआरचं तंत्न मला अवगत आहे तरीही त्याक्षणी मी क्षणभर गोंधळले. 
मग ज्यांना सीपीआर म्हणजे काय हे माहिती नाही, तसा प्रसंग कधी येत नाही अशा माझ्या मित्रमैत्रिणींना आणि एकंदरीतच आपल्या सर्वांना कसं कळणार की अशा अडीनडीच्या वेळी काय करायचं?

सीपीआर (CardioPulmonary Resuscitation) हा नुसता समजून न घेतां तो मनात वारंवार घोळवावा आणि घोटवावा लागेल असं आता मला वाटतं. वैद्यकीय क्षेत्नाशी जे संबंधित नाहीत त्यांच्यासाठी तर तयारी अधिकच आवश्यक आहे. आज-काल मेडिकल असोसिएशनच्या अनेक शाखा सीपीआरच्या कार्यशाळा जागोजागी राबवत आहेत. पण जोवर या कार्यशाळा चळवळीचं स्वरूप धारण करीत नाही तोवर सीपीआर प्रभावीरीत्या समाजात खोलवर झिरपणार नाही. समाजातील प्रत्येकापर्यंत सीपीआर पोहोचला पाहिजे आणि  यासाठी केवळ डॉक्टर्सच नाही तर इतर घटकांनीदेखील पुढे आलं पाहिजे.  दुसरा प्रश्न माझ्या मनात आला तो हा की मी एक डॉक्टर म्हणून कुठे कमी पडले का? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर माझ्या लेखी तरी काहीअंशी हो असंच आहे. समजा सीपीआरच्या तीन-चार आवर्तनानंतरही आईची नाडी पूर्ववत झाली नसती तर माझ्याकडे अँडव्हॉन्स्ड सपोर्ट काय होता? काहीच नाही.  
 अँडव्हॉन्स्ड कार्डिअँक लाइफ सपोर्टचे अर्थात ACLS प्रशिक्षणवर्ग आम्ही हॉस्पिटल्समध्ये नियमितपणे घेतो. पण प्रसंगी कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी आवश्यक एक बॅग विथ फेस मास्कदेखील आपल्या घरात नाही याचं मला वैषम्य वाटलं. शिवाय जीवनावश्यक (लाइफ सेव्हिंग) औषधंही त्यावेळेस माझ्याकडे नव्हती. आता असली औषधं घरात ठेवावीत की नाही हा एकवेळ चर्चेचा विषय होऊ शकेल. पण तोच तर या लिखाणामागचा उद्देश आहे. 
आपल्या फस्र्ट एड बॉक्समध्ये एक साधारण फेसमास्क  सोबतच काही महत्त्वाच्या औषधांचा समावेश व्हायला हवा का? दिसायला अगदी साधं आणि हाताळायलाही अत्यंत सोपं असं हे उपकरण माझ्याकडं असायला हवं होतं असं मला वाटतं.
 पाश्चात्त्य देशात प्रत्येक हायवेवर रॅपिड रिस्पॉन्स टीम अर्थात अतिदक्षता प्रतिसाद म्हणून ठिकठिकाणी ठेवलेल्या कीटमध्ये फेसमास्क आणि AED  नामक उपकरण असतं. तिथे जवळजवळ प्रत्येक नागरिकाला सीपीआरचं किमान मूलभूत प्रशिक्षण दिलेलं असतं. आपल्याकडे परिस्थिती याच्या उलट आहे एवढंच नाही तर केवळ निराशाजनक आहे. निदान प्रत्येक गावातील एका मंदिरात आणि शहरातील प्रत्येक जॉगिंग ट्रॅक किंवा तत्सम ठिकाणी आपल्याला फस्र्ट एड कीट ठेवता येईल का?

निव्वळ कीट ठेवून काही होणार नाही हे मान्यच.  पण त्याबरोबर आपला मोबाइलदेखील एक सिद्धहस्त शिक्षक होऊ शकेल. आजकाल यू ट्यूबवर सहजसुलभ सीपीआर शिकणं शक्य आहे.  काही अडलंच तर डॉक्टर्स मदतीला आहेतच. 
- आता तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न : माझ्या आईच्या म्हणा किंवा माझ्या सुदैवाने म्हणा; पण त्या दिवशी मी घरी होते आणि आईवर हा प्रसंग ओढवला.  मी घराबाहेर असते आणि ही घटना घडली असती तर? आणि समजा मी तिचा आवाज ऐकून घराकडे गेलेही असते तरी आमच्या घराच्या दरवाजाच्या तीन तीन थरांच्या सिक्युरिटीचे चेक भेदून मी घरात जाऊ तरी कशी शकले असते? कानठळ्या बसतील एवढय़ा आवाजानं मी आरोळ्या देत असतानाही माझ्या मदतीला कोणी येऊ शकलं नाही हेही इथे लक्षात घ्यायला हवं. आपला खाजगीपणा जपण्यासाठी आणि  आपल्या आयुष्यात कोणाचा हस्तक्षेप व्हायला नको या नादानं हल्ली आपल्याला इतकं पछाडलं आहे की आपण स्वत:ला जवळ जवळ कोंडून घेतलं आहे. खाजगीपणाचा आग्रह इतका का असावा की वेळप्रसंग असता कोणाला आपला साधा आवाजही ऐकू येऊ नये? हा कुठेतरी सामाजिक आत्मपरीक्षणाचादेखील विषय आहे. 

हा प्रसंग तसा एकच होता; पण माझ्या जाणिवांना तो अनेक अंगांनी समृद्ध करून गेला. केवळ या एका दिवसानं  मला जितकं  शिकवलं तितकं शिकण्यासाठी प्रसंगी अनेक वर्षंही खर्ची पडली असती. काही क्षणांच्या या अनुभवानं मी काही वर्षांनी तरी नक्की मोठी झाले. 
हा लेख वाचून आपण सीपीआर म्हणजे काय हे समजून घेतलं, शिकून घेतलं तर फार मोलाचं होईल, असं मला वाटतं !

(शब्दांकन - डॉ. राहुल भामरे)

डॉ. रुचिरा खासने अतिदक्षता तज्ज्ञ असून,
डॉ. राहुल भामरे भूलतज्ज्ञ आहेत.

drruchirakhasne@gmail.com


Web Title: What is CPR?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.